शनिमहात्म्य: Page 4 of 85

गणपति निर्माण केला, तर त्यात आश्चर्य कशाचे ? तत्वज्ञानाचा साधा का सिद्धांत असे ना, किंवा आयुर्वेदातला सर्पदंशावरचा सोपा का उपाय असे ना, त्यावर द्राविडी प्राणायामी कवित्वाची जरताली झूल चढविल्याशिवाय कवींना चैनच पडायचे नाही. पुराणादि ग्रंथात आपणास ज्या अशक्य गोष्टी पदोपदी आढळतात, त्याचे कारण हेच. याचा परिणाम मात्र असा होऊन बसला आहे की ते ग्रंथ खरडताना कवीच्या काव्य-वेदनांचे जरी समाधान झाले, तरी आजच्या चिकित्साखोर वाचकांच्या निर्भिड भावनेला त्यातल्या काव्यमय विस्तार सुद्ध शिमगा वाटू लागला आहे. म्हणजे तत्वापरी तत्व गेले आणि गद्य प्रवृत्तीला पद्य पाचफळ ठरले. हां गेले हूं गेले आणि हाती धुपाटणे आले. पुराणात किंवा महात्म्य ग्रंथात त्या त्या कवीला एखाद्या मुद्यावर आपल्या श्रोत्या वाचकांचे आत्मप्रबोधन करावयाचे होते की निव्वळ कवित्वाची कंडू शमविण्यासाठी काहीतरी जाडजूड बाड प्रसवायचे होते, याचा आज तरी थांग लागत नाही. त्यामुळे अडाणी लोक पुराणातील अक्षर न् अक्षर वाजवी सत्य म्हणून शिरसावंद्य मानतात, तर शिक्षित विवेकवादी त्याचा भरंसाट म्हणून धि:कार करतात. अशी आजची स्थिती आहे.

या स्थितीत काही निश्चित सत्यशोधन करावे, निदान त्याचा नमुनेदार मार्ग दाखवावा अशी फार दिवस माझी इच्छा होती आणि त्या दिशेने माझे विचारयंत्र कामहि करीत होते. त्याचा परिणाम आज शनिमाहात्म्य-निरूपणांत होत आहे. ००० प्रकरण २ रे शनिमाहात्म्यच कां घेतले ? मी शनिमाहात्म्यच हाती कां घेतले ? प्रश्न व्यक्तीच्या निवडीचा असला, तरी त्याला काही भरीव कारणेहि असली पाहिजेत. ग्रंथकाराने किंवा वक्त्याने आपल्या जवळ कसला तरी नवविचार असल्याशिवाय लेखणी उचलू नये आणि तोंड उघडू नये, असे मत आहे. शनिमाहात्म्याची पारायणे करणारे लक्षावधि लोक या महाराष्ट्रात आहेत. तितकेच कदाचित टीकाकारहि (निंदक) असतील. या निंदक वंदकांच्या विचारात क्रांति घडवून आणण्याजोगा काहीतरी नवविचार माझ्या जवळ असल्याशिवाय मी या लेखनास प्रवृत्त झालो नाही खास. मी शनिमाहात्म्याचा आंधळा वंदक नव्हे आणि आंधळा निंदकहि नव्हे. मात्र प्रस्तुत ग्रंथातील विचार सरणीला माझी सध्याची परिस्थिति मूळ कारण झालेली आहे आणि तिच्या कठोर घर्षणातील एका चमकदार ठिणगीने शनिमाहात्म्याविषयी नवविचाराचा प्रफुल्ल दीप माझ्या मनोमंदीरात उजळला. ही गोष्ट प्रथमच सांगून टाकलेली बरी. या दिव्याच्या उजेडाने मला जे जे दिसले व अनुभवाला पटले ते ते प्रिय वाचकांच्या विचारक्रांतीसाठी नमूद करीत आहे. मी कट्टा दैववादी (फेटॅलिस्ट) नव्हे आणि कच्चा प्रयत्नवादीहि नव्हे. मला ज्योतिष्यशास्त्र अवगत नाही आणि त्यात डोके खुपसण्याचा मी कधी यत्नहि केला नाही. पण ज्योतिषशास्त्रात प्रवीण आणि स्वाध्यायशील असे माझे अनेक स्नेही आहेत आणि ते आपलेपणाच्या शुद्ध कळवळ्याने माझ्या कुंडलीचा अभ्यास करून, माझ्या चळवळींच्या भरती ओहोटीचे ठोकताळे अजमावीत असतात. कधी एकाद्या संकटाची आगामी सूचना देतात, तर कधी देत नाहीत, नुसते आडाखेच अजमावतात. या मित्रांच्या मताप्रमाणे सध्या माझ्यावर शनीची साडेसाती चालू असन गेल्या चार साडेचार वर्षात माझ्या चरित्रात घडलेल्या क्रांत्या तिचेच परिणाम होत. प्रयत्नांची कितीहि शिकस्त केली, धोरणांचे कितीहि व्यावहारीक पाचपेच लढविले आणि सबझूट मानून कर्तव्याच्या दिशेने कितीहि डुक्करमुसंड्या मारल्या, तरी साडेसातीची मुदत पूर्ण भरल्याशिवाय, कोणत्याही कार्याला यश येणार नाही, ते तडीला जाणार नाही, हवे ते उत्पाद घडतील, नसतील ती संकटे उद्भवतील, मित्र शत्रू बनतील, काय वाटेल ते होईल. आलेल्या किंवा येणा-या संकटांच्या उत्पत्ति स्थिति लयाला व्यावहारिक काहीहि कारणे घडली, तरी तो सारा साडेसातीचाच परिणाम. हातात सोने धरले तरी त्याची झटकून माती व्हायची. शनीच्या या साडेसातीच्या चक्रातून एकहि माणूस आजपर्यंत निसटू शकला नाही. माणसेच काय, पण संस्था गावे राष्ट्रे यानाहि राहू शनि मंगळादिकांची ग्रहदशा यथाक्रम यथाकाळ भोवल्याशिवाय चुकत नाही आणि त्यांनी ती भोगल्याशिवाय सुटका नाही, असे माझे ज्योतिषी मित्रच म्हणतात. असे नव्हे, तर सर्व धंदेबाज ज्योतिष्यांचेहि असेच म्हणणे आहे. म्हणजे याचा