शेतक-यांचे स्वराज्य: Page 2 of 44

डेझर्टेड व्हिलेजचे पुस्तक बाहेर काढले. त्याचे सह्रदयतेने वाचन केले आणि मनावर जे जें विचार-तरंग उठले त्याची टिपणे तयार केली.

महाराष्ट्रातल्या शहरी मजूर आपल्या पिढीजात नांगराची उपासना करणारा खेड्यातला स्वावलंबी शेतकरी बनल्याशिवाय, आज सर्वत्र भडकलेल्या पोटाच्या बंडाला पायबंद लागणार नाही, ही गोल्डस्मिथची विवंचना माझ्या विचारांशी प्रथम एकतान झाली आणि त्यावरचे सर्व विचार उत्कान्त होत असे, त्यांचे पर्यवसान आज शेतक-यांचे स्वराज्य या आजच्या स्वप्नसृष्टीत पण उद्याच्या सत्यसृष्टीत झाले आहे. ऑलिव्हर गोल्डस्मिथने आपले उध्वस्त खेडे काव्य प्रसिध्द केले तेव्हा त्यात गोविलेली तत्त्वे खरी का काल्पनिक यावर तत्कालीन आंग्ल विद्वानात मोठी चर्चा चालू झाली. कोणी म्हणे हे काव्य सूचनात्मक आहे, कोणी म्हणे हा इंग्लण्डला एक इषारा आहे, तिसरा म्हणे ही वाङ्मयाची नुसती सेवा आहे, आणि शेवटी वादाचा समारोप करण्यासाठी कविवर्य ग्रे याने अभिप्राय दिला कीं “ This man is a poet”(हा मनुष्य कवि आहे.) हिंदुस्तानाच्या शेतकीचा आज जसा विंध्वंस झाला आहे, तसा गोल्डस्मिथच्या किंवा कोणाच्याही काळी इंग्लण्डने कधीच अनुभवलेला नसल्यामुळे, प्रस्तुत काव्यातल्या विचारांना कवि-कल्पनेपेक्षा अधिक महती कोण देणार? आणि आपल्या राष्ट्रभूषण कवीने वर्णन केलेली परिस्थिती आपल्याच राष्ट्राच्या सम्राटछत्राखाली एका प्रचण्ड देशात, पुढे लवकरच यथाक्षर घडणार आहे, याची या आंग्ल पंडितांना काम कल्पना असणार? गोल्डस्मिथेचे ‘उध्वस्त खेढे’ इंग्रजांना इंग्लण्डात कधीच दिसले नाही, तरी ते इंग्रजी कदरीखाळी कण्हत कुंथत पडलेल्या हिन्दुस्तानात आज पंचखंड दुनिया उघड्या डोळ्यांनी पहात आहे. क्षेत्रफळ आणि लेकसंख्येच्या मानाने इंग्लण्ड म्हणजे हिन्दुस्तानापुढे एक तालुका. पण आज तोच हिन्दुस्तान म्हणजे गोल्डस्मिथचे उध्वस्त खेडे होऊन बसला आहे.

हिन्दुस्तानच्या भवितव्याचा कळकळीने विचार करणारीनी या काव्याचा नव्या दृष्टीने अभ्यास करणे अगत्याचे आहे. अनेक आंग्ल काव्यांचे तर्जुमे देशी व मराठी भाषेत करणारे कवि झाले. पण एकाही जातिवंताला या काव्याचे रुपांतर करण्याची प्रेरणा होऊ नये, याचे कारण आधुनिक कवींच्या आत्म्याची संवेदनाच शेतकीप्रमाणे उध्वस्त झालेली आहे. गुलामांच्या शारदेने लव्हाळ्याची लकतेरच धूत बसावी! दादर ( मुंबई१४ )मंगळवार श्रावण, श्रीकृष्ण गोपाल जन्मष्टमी शके १८५९.ता. २७ ऑगस्ट सन १९२९ इसवी. राजर्षी कै. छत्रपती शाहू महाराज “ज्यांना राजकारणांत भाग घ्यावयाचा असेल त्यांना इतर देश प्रमाणें याहि देशांत प्रत्येक मनुष्याला मनुष्यत्वाचे सर्व अधिकार दिले पाहिजेत; नाहितर आमच्या हातून मुळीच देशसेवा होणार नाहीं.” शेतक-यांचे स्वराज्य प्रकरण १ ले परिस्थितीचे सिंहावलोकन इंग्लण्डचा सुप्रसिध्द स्पष्टवक्ता कविराज ऑलिव्हर गोल्डस्मिथ याने आपल्या ‘डेझर्टेड विलेज’ ( उध्वस्त खेडे ) नामक अजरामर काव्यात वरील उद्गार काढले आहेत. त्यांचा भावार्थ असा :-- “ ज्या देशांत गडगंज संपत्ति नुसती कोठारात अडकून पडते,( म्हणजे काही मूठभर लोकच तेवढे अलोट संपत्तीचे कोठावळे बनतात ) आणि सारी जनता भिकेला लागते, त्या देशात लवकरच सत्यानाश होणार, ही खूणगाठ बांधावी. राजे महाराजे सरदार श्रीमंत इत्यादी झब्बू लोक भरभराटले काय अथवा घरघराटले काय, जगाला त्याचे सुहेर सुतक बाळगण्याचे कारण नाही. कारण, जनतेच्या अनुकूल प्रकिकूल अभि—यावरच त्यांचे जनन मरण ठरलेले असते.( लोक मानताता. म्हणून हे झब्बू रोजे किंवा सरदार बनतात. जनतेने नन्नाची मुंडी हालविली तर, कोट्याधीश असूनहि त्यांच्या राजेपणाला किंवा सरदारीला कुत्रा सुध्दा धूप घालणार नाही.) पण, अवघ्या देशाच्या अभिमानाचा केवळ पाठकणा असा जो अभयाने श्रमणारा शेतकरी वर्ग, तो जर नष्ट झाला, तर मात्र त्यांनी जागा कशाने कधीहि भरुन निघणे शक्य नाही.” हिन्दुस्तान पूर्वी कसा होता, किती श्रीमंत होता, त्यातून सोन्याचा धूर निघत होता तो जाड होता की बारीक होता, इत्यादी ऐदी प्रश्नांवर डोकी खाजवण्याची आज जरुर नाही. हिन्दुस्तान ही धर्मभूमि का कर्मभूमी, आमची संस्कृती श्रेष्ठ का पाश्चिमात्यांची श्रेष्ठ, वेदान्ताचा कासोटा धरुन आम्ही स्वर्गाला जाणार, का धादान्ताच्या एरोप्लेनमधून पाटलोणे सुरपियन स्वर्गपाताळ एक करणार,