शेतक-यांचे स्वराज्य: Page 8 of 44

तेव्हा हिंदी शेतकरी बसल्या जागी शेतीच्या मातीत कसा मळला मिसळला गेला, याचे शब्दचित्र किंवा भविष्य गोल्डस्मिथ कसे थोडक्यात रंगवितो ते पहा :- But times are altered; trade’s unfeeling train Usurp the land, and dlspossess the swain; Along the lawn, where scattered hamlets rose, Unwiedly wealth and cumbrous pomp repose, And every want to luxury allied, And every pang that folly pays to pride. [भावार्थ :- पण तो सुखाचा काळ गेला । व्यापारावर आपल्या तुंबड्या भरण्यास लालचटलेल्या पाषाणह्रदयी लोकांनी सगळ्या शेतजमिनी गिळंकृत करुन, शेतक-याला देशोधडीला हाकून लावले. ज्या भूमीवर पूर्वी शेतक-यांची झोपड्यांची खेडी तुरळक तुरळक सर्व वसलेली असत, त्याच समृद्ध भूमीवर श्रीमंतांच्या डोईजड ऐश्वर्याचे टोलेजंग वाडे वसले. येथे धनाडय ----- लोक आपल्या चैनवाजीच्या कृत्रीम सुखास्वादात मग्न असतात. या चैनवाजीत तरी त्यांना ख-या सुखाची प्राप्ती होते काय ? मुळीच नाही.

चैनबाजीच्या पोटी निपजणा-या अनेक दुःखांचे पोट, श्रीमंतीच्या घमेंडीचा मूर्खपणा सावरण्यासाठी त्याना घशाखाली लोटावेच लागतात. ] प्रस्तुत वर्णन किती यथार्थ आहे, याची शिफारस करण्याची जरुरी नाही. देशी उद्योगधंद्याच्या वाढीच्या गोंडस सबबीखाली, एकट्या मुंबई इलाख्यातील काही जिल्हातल्या खेड्यात थाटलेले भांडवलशाही कारखाने पहा म्हणजे खात्री पटेल. शेकडो शेतक-यांच्या हजारो एक— पिकाळ जमिनी या कारखान्यांच्या पायात गडप होऊन, तेच स्वावलंबी शेतकरी त्याच कारखान्यात मिळेल त्या रोजाने पडेल ती मजुरी करीत आहेत. दारिद्र्याचा वणवा सर्वत्र भडकल्यामुळे रोख रोजदारीला चटावलेला शेतकरी सुद्धा, नांगरणी पेरणी कापणीच्या यातायातीला रामराम ठोकून, या कारखान्यात मजूर म्हणून घुसला आहे. हातशी शेतीचे काम करणारे मदतगार भाईबंध खेड्यातून उठून गिरण्याकारखान्यात गेल्यामुळे, उरल्यासुरल्या शेतक-यांना शेकडो एकर जमीन नापिक टाकून, एकट्या दुकट्याला बनेल तेवढ्याच तुकड्यांची मशागत करुन जगण्याचा प्रसंग आला आहे. बरे, हे कारखाने तरी देशी कसे म्हणावे ? विलायतचा कच्चा माल आणून त्यावर हे देशीब्रूब कामगिरीची पैदास करणारे, विलायती व्यापा-यांचे आश्रयदाते एजण्ट ! लोखंडी नांगराचेच कपूर-किर्लोस्करी कारखाने घ्या. एकजात शेतकरी शेती ओसाड टाकून, किंवा ती असल्या कारखान्यांच्या भक्ष्यस्थानी घालून, शुद्ध पोटार्थी मजूर बनल्यावर, किंवा बनविल्यावर, हे विलायती बिडाचे लोखंडी नांगर कोणाच्या उरावर चालविणार ? जुना पुराणा लाकडी नांगर चालविण्यासहि जेथे शेतकरी शिल्लक नाही, तेथे लोखंडी नांगरांची अकरमाशी पैदास, भांडवल्या ह्रदयाची ठेवण कशी उलटी आहे.

इतके मात्र स्पष्ट दाखविते. तात्पर्य, उद्योग धंद्याच्या वृद्धीच्या सफेत सबबीवर निघालेले हे असले कारखाने, गिरण्याप्रमाणेच, शेतक-यांच्या शेतीच्या मुळावर आलेली मूळनक्षत्रेच होत, यात मुळीच शंका नाही. कारणे काहीहि आणि कितीहि असोत, आज हिन्दुस्थानात शेती आणि शेतकरी हे शब्दच काय ते शिल्लक आहेत. बाकी, एकजात पूर्वीच्या पिढीजात शेतक-यांचा वंशज आज पोटासाठी हवा तो रोजगार करणारा निर्भेळ मजूर बनून, आपल्या बापजात्यांच्या जन्म-कर्म-भूमीला ( उध्वस्त खेड्याला ) रामराम ठेकून, मुंबईसारख्या गिरणाळू शहरात येऊन पडला आहे. इंग्रेज सरकारच्या शेतकी आक्टातले स्वार्थ साधण्यासाठी ‘ मी शेतकरी, मी शेतकरी ’ म्हणून पंचांगबहाद्दर भटापासून तो शेमलेबहाद्दर मराठ्या झब्बूपर्यंत सर्व वीरपीर कोर्टत हजर होतात. पण भाडभीक सोडून चौकशी केली तर पूर्वीच्या शेतक-यापैकी जेमतेम शेकडो पाच नांगरावर टिकून असतील नसतील ! बाकी सगळे पोटाच्या पापाच्या व्यापाने ‘ जिकडे भरला दरा, तो गाव बरा ’ असे देशोधडीला लागून उध्वस्त झाले आहेत. पोटाच्या पापाचे उत्तम प्रदर्शन म्हणजे मुंबई. हिन्दुस्थानाच्या अवाढव्य पोटच्या खास तिडका मुंबईस केन्द्रित झालेल्या आहेत. भरतखण्डाच्या पोटाच्या माप मुंबईच्या ताजव्यात खुशाल बुनचूक मोजून घ्यावे. मुंबई आणि पोट या दोन शब्दांची सांगड इतकी निकटची पडलेली आहे की मुंबईकडे धाव घेणारा प्रत्येक माणूस- मग तो महाराष्ट्रीय असो, नाहींतर यण्डुगुण्डु मद्राशी असो- पोटासाठी वाटेल ती खटपट करणाराच असतो. पोट जसे टीचभर पण त्याचा व्याप जगभर, तशी मुंबई