शनिमहात्म्य: Page 5 of 85

असा सरळ अर्थ निघतो की आम्ही माणसे आणि आमची ही पृथ्वी या आकाशस्थ डझनभर ग्रहांचे खाद्य, अथवा या ग्रहरूपी मांजरांच्या तडाक्यात सापडलेले उंदीरच होत. उंदराचा जीव घेण्यापूर्वी मांजर जसे त्याच्याशी खेळते बागडते, त्याला थोडे मोकळे सोडून पळू देते आणि चटकन् पुन्हा पंजा मारून पकडते व उलट सुलट आदळते, तेवढेच आणि तितकेच स्वातंत्र्य आम्हा मानवांना आहे. या पलीकडे आमच्या हातात काही सत्ता नाही, शक्ति नाही, बुद्धि नाही, पुरुषार्थ नाही, काही नाही! केवळ शेणामेणाचे गोळे ! आकाशस्थ ग्रह त्या गोळ्यांचा देव बनवीत या माकड करोत, आमच्या हातात प्रतिकाराची कसलीहि शक्ति नाही ! असल्या कल्पनेचा अगर भावनेचा प्लेग आज हिंदुस्थानात जितका जास्त फैलावलेला आहे, तितका जगाच्या पाठीवर इतरत्र दिसून येत नाही. या भावनेमुळे कोट्यवधि हिंदी लोकांचे संघ बडवलेल्या बैलाप्रमाणे हव्या त्या परिस्थितीच्या जोखडाखाली बिनतक्रार मान देण्याइतके निष्क्रीय आणि अचेतन होऊन बसले आहेत. प्रतिकाराची धमकच ठार मेल्यामुळे, हिंदुस्थानाचे स्वातंत्र्य भस्मसात् होऊन, आज हा अफाट भरतखंड परक्यांचा अक्षरश: गुलाम होन पडला आहे. परार्थ तर राहूद्याच, पण स्वार्थासाठी सुद्धा स्वतःचे अंग खरचटून घ्यायला जेथे कोणी तयार नाही, तेथे समाजासाठी, धर्मसाठी किंवा देशासाठी प्राण द्यायला कोण तयार होणार? वाटेल त्या बेमाणुसकीच्या परिस्थितीपुढे अथवा अपमानापुढे हिंदी लोक बिनशर्त मान बाकवितात, याचे कारण प्रचलित ज्योतिष शास्त्राने अगर ज्योतिष्यांनी फैलावलेल्या उपरोक्त भावनेतच आढळते. बरे, ज्योतिष्यांना टीकेच्या रिंगणावर धरावे तर ते म्हणतात की “आमच्या हातात शास्त्राशिवाय दुसरा आधार नाही. आम्ही भविष्य वर्तवतो म्हणून आम्ही काही देवदूत किंवा मोठे त्रिकलज्ञ देव नव्हेत. ज्योतिष हे एक सिद्ध शास्त्र आहे आणि केवळ गणिती आडाख्याने ग्रहांच्या गति विचारात गेऊन, त्यांचे परिणाम ते कथन करते. यांत आश्चर्य नाही, चमत्कार नाही किंवा अनुमान नाही. सारा गणिताचा गणिती प्रकार. १४ आणि ५ जसे १९ व्हायचे, २० व्हायचे नाहीत, का १८ व्हायचे नाहीत, तद्वत या शास्त्राचे ठोकताळे आहेत. प्रत्येक ग्रहाच्या दशेचे गुणधर्म विद्वान संशोधकांनी फार प्राचीन काळी निश्चित शोधनाने आणि अनुभवाने ठरविले आहेत आणि त्यांच पडताळे दररोज प्रत्यक्ष अनुभवाला येत आहेत. शनीची साडेसाती काय, राहूची महादशा काय, किंवा गुरूची महाकृपा काय, त्यांचे येणे जाणे त्यांच्या किंवा कोणाच्याहि लहरीवर किंवा काही अपघाता (अँक्सिडंट) वर अवलंबून नाही. शनिग्रह महाक्रूर असो, नाहीतर महाबावळट असो; गुरु हा ‘जन्टलमन ऑफ धी फर्स्ट रँक’ असो, नाहीतर बाबू चष्मेवाल्याच दिलदार दोस्त असो; घरी करमत नाही म्हणून हवी ती साळा तपासण्यास जाणार्या मुंबईच्या सन्मान्य म्युनिसिपल व्हिजिटरांप्रमाणे, बाराग्रहांपैकी एकाहि महात्म्याला, हवी तेव्हा ‘सरप्राईज व्हिजिट’ (अचंबा भेट) देता येत नाही. त्यांच्याहि भेटीगाठी गणिती एटकावर जखडलेल्या आहेत. प्रत्येक मनुष्याच्या जन्मकाळी आकाशात जी ग्रहस्थिति असेल, ती कागदावर खगोलज्ञ ज्योतिषी मांडतात. ती ग्रहस्थिति म्हणजे ज्या मनुष्याचा पिंड; आणि जन्मकाळापासून तो मरणकाळापर्यंत ब्रह्मांडात सर्व ग्रहांची जसजशी गति होत जाते, तसतशी त्या मनु,याच्या पिंडावर त्यांच बरी वाईट स्थिति उमटत असते. ग्रहदशेचा फेरा यात कसलाहि वाईट अर्थ नसून, ग्रह जसजसे सूर्याभोवती आपापल्या ठरावीक मार्गाने व ठरावीक गतीने फिरत असतात, त्या गतीची उर्फ फे-याची दशा, म्हणजे परिणाम. Influence of the Planets While on their orbits. ब्रह्मांडात सर्व ग्रहांचे परिभ्रमण घड्याळातील यंत्ररचनेप्रमाणे अखंड चालूच आहे आणि प्रत्येक मनुष्याच्या जन्मकुंडलीतील ग्रहस्थितिप्रमाणे त्या परिभ्रमणाचे परिणाम त्याच्यावर ठरावीक काली घडत असतात, घडलेच पाहिजेत; त्यांत अणूरेणू इतकीहि तफावत पडायची नाही. सगळा गणिती ठोकताळा.” मनुष्य जन्माला आला की त्या क्षणी निरनिराळे ग्रह आपापल्या परिभ्रमणात कोठेकोठे असतात, त्यांचा ज्योतिषीलोक एक नकाशा काढतात. हा नकाशा म्हणजे त्या मनुष्याची कुंडली. कुंडलीत ग्रह ज्या ज्या ठिकाणी असतील, त्या त्या स्थानमाहात्म्या प्रमाणे त्या मनुष्याची जन्मप्रकृति अथवा त्याचा पिंड बनतो.