शेतक-यांचे स्वराज्य

इतिहास, अस्मिता आणि समाजप्रबोधनाविषयी धारदार लिहिणा-या प्रबोधनकारांनी शेतक-यांविषयी पुस्तक लिहिलं असेलसं वाटत नाही. पण त्यांनी तेही केलंय. शेतक-याचे स्वराज्य हे पुस्तक भारतीय भाषांमधलं या विषयावरचं एक उच्च दर्जाचं पुस्तक मानायला हवं.

लेखकाचा प्रास्ताविक खुलासा

या पुस्तकात व्यक्त झालेल्या विचारांचे बीजारोपण २९ वर्षांपूर्वी देवास (मध्य हिन्दूस्तान ) येथील व्हिक्टोरिया हायस्कूल मध्ये मी मॅट्रिकचा अभ्यास करताना झालेले आहे. त्यावेळी माझे परमपूज्या गुरुवर्य़ कै. गंगाधर नारायण शास्त्री (पण्डया) एम्.ए. ‘शाळा सुपरदंट’ हे आमचा इंग्लीश क्लास घेत असत. यांची शिक्षणपध्दती परिणामकारक, चित्तप्रबोधक आणि व्यापक असे. विषय चिकित्सापूर्वक समजावून देण्याची यांची हातोटी मला आज सुध्दा अनन्य अशीच वाटते. ‘कॅरेक्टर ऑफ दी हॅपी वॉरियर’ आणि गोल्ड स्मिथची ‘ट्रॅव्हलर’ व ‘डेझर्टेड विलेज’ ही काव्ये शास्त्रीबुवा सबंध वर्षभर दररोज नियमित शिकवीत असत. त्यांचे व्याख्यान सुरु झाले की बारिकसारिक मुद्देसुध्दा स्पष्ट सिध्द करण्यासाठी अनेक संदर्भ ग्रंथांच्या राशीच्या राशी टेबलावर येउन पडायच्या. इतिहास तत्त्वज्ञान काव्य समाजशास्त्र थिऑसफी, कसलाही संदर्भ विवेचनात येताच, त्याची शहानिशा स्पष्ट झाल्याशिवाय शास्त्री बुवांचे पाऊल पुढे पडत नसे. इतकेच नव्हे, तर ‘डेझर्टेड विलेज’ मधला Sweet was the sound, when oft at evening’s close Up yonder hill the village murmur rode; ‘As some tall cliff that lifts its aweful form.’ या काव्यामधले वर्णन प्रात्याक्षिकाने पटवण्यसाठी शास्त्रीबुवा आम्हा विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन एका खेड्यातही दो-यावर गेले होते. ट्रॅव्हलर मधल्या ‘As some tall cliff that lifts its aweful form.’ या चारच ओळीवर शास्त्रीबुवा तब्बल आठवडाभर प्रवचन करीत असताना, त्यांची एकतान झालेली तल्लीन वृत्ती आजही माझ्या नजरेपुढे स्पष्ट दिसत आहे. माझ्या विचार-उच्चार-आजारांची पिण्डप्रकृती महाराष्ट्राला आज बरी वाईट परिचित आहे, तिच्या कमावणीच्या श्रेयाचा बराचसा भाग मी कै. शास्त्रीबुवांच्या स्मृतीसमाधीवर गंगेच्या पाण्याने गंगेची पूजा म्हणून आज जाहीर रीतीने समर्पण करीत आहे. मुंबईच्या चालू संपाच्या कान्तीयुगात गिरणी कामगारांच्या प्रत्येक झोपडीत उपासमारीची अवदसा भयंकर धुमाकूळ घालीत आहे. सावकारी पिण्डाच्या माझ्या अनेक मित्रानी कायदेवीजीच्या चापात माझ्या उमल्या लोकसेवेची ठेचणी करुन,मलाही या गिरणबाबूंच्या उपासमरीचा आणि कफल्लक राहणीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची सुसंधी दिल्यामुळे, त्यांच्या वेदनांशी आणि भावनांशी तद्ररुप आणि तल्लीन होणे कठीण गेले नाही.

प्रस्तुत पुस्तकाच्या कल्पनेचा जन्म गिरणीत जाणा-या पण बेरोजगारीने उपाशी तळमळणा-या एका कोकण्या बाईच्या स्फुंदनात झालेली आहे. करुणेलाही करुणेचा पाझर फोडणारे तिचे चित्र पाहून मी क्षणभर दिङ्मूढ होउन, तसाच, रस्त्यावर उभा राहिलो. एका क्षणात लाख विचारांचा सिनेमा मस्तकात खेळला. इतक्यात एका मोटारबाईने कर्णभेदी कर्णा पुंकून राजरस्त्यावर उभे राहणे मूर्खपणाचे आहे, असे माझे कान उपटले. फूटपाथवरुन मी घरचा (घर कसले? भाडोत्री बि-हाडाचे खुराडे!) मार्ग धरताच, डेझर्टेड व्हिलेज मधल्या खालच्या ओळी—२९ वर्षांपूर्वी शाळेत पाठ केलेल्या ओळी—आपोआप बिनचूक माझ्या तोंडून बाहेर पडू लागल्या. Ah, turn thine eyes, Where the poor houseless shivering female lies. She once, perhaps, in village plenty blest, Has wept at tales of innocence distrest; Her modest looks the cottage might adorn. Sweet as the primrose peeps beneath the thorn; Now lost to all her friends, her virtue fled. Near her betrayer’s door she lays her head; And, pinched with cold, and shrinking from the shower. With heavy heart deplores that luckless hour When idly first, ambitious of the town, She left her wheel and robes of country brown. लागलीच शास्त्रीबुवांच्या प्रवचनाची आठवण जागी झाली. याच ओळी समजावून सांगताना, उध्वस्त खेड्यातून शहरी भांडवलशाहीच्या जाळ्यात येऊन अडकलेल्या तरुणीच्या कर्महाणीचे ह्रदयद्रावक वर्णन तल्लीनतेने चालले असताना, शास्त्रीबुवा मधूनमधून आपले डोळे उपरण्याने कसे पुशीत, त्याचेही स्मृतिचित्र मला दिसू लागले. बि-हाडी खुराट्यात येताच