शेतक-यांचे स्वराज्य: Page 10 of 44

कोणाचे नसून गिरणीवाले कारखानदार यांचे होय.

जगातल्या पोटांच्या पापावर या बड्या पोटांची खाज शृगांरली जात असते. कारखानदार आणि कामगार यांच्यामध्ये श्रीमन्तीचे एक भले जाडजूड फिल्टर लटकले असल्यामुळे, कामगारांच्या लक्षावधि पोटांच्या तिडका त्यात शिरताक्षणीच त्याचे पौष्टिक खाद्यात रूपान्तर होते. या फिल्टरमुळे मजुराच्या पोटाच्या किंकाळ्या कारखानदाराना मुळीच ऐकू न येता, त्या ऐवजी त्यांच्या श्रीमन्ती वैभावाला झिलईची झकाकी चढविणा-या स्तुतिस्तोत्राच्या मंजुळ गायनात त्या किंकाळ्याचे परावर्तन होते. पोटाच्या पापाचे निर्माण केलेल्या श्रीमंत आणि गरीब या भेदाने जगात आजपर्यंत जितके अत्याचार केलेले आहेत, तितके महायुद्धानी राज्यक्रांत्यानी किंवा ठगांच्या दरोड्यानीहि केलेले नाही. पोटाच्या पापातून श्रीमन्ती जन्माला आली असल्यामुळे माणसाची जनावरे बनविणे आणि पशुक्षाहि जडमुढाना माणुसकीता मुलामा चढविणे, या गोष्टी तिच्या सहडलीला होऊन बसल्या आहेत. श्रीमन्तीचे आवरण जर खेचून झुगारून दिले तर तिच्या अतरंगाच्या मसाल्यांच सा-या जगाच्या पातकाचा सफडा नरक ओतप्रोत भग्लेला आढळेल. इतकेच नव्हे तर शेकडा ९८-९९ श्रीमंत फक्त श्रीमंतीच्या प्रसादानेच माणसात मोडतात, नाही तर त्याना टोणग्या डुकरापेक्षा अधिक कसलीहि किंमत नाहीं, हेच अखेर प्रत्ययाला येते. शहरी शहाणे जिला सुधारणा सुधारणा म्हणतात, ती भांडवल्यांच्या श्रीमंतीची आणि चेनबाजीची बुरखी सबब आहे. कारखाने व गिरण्या या सबबीची हत्यारे असून, त्यानी शहरी जीवनात इलायट्रीची कितीहि भपकेबाज दिवाळी केलेली असली, तरी त्यानी खेड्यातला शेतकरी पोटाच्या पापाने पामर बनबून भिकेला लावला, ही गोष्ट सहसा कोणाच्या लक्ष्यात येत नाही.

सुधारणेच्या नावाखाली मुंबईसारखी शहरे पृथ्वीवरील स्वर्ग बनली, तरी त्या स्वर्गाने सर्व खेडी उध्वस्त करुन शेतक-याच्या शेतीचा नरक बनविलेला असतो, हे पाहावयाला शहरी शहाण्याना दृष्टीच उरलेली नसते. सुधारणेला सुखाची माता मानणा-याना गोल्डस्मिथ म्हणतो :- Ye friends to truth. Ye statesmen who survey The rich man’s power increase, the poor’s decay, ’Tis yours to judge, how wide the limits stand Between a splendid and a happy land. “गोरगरीबांच्या –हासावर श्रीमंतांची सत्ता वाढत चालली आहे, हे स्पष्ट पहाणा-या, अहो सत्याच्या भोक्त्यानो, अहो मुत्सद्यानो, ढामडौली दिमाखाचे राष्ट्र म्हणजे सुखी राष्ट्र नव्हे, हे तुमच्या जितके लवकर लक्ष्यात येईल तितके बरे.” कारखानदार श्रीमंत हजारो रुपये किंमतीच्या मोटारी उडवीत आपल्या धनकनकसंपन्नतेचे प्रदर्सन करीत असतात. पण, ही मोटारदौड आपण पोटार्थी गरीबांच्या पोटावरच करीत असतो, हे त्यांच्या लक्ष्यात येत नाही. गिरणीवाल्या शेट्यांच्या मोटारी जिवंत माणसांच्या ताज्या तिखट कष्टाळू रक्ताच्या पेट्रोलवर दौडा मारीत असतात. गोरगरीबांच्या आंगातून थबथब निथळणा-या घामाच्या पाटाचे वंगण या ऐदी श्रीमंत घेलाशेटांच्या मोटारीत पडत असते. लाखो स्त्री पुरुष आणि मुले यांच्या शरीराची हाडे न् हाडे पिचतात, तेव्हा या नफेबाज घनाड्यांच्या माड्यांची बहाले आणि मोटारींचे सांगाडे सज्ज होतात. शेतीला मुकून अन्नान्न झालेल्या स्त्री पुरूष मजुरांच्या ऐन उमेदी जीविताच्या राखरांगोळीवर या लाखाधिशाना पुरुषोत्तमत्वाचा अधिकार प्राप्त होतो आणि सामाजिक क्षेत्रात यांच्या मोठेपणाच्या टिमक्या वाजतात.

पोट पैशासाठीं पापाचा परवल पत्करते, पण पैसा मात्र असा हरामखोर आहे कीं तो वाटेल तसल्या पापावर पुण्याचे पांघरूण पांघरतो. आजच्या जगात श्रीमंत व गरीब, मजूर व कारखानदार, ऋणको व धनको, आणि गुलाम व धनी, हे जे भेद माजले आहेत, त्याला मूळ कारण चमडीके झोपडीमे लगी हुई आग हे जरी असले, तरी तिच्या ज्वाळा अव्याहत भडकत ठेवण्यावरच श्रीमंतांच्या श्रीमंतीची भरती असल्यामुळे, श्रीमंतीच्या न शमणा-या भुकेनेच हे भेद दिवस न् दिवस अधिकाधिक तीव्र होत चालले आहेत. सगळी पोटे पत्करली, पण श्रीमंतीची भूक लागलेल्या भांडवलशाहीच्या पोटाची आग परवडत नाही. सामाजिक समतोलपणाचा कल भांडवलशाहीच्या राक्षसी पोटाकडे कलंडल्यामुळे आज पोटार्थी गरीबांचे हे हाल, किंवा त्यांच्या पोटाचे बण्ड कसे थांबवावे, हा प्रश्न सध्या महत्त्वाचा आहे.

प्रकरण ३ रे

बाण्डगुळ्या मध्यम वर्ग गेली ५० वर्षे इंग्रेजी विद्या, विलायती