शेतक-यांचे स्वराज्य: Page 9 of 44

टीचभर पण तिचा पोटाचा आटारेटा जगभर, पोटाच्या पापाने नाडलेला प्रत्येक प्राणी अखेर निर्वाणीला मुंबईची कास धरतो.

व्यापार, उद्यागधंदा, शास्त्रें, कलाकौशल्य, विद्या वगैरे सर्वच बाबतीत मुंबईने पहिला नम्बर पटकविलेला पाहून, सत्कृद्दर्शनी तिच्या बाह्य झकाकीने प्रेक्षक अगदीं थक्क होतो. चोवीस तास अहोरात्र चैतन्यपूर्ण असलेल्या या नगरभवानी ( Queen of cities ) च्या इन्द्रधनुतुल्य सौन्दर्याने तो मोहित होतो. परन्तु या सर्व बाह्य लकलकाटाच्या मुळात पोटाच्या पापाचे खत पडत आहे, हे मात्र त्याच्या कल्पनाचक्षूला गोचर होत नाही. विद्युत्प्रकाशाचा लखलखाट. खण्डोगणति गिरण्यांचा धडधडात, मोटार टामरेलीचा खडखडाट आणि मुंग्यांच्या वारुळालाही लाजविणारा रस्तोरस्ती व गल्लोगल्ली असणारा पोटार्थी पाप्यांचा सुळसुळाट पाहून क्षणभर कौतुक वाटते. पण—अरेरे ! पण या सर्व धडपडाटाची लखाकी कितीअमानुष तत्वावर चाललेली आहे ! गिरण्या व तत्सम इतर कारखाने पाहिले की आम्ही औद्योगिक मोक्षाच्या मन्दिराकडे झपाट्याने चाललो आहो, असा भास होतो खरा. परन्तु या मोक्षसाधनाच्या तपश्चर्येत आम्ही कोणकोणाची आणि किती आहुति देत आहो, याची खुद्द तापस्यांनाच जर कल्पना होत नाही, तर इतराना कशी व्हावी ? किती तरण्याबाण्ड जवानांच्या शरीराची माती या गिरण्यात पडत असते ? किती ? जवान स्त्रियांच्या अब्रूचे धिण्डवडे रात्रन्दिवस उडत असतात ?किती महत्त्वाकांक्षी माणसांच्या आयुष्याच्या दो-या या गिरण्यानी व कारखान्यानी तोडल्या आहेत ? किती लहान बचड्याना अगदी लहानपणापासूनच ‘ तू मजूर आहेस, तुझा जन्म या गिरण्यामध्ये राबण्याकरिताच झालेला आहे ’ असे प्रत्यक्ष शिक्षण या औद्योगिक कारखान्यनी दिले आहे ? गिरण्या कारखाने फॅक्ट-या वगैरे संस्था, पोट भरण्याच्या जागा आहेत, या भावनेने आपले घरदार गणगोत शेतवाडी व पुष्कळ प्रसंगी पोटची पोरे टाकून मुंबई व तत्सम गिरगाळू, ठिकाणी धावत आलेल्या किती पोटार्थ्यांचे पोट आजपर्यत भरले आहे ? चामडीच्या झोपड्याना लागलेल्या आगी आजपर्यत कितीशा बुझालेल्या आहेत ? उप्पर तो और बनी, अन्दरकी बात खुदा जाने ! इतर ठिकाणची गोष्ट सोडून द्या. फक्त एकट्या मुंबईतील गिरणी कामगारांचीच स्थिती पहा.

त्यांची रहाण्याची ती खुराडी, त्यांची अन्नानदशा, त्यांच्या शरिरावरच्या त्या चिन्ध्या, रात्रंदिवस अक्षरक्षः काबाडकष्ट करुन त्यांच्या चेह-यावर आलेली ती प्रेतकला, कुटुम्बात राहूनहि त्याविषयी वृद्धिंगत होणारा निराशाजन्य एक प्रकारचा तिटकारा, जीवित म्हणजे एक पाण्याचा बुडबुडा किंवा गिरणीवाल्या शेट्याची गुलामगिरी करण्यासाठी देवाने दिलेला एक काळ, या कल्पनेमुळे व्यसनांचा झालेला अतिरेक आणि दिवसाचे चोवीस तास जीवन-कलहानी तोंडगिळवणी करता करता मोटाकुटीला आलेली ती त्रासदायक चिडखोर वृत्ति, हे चित्र पहाणा-याच्या तोंडून अखेर हाच उद्गार निघेल की ‘ नरक जर पृथ्वीवर कोठे असेल तर तो येथेच येथेच येथेच ’ ! सारांश, गिरण्या कारखाने व फॅक्ट-या म्हणजे जिवन्तपणीच माणसाना मरणाचा अनुभव दाखविणा-या आणि माणसे असताहि त्यांची जनावरे बनविणा-या नरकाच्या खाणीच हाटल्या तरी चालतील. या खाणी कोणी उत्पन्न केल्या ? या खाणी पोटाने निर्माण केल्या. होय. पण असे हे पोट तरी कसले कीं, त्याची खाच बुझविण्यासाठी कोट्यावधि माणसें जिवन्तपणी प्रेतासमान होतात ? असे हे राक्षसी पोट तरी कोणाचे की ज्याच्या शान्तवनासाठी लाखो लोकांच्या पोटातली आतडी पिळून निघावी ? त्यांच्या रक्ताचे झालेले पाणी सुद्धा त्यांच्या शरीरात उतरू नये ? औद्योगिक प्रगतीच्या नावाखाली अखिल राष्ट्राच्या शारिरीक प्रगतीचे होळकुकडे करण्यास उद्युक्त झालेले आणि भुकेने पेटलेली पोटे ‘ दया करा, थोडी अधिक भाकर द्या ’ म्हणून किंकाळ्या मारीत असतचाना, ज्या पोटाच्या वीत दीडवितीवरच असलेल्या कानांची भोके साफ हुजून जातात, असे हे पोट तरी कोणते ? आणि केणाचे ? हजारो लाखो पोटांच्या तिडकांवरच ज्याची ङूक भागविली जाते असे ते पोट म्हणजे प्रदर्शनात ठेवण्यासारखी एखादी वस्तू असेल काय ? नाही. पोटासारखेच पोट ; पण त्याच्या भुकेची आग आणि खाद मात्र फार भसंकर. हे पोट दुसरे तिसरे