शनिमहात्म्य: Page 85 of 85

अखंड चिंतन करून करूनच भक्ताच्या हृदयात तेच ध्यान, तेच उग्र रूप, तीच वज्रांगी धडाडी, तोच महारुद्राचा आवेश, तीच तेजाळ प्रकृति, हळूहळू विकसित होऊ लागते. मारुतीरायाच्या अखंड उपासनेने, त्याचे दिव्य शक्तिमान् चारित्र्य उपासकाच्या देहमनात बिंबू लागले, म्हणजे तो कोणत्याहि प्रकारच्या आधीव्याधींच्या दणक्यांना जुमानणार नाही, किंवा परिस्थितीच्या आघातांपुढे वंगणार नाही. ‘मागे पाय’ मारुतीला माहीत नाही कार्याचा निश्चय झाला कीं मग त्याच्या मुसंडीपुढे प्राणाची तमा नाही, मग संकटांची काय क्षिती ? समर्थ रामदासांनी महाराष्ट्राला मारुती उपासनेची दीक्षा देण्यात सूक्ष्मतम दीर्घदृष्टीचे धोरण लढविले यात मुळीच शंका नाही. १७ व्या शतकात महाराष्ट्र बजरंगबली बनला म्हणून त्याला स्वराज्य दिसले, आजहि महाराष्ट्राला, आणि अखिल हिंदुस्थानाला तामसी बजरंगबली बनण्याशिवाय, त्याच्या पुढचा ‘जगावे की मरावे’ हा बिकट प्रश्न सुटणे शक्य नाही. सत्व आणि रज हे दोन गुण कितीहि गोंडस व गोड असले, तरी तामसिक प्रवृत्तीचा पंगा प्रबळ पिसाळल्याशिवाय स्वार्थ सापडणार नाही आणि परमार्थ सुद्धा हाताला लागणार नाही. फार काय, पण तमाचे कोंदण्डणत्कार न करील, तर सत्व रजना सुद्धा निर्बलावस्थेत घोंगडीखाली डोके झाकून आपले प्राण सोडावे लागतील. सात्विक आणि राजसिक प्रकृतीबद्दल हिंदुस्थानचा मोठा लौकिक आहे. या लौकिकाने हिंदूंच्या हातात कसल्या मोक्षाचे खापर पडले आहे, ते सांगणे नको. आता त्या लौकिकाची खातेवही कायमची बंद करून, हिंदू तरुणांनी तामसिक प्रकृतीचा विकास करण्याचे खाते उघडले पाहिजे. संसार मग तो एका व्यक्तीचा असो, समाजाचा असो, वा राष्ट्राचा असो, त्यात तमाचा तापट तामसीपणा सणाणल्या शिवाय, लौकिकी अगर दैवी आपत्तींचा प्रतिकार करण्याची हिंमत, म्हणजे आत्मशक्ती, त्याला लाभणे अशक्य आहे. यासाठीच समर्थांनी मारुती उपासनेचा समर्थ संप्रदायाचा विजयी नकाशा अखिल हिंदु तरुणांपुढे, म-हाठि स्वराज्याच्या रूपाने, पसरून ठेवला आहे. ‘वन्दे मातरम्’सारख्या सात्विक मुळमुळीत किंचाळणीपेक्षा, जेव्हा अखिल हिंदु भारत बजरंग बली की जय गर्जनेच्या तेलशेंदरात आपादमस्तक रंगून निघेल, तेव्हा त्याचा आत्माराम जागृत होऊन, तो या पुराणपुरुष भारताच्या जीवनक्रांतीचा गडगडाट करून, नवमन्वंतराच्या इतिहासाची पाने क्रान्तीच्या देदिप्यमान सोनेरी शाईने लिहून काढील. ओम क्रांतिः क्रांतिः वाचकांना आग्रहाची विनंती आचारात प्रत्यक्ष क्रान्ती घडवून, अखिल महाराष्ट्राला आत्मविकासाचे सामर्थ्य प्राप्त व्हावे, या धोरणाने आपल्या विचारांना धक्का देणा-या अनेक तत्वांची या ग्रंथात मी चर्चा केलेली आहे. वाचकांनी त्याबद्दलचे आपापले चिकित्सक विचार, अभिप्राय आणि अनुभव मला स्पष्ट व सुवाच्य लिहून कळविण्याची तसदी घ्यावी. म्हणजे दुस-या आवृत्तीच्या वेळी मी त्यांची योग्य ती बडदास्त ठेवीन. दादर, ता. १७ सप्टेंबर १९२८ केशव सीताराम ठाकरे ।। जय जय रघुवीर समर्थ ।। भवाच्या भयें काय भीतोस लंडी । धरी रे मना धीर धाकासि सांडी । रघूनायक सारिखा स्वामि शीरीं । नुपेक्षी कदा कोपल्या दण्डधारी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।।