शनिमहात्म्य: Page 10 of 85

बोळवण केली. ‘सौदागर गेलिया पाठी । मागे काय वर्तली गोष्टी ’ ती आता श्रवण करावी – दूरदेश अति उजाडी । जेथे घोर वन महा झाडी । तेथे नदीच्या पैलथडी । घोडा जाऊनि उतरला ।। तेथे राव उतरला खाली । तव नवलपरी वर्तली । वारू नाही नदी गुप्त झाली । घाडांझुंडां सहित ।। सारी रात्र थंड्या फराळावर त्याच जंगलात विक्रमाने काढून, सकाळ होताच तो अंदाजाने एकाद्या नगराचा शोध करीत चालू लागला. चालता चालता त्याला एक तामलिंदा नावाची नगरी दिसली. व्यापारी पेठेत प्रवेश केला आणि सहज एका वैश्य व्यापारी सावकाराच्या पेढीजवळ थांबला. सावकाराचे दुकानीं । विक्री होतसे द्विगुणी । त्याणें भला माणुस जाणोनी । आदर केला तयाचा ।। व्यापा-याने जातगोत विचारली, तेव्हा राजा म्हणे तया वैश्याशी । आम्ही क्षत्रिय असो परियेसी । आमचु मुलूख दूरदेशी । क्षण एक येथे उतरलो ।। व्यापा-याने विक्रम राजाचा सर्व प्रकारे आदर केला आणि मोठी ‘अति उत्तम षड्रस’ पूर्ण मेजवानी दिली. भोजनोत्तर संभाषणात व्यापा-याच्या आग्रहावरून विक्रम राजाने घडला सारा प्रकार यथातथ्य सत्य सांगितला. त्यावरून त्या वैश्य सावकाराचीहि खात्री पटली की प्रस्तुत प्रकारात काही कल्पनातीत चमत्कार असला, तरी उज्जनीचा विक्रम राजा म्हणतात तो हाच. ज्याची नुसती दुरून भेट होण्याची पंचाईत, तोच आज माझ्या घरी कामधून प्रमाणे आपण होऊन चालत आला. वैश्याचा आनंद काय विचारावा ! पण बोलून चालून तो वैश्य, व्यापारी, सावकार, ‘तोलमे मख्खी आई तो उसकू भी नही छोडने वाला.’ मग हा तर काय, प्रत्यक्ष विक्रमराजा आपल्या घरी चालून आलेला ! काहीतरी अचाट स्वार्थ साधल्याशिवाय तो ही संधी फुकट थोडीच वाया जाऊ देणार ? ही संधी कोणती ? त्या सावकाराची कन्यका । नाम तिचे अलोलिका । तिचा पण हाचि देखा । इच्छिला वर वरावा ।। * (*मोठी आडदांड मुमताजच म्हणायची ! या २० व्या शतकांत सुधारणेच्या युगांत – ती जरी कितीहि सुशिक्षित किंवा पदवीधर म्हणून असती, तरी निदान बापाच्या गळ्याचा फास सोडविण्यासाठी, ती दावे बांधून देईल त्याच्या गळ्यात तिला माळ घालणे भागच पडले असते.*) परि तिस न मिळे इच्छावर । वैश्य शोध करी निरंतर । तंव हा विक्रमराजा राजा परिकर । म्हणेयासि द्यावी कुमारिका ।। लग्नाळू मुलीच्या बापाची दृष्टी अशीच असते. भेटीस येणा-या प्रत्येक तरुणाकडे तो ‘कर्तव्य’ दृष्टीनेच प्रथम पाहतो आणि साधारणतः ‘कर्तव्य नाही’ कळेपर्यंत त्याचा उघड गुप्त पिच्छा पुरवितो. वैश्याने विक्रमाकडे याच ‘कर्तव्या’ची दृष्टी रोखली, आणि आपल्या मुलीला हळूच जाऊन विनविले की .................... । बाई उत्तम वर आणिला तुजशी । आतां तू माळी घाली याशी । न करी अनमान ।। हा स्वरुपें आहे सुंदर । बत्तीस लक्षणी परिकर । हा भाग्यवंत जाण वर । यासी वरी कुमारिके ।। पण ती अलोलिका म्हणजे एक नंबरची ढालगज, इच्छावर शोधणारी, ती आपल्या बापाची व्यापारी पॉलिसी थोडीच चालू देणार ! तेव्हां कुमारी बोले पित्यासी । तुम्ही बहुत वर्णिता यासी । परी न भरता मम मानसीं । तंवरी न वरी निर्धारें ।। आज पाहिन याचें लक्षण । कैसे चातुर्य काय ज्ञान । भाषणावरूनि प्रमाण । सर्व कळो येईल ।। मुलीची इतकी संमति मिळताच, त्या काळच्या रूढीप्रमाणे वैश्याने रंगमहालाची सिद्धता केली. आपण काय करीत आहोत, याची मात्र त्याने विक्रमाला दाद लागू दिली नाही. रात्री भोजनोत्तर – वैश्य म्हणजे क्षत्रियासी । जावे निद्रा करावयासी । अतिरम्य चित्रशाळेशी । तेथें सर्व विदित होईल ।। बिचारा विक्रम रंगमहालात गेला. महिपतीने तेथेचा वर्णिलेला शृंगारथाट येथे पुन्हा उतरून जागा आडवण्यात अर्थ नाही. विक्रमाच्या जीवनांत कल्पना महिरून जाईल इतक्या वेगाने