शनिमहात्म्य: Page 8 of 85

वाईट पराक्रम वर्णन केले. नवव्या पंडिताने शनीचे पराक्रम येणे प्रमाणे सांगितले :- ज्यावर तो कोपासि चढे । तयावरी नाना विघ्न ये रोकडे । तयाचा संसार बिघडे । न राहे कल्पांती ।। शनिदेव महाक्रोधी । ज्याचा पराजय नोहे युद्धीं । देवदानवा त्रिशुद्धी । दुःखदाता शनिदेव ।। त्याची दृष्टी पडे जयावर । करी तयाचा चकणाचूर । अथवा कृपा करी जयावर । तयासि सर्व आनंद प्राप्त होय ।। शनीच्या या पराक्रमाचा दाखला म्हणून या पंडीताने तीन उदाहरणे दिली. शनि जन्माला आला तेव्हा (१) पित्यावर म्हणजे सूर्यावर नजर पडताच त्याच्या सर्वांगावर कुष्ठ भरले, (२) सूर्याचा सारथि अरुण पांगळा झाला, आणि (३) त्याच्या रथाच्या घोड्याचे डोळे फुटले. पुष्कळ उपाय केले, पण गुण येईना. अखेर शनीनेच जेव्हा मेहेरबानी केली, तेव्हा हे तीनहि प्रकार नष्ट झाले. (*तरीहि सूर्यस्तोत्रांत ‘‘असे सारथी पांगुळा ज्या रथासी । नमस्कार त्या सूर्यनारायणासी ।।’’ हा सिद्धांत कायमचा आहे. *) हे शनीचे वर्णन ऐकून विक्रम राजा खदाखदा हासून म्हणाला की असला कसला हा बापाच्या बोकांडी बसणारा पोरगा ! ज्याने जन्म घेताच एवढा पराक्रम केला, तो पुढे काय दिवे लावणार ! झाले. राजाने केलेली ही टवाळी शनीला चटकन कळली आणि तो ताडकन विमानात बसून त्याच दरबारात आला. शनिदेव आले, शनिदेव आले, म्हणून मोठी धांदल उडाली. राजा विक्रमाने उठून शनीला साष्टांग प्रणिपाद घातला, पण शनीने त्याचा धिःकार केला. शनि म्हणजे त्यावेळी भडकलेली प्रायमस स्टव ! त्याने टवाळीबद्दल राजा विक्रमाला सज्जड दम भरला की ‘‘ शहाण्या, माझी थट्टा करतोस काय ? थांब. मीच आता तुझ्या कन्याराशीच्या साडसातीला* येतो. (*अनेक विक्रमादित्यापैकी कन्यारासवाला विक्रम कोणता, हे जरी इतिहास संशोधकांनी हुडकून काढले, तरी साडेसातीवाल्या शनिनिंदक विक्रमराजाचा पत्ता लागणे शक्य दिसते. का सारेच विक्रमराजे कन्यारासवाले ? *) पहा मग या शनीचा इंगा” ! विक्रमराजाने पुष्कळ विनवण्या केल्या, पण शनि ऐकेना. तो साडेसातीची धमकी देऊन, आला तसा तडक घरी परत गेला. विक्रमहि भेदरला. “जे जे पुढे होणार । बुद्धी सुचे तदनुसार । जे असेल लिखिताक्षर । तैसे होईल ।। ” एवढ्या वेदांतावर तोहि चिंतामग्न अवस्थेत ‘पुढे का होणार’ याची मार्गप्रतिक्षा करीत बसला. तुमच्या आमच्या सारख्या साध्यासुध्या माणसाला कुरबुड्या जोशाने वर्तवलेली साडेसातीची पाळी आळ्याचा घाम माल्याला नेते; आणि ही तर खुद्द शनीने समक्ष येऊन दिलेली खास धमकी ! तेव्हा विक्रमराजाची काय तिरपीट उडाली असले, याची कल्पनाच करावी. राजे लोकांवर आपत्तीचा फास पडला की त्यांना पोखरून खाण्यासाठी मदतनिसांचा, हितचिंतकांचा, सल्लागारांचा, ज्योतिषांचा, मांत्रिकांचा मोठा अफाट घोळका सभोवती जमत असतो. त्यात पहिला नंबर भटा ब्राम्हणांचा. साडेसाती वर्णविणारे त्रिकालज्ञ भटच आणि तिचा फेरा परतविणारे तांत्रिक मांत्रिकहि भटच. अगदी प्राचीन काळच्या अयोध्येच्या दशरथ राजापासून तों थेट चालू काळच्या रंगेल रसूल तुकोजीराव होळकरापर्यंत, कोणचाही दरबार घ्या, छावणी घ्या, नाहीतर अंतःपुर घ्या, सर्वत्र भटांचा सुळसुळाट. ब-याला भट, वाईटालाहि भट. उलट सल्ला भटाचा आणि सुलट सल्लाहि भटाचाच. शनीची साडेसाती जरी साडेसात वर्षाची असते. तरी ही भटांची पावणेआठी. हिंदुस्थानातल्या प्रत्येक हिंदू राजाच्या सिंहासनाच्या पिंडाला जी एकता अतिप्राचीन काळी झोंबली आहे, ती काही केल्या सुटत नाही. हिंदू राज्याचे सिहासन म्हणजे भटाळलेल्या पावणेआठ प्राण्यांचा वारसा, असे म्हटले तरी चालेल. आपत्तीत सापडलेल्या राजाला ही भटसेना एकदा का उपायावर उपाय सुचवू लागली, की प्रत्येकाचा कानमंत्र निराळा. एक म्हणतो असे करावे, दुसरा म्हणतो तसे करावे. शंभराचे शंभर सल्ले. सर्वांचे सल्ले एकदा का त्या संकटग्रस्त राजावर हल्ले चढवून स्वार्थाचे डल्ले हबकू लागले की वैतागून जाऊन तो ‘अडला नरायण’ अखेर ‘गाढवाचे पाय धरतो.’ याची उदाहरणे आज आपल्या नजरेसमोर प्रत्यक्ष घडत आहेत.