शनिमहात्म्य: Page 7 of 85

खरे सम्मीलन उर्फ एकीकरण होत असते. दोन मित्र परस्परांशी शेकहॅण्ड करतात, तेव्हाहि हीच भावना त्यात प्रधान असते. नुसत्या कागदी कुंडल्यांची जुळवाजुळव हा याच भावनेचा भ्रष्ट असा एक आंधळ्या रूढीचा प्रकार शिल्लक राहिलेला दिसतो. “परस्परांच्या प्रकृत्या आणि ग्रहस्थिति कशाहि असोत, एकमेकांच्या आकर्षणाने अथवा परिस्थितीच्या प्रवाहाने ज्या अर्थी आपण एकमेकांशी वर-वधूच्या नात्याने संयुक्त होण्यासाठी सिद्ध झालो आहो, त्या अर्थी या पाणिग्रहणाने आपले परस्पर पिंड, प्रकृति ग्रहदशेसह एक जिनसी एकपिंडी होवोत ” हाच पाणिग्रहणाविधीचा मुख्य हेतू आहे; आणि दोन मित्रांच्या शेकहॅण्डमध्ये सुद्धा हेच अविच्छिन्न एकीकरणाचे रहस्य आहे. परंतु शेकडा ९८-९९ लोक परमेश्वरलिखित तळहात-कुंडलीचा मुळीच विचार न करता कागदी कुंडल्यावर डोकी फोडीत बसतात. याचेच नाव हिंदू लोकांचा हिंदूपणा. कुंडल्या कागदी असोत, नाही तर तळहाती असोत, त्यात चितारलेल्या प्रारब्ध-मर्यादे बाहेर मनुष्याला केव्हाहि जाता येणार नाही, त्यांतील मोक्तृत्व भोगल्याशिवाय सुटका नाही, हा प्रवाद जरा खरा मानला तर मनुष्याच्या पुरुषार्थाला वाव तरी राहिला कोठे ? सगळाच जर दैववाद,तर यत्नवाद हा शब्द जन्माला तरी कधी ? आणि का ? आणि कोणाच्या पोटी ! बरे, प्रत्येकाचे दैव आणि सुख दुःखाचे फेरे हे जर घड्याळातल्या यंत्राप्रमाणे ठाकठीक ठरलेले आणि यथाकाळ यथाक्रम घडणारे, तर त्यासाठी माणसाने आपले हातपाय तरी कां हालवावे? दुःख येणार तर ते अगत्य येणारच येणार आणि सुखाचा मुसळधार पाऊस अमूक वेळी कोसळणार म्हणजे धो दो कोसळणारच. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी ! मला हातपाय हालविण्याची जरूर कायय़ दैववाद्यांचे विचार जवळ जवळ असेच असतात. नवल वाटते ते हेच की या कपाळवाद्यांना सुद्धा आढ्याला तंगड्या लाऊन स्वस्थ मात्र बसवत नाही. त्यांची काही ना काही धडपड चाललेलीच असते. ज्योतिषबुवाने शनीची साडेसाती वर्तवली की या कपाळवाद्यांनी दर शनिवारी मारुतीला शेंदूर थापून तात्याची महिपति कृत शनिमाहात्म्याचे पारायण नेटाने चालविलेच. मग हे प्राणी आजूबाजूच्या परिस्थितीचा, स्वतःच्या, हातातील विहित कर्तव्याचा, कशाचाहि कधी विचार करायचे नाहत. मारुती शेंदूर प्रदक्षिणा तैलाभिषेक भटपूजा आणि शनिमाहात्म्य यातच सा-या अकलेचा आणि हिंमतीचा होम. आज शेकडो वर्षे लक्षावधि दैववादी हिंदू या शनिमाहात्म्याच्या पारायणाने शनीच्या साडेसातीला तोंड देण्याचा चंग बांधीत असतात. असा हा ग्रंथ तरी काय आहे, याचे सत्यशोधन करण्यासाठी, पुढील प्रकरणाच्या उंबरठ्यात वाचकांनी पाऊल ठेवावे. ००० प्रकरण ३ रे विक्रमाच्या साडेसातीची कहाणी शनि आणि साडेसाती या भानगडी काय आहेत, याचा विवेकवादाला धरून विचार करण्यापूर्वी, केवळ महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या मराठी ओविबद्ध शनिमाहात्म्याचा संशोधन पूर्वक विचार करू. सुप्रसिद्ध संतचरित्रकार तात्याची महिपति यांनी ‘गुर्जर भाषेची कथा’, ‘अर्थविषयी न्यूनता’ न ठेविता, महाराष्ट्र भाषेत ‘यथामति वर्णिली तत्वता’ अशी आहे. या माहात्म्य ग्रंथाला कसल्याहि प्राचीन संस्कृत ग्रंथाचा पाया अगर आधार तर नाहीच, पण विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे हीच की गुजराती भाषेत शनिमाहात्म्याचा पत्ता नाही. तात्याजी महिपति आत्मविश्वासने म्हणतो की, ‘हा ग्रंथ करिता श्रवण । सकळ विघ्ने जाती निरसून । ग्रहपीडा अति दारुण । न बाधे कदा कल्पान्ती ।।’ असल्या या पराक्रमी ओवीबद्ध ग्रंथात उज्जनीच्या विक्रमाची कथा काय वर्णन केलेली आहे, ती थोडक्यात नमूद करतो. कोणे एके काळी (प्रत्येक कथेची सुरुवात याच पालुपदाने करण्याचा संप्रदाय दिसतो.) एके काळी उज्जनीचा विक्रमराजा* एका सकाळी आपल्या दरबारात पंडीतांची चर्चा चालू असता (* विक्रमादित्य ही ‘केसर-इ-हिंद’पदवी प्रमाणे उज्जनीच्या चक्रवर्ति राजांची पदवी असे. चार पाच विक्रमादित्य इतिहासात दिसतात. त्यात शनीच्या तडाक्यात सापडलेला विक्रम कोणता, हा वादग्रस्त प्रश्न आहे. विक्रमशक नावाचा एक शक चालू आहे, पण त्याच्याहि कुळामुळाचा पत्ता लागलेला नाही. *) ‘नवग्रहांत श्रेष्ठ कोण ?’ याचा वाद माजला. प्रत्येक पंडीताने आपापल्या परीने रवि, चंद्र, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू या आठ ग्रहांचे बरे