शनिमहात्म्य: Page 9 of 85

ब्राम्हणी भटांच्या किंवा ब्राम्हणेतरी भटाच्या पायांवर कपाळे घासून आपल्या फुटक्या दैवाचे सांधे सांधले न जाता उलट तणावतात आणि त्यांच्या ‘पवित्र’ मसलतीने आजपर्यंत अनेक शहाणे राजे नरांतले नारायण असताहि अखेर या गाढवांचे पाय धरून प्रत्यक्ष गाढव बनतात, तरीहि भटांची पायचाटी करण्याचा गाढवपणा ब-याच पदधारी व पदच्युत हिंदु राजांना अजून सुटत नाही, या भटी पावणेआठचे माहात्म्य लिहिणारा तात्याजी महिपति कधी अवतरणार कोण जाणे ! विक्रमाच्या कन्याराशील शनीच्या साडेसातीचे ग्रहण लागणार, म्हणून सर्व भटपंडत अपायावर उपाय सुचवू लागले. जपजाप्या पलीकडे भटांची अक्कल थोडीच जाणार ! त्यांच्या सर्वस्वाचे मूळ तेथेच. त्यांनी ताबडतोब शनीच्या महापूजेचा आणि जपजाप्याचा एक लोकमान्य तोडगा सुचविला आणि विशेष आग्रहाने सांगितले की, मग जपकर्त्या ब्राम्हणाशी । शनैश्वररूप मानूनि त्यासी । दक्षिणा देऊनि पुजेसि । प्रसन्नचि करावे ।। पण या उपायाने फार झाले तर जपकर्त्या रामभटाची एकट्याची तुंबडी भरेल. सर्व वेदशास्त्रसंपन्नांची पोळी पिकणार नाही. म्हणून मग करावे ब्राम्हणभोजन । यथाशक्ती द्यावे दान । ब्राम्हण तृप्त होतां पूर्ण । संतोष पावे शनिदेव ।। अशी पुरवणी जोडण्यांत आली. ब्राम्हण पूर्ण तृप्त झाला की शनीचा कोप वितळलाच पाहिजे, असे हे खटकेबाज एटक विक्रमापुढे ब्राम्हणांनी मांडले. ‘पंडित म्हणता राया समर्था । गोष्टी एवढी ऐकावी.’ पण विक्रमराजा फारसा भटळलेला नव्हता. तो सध्या जरी दैवाळला होता, तरी देवाविषयीचा त्याचा विवेक मुळीच लंजर नव्हता. राजा म्हणे पंडिताला । शनी न मानीच आम्हाला । माता पिता वाहिला । रक्षि तोचि पैं जाणा ।। ‘‘ अहो ब्राम्हण हो, या तुमच्या जपजाप्याने काय होणार ? शनिदेव मला छळल्याशिवाय सोडणार नाही. तो थोडाच तुम्हा आम्हाला मानणार आहे ? तोच देव, तोच आमची मातान् पिता, तोच आमची परीक्षा पाहणार आणि रक्षण करणार. तेव्हा मी म्हणतो – .......................। तुम्ही जावे आपुल्या गृहासी । जें होणार तें निश्चयेसी । घडूनि येईल न टळेचि ।।’’ राहूची महादशा काय किंवा शनीची साडेसाती काय, प्रवाहपतित यच्चावत् सर्व मानवांना यथाकाळ यथाक्रम भोगणे प्राप्तच आहे आणि त्या भोक्तृ. त्यातच परमेश्वरी लीलेचा महिमा विचारवंतांनी प्रत्यक्ष अनुभवून, या सृष्टीच्या सहस्याचा ठाव काढावयाचा असतो. असा स्थितीत ‘‘ देह जावो अथवा राहो । पांडुरंगी माझा भावो’’ या भावनेने परमेश्वर माऊलीच्याच पायी मिठी घालणे श्रेयस्कर, या विवेकाने विक्रमाने भटजींच्या जपजाप्याचा धिःकार केला आणि वाटेला तो प्रसंग आला तरी आपण आपल्या सत्वापासून रेसभर सुद्धा पराड़्मुख व्हायचे नाही, या कडव्या पोलादी निश्चयाने त्याने आपली आचार-विचारशक्ति मढवून काढली. पुढे यथाकाळ विक्रमाच्या कन्याराशीला शनीची साडेसाती सुरू झाली. तिचा स्पर्श होताच चमत्कार घडला ! ऐके दिवशी दुपारी सौदागराचा वेष घेऊन शनि विक्रमाच्या राजवाड्यात काही उत्तमोत्तम घोडे विकण्यासाठी घेऊन आला. राजाच्या चाबूकस्वाराने प्रथम एक घोडे रिंगणावर पळवून पाहिले आणि ते उत्तम असल्याचे सर्टिफिकीट दिले. शनि-सौदागराने तिसरा एक खास उमदा अवलादी घोड दाखवून, याच परीक्षा हुजर सरकराने करावी, अशा शिफारस केली. विक्रम त्या घोड्यावर स्वार झाला, त्याला दोन तीन रिंगणे फिरविला आणि ‘वाः फारच छान घोडा आहे’ म्हणून वाहवा केली. त्यावर सौदागराने म्हटले ‘‘ सरकार, या घोड्याची परीक्षा नुसत्या रिंगणदौडीने व्हावयाची नाही. आपण त्यावर फेरफटका-दौड करून पहा, म्हणजे या जनावराचे खरे तेज दिसून येईल. ’’ राजाला ही सूचना पटली. त्याने घोड्याला दोन फटके लगावून दौडीवर धरताच तो जो तडाड वर उडाला तों थेट उंतराळांत वा-यासारखा उडाला. सौदागरहि इतरांप्रमाणेच आश्चर्याचे नाटक नटवू लागला. ‘‘ राजाने माझा घोडा नेला तरी कुठे ? मी किती वेळ वाट पाहणार ? घोडा तरी द्या नाहीतर पैसे तरी द्या.’’ असा त्याने वाजवी आग्रह धरला. शेवटी दिवाणाने घोड्याची किंमत सौदागराला देऊन त्याची