शनिमहात्म्य: Page 3 of 85

नेत्रातून आनंदाश्रूंची अखंड दृष्टी पाडीत आहे. देवाची सेवा मजकडून आमरण अव्यंग व अभंग घडो ! अनंतचतुर्दशी, शके १८५० महाराष्ट्राचा दासानुदास दादर, ता. २८ सप्टेंबर १९२८ केशव सीताराम ठाकरे

----------------------------------------

प्रकरण १ ले

प्रास्ताविक

विचार हिंदुस्थानाचा पिंड काव्यमय किंवा काव्यप्रिय आहे. काव्याशिवाय त्याला पूर्वी काही स्फुरले नाही आणि आताहि काही सुचत नाही. काव्य म्हटले की हिंदुस्थानाला एक प्रकारची फुरफुरी येते. तत्वज्ञान, इतिहास, चरित्र, उपदेश काहीहि असो, त्याची काव्याच्या मधुर साच्यात मूस ओतल्याशिवाय पूर्वी हिंदुस्थानाला हायसे वाटले नाही, आजहि वाटत नाही. इर्ष असो, शोक असो, विषाद असो, अगर शृंगार वीर करुणादि नवरासांपैकी हवा तो रस असो, तो काव्यानेच आजपर्यंत रंगत आलेला आहे. फार काय, पण रोजच्या व्यवहारातला साधा पत्रव्यवहार सुद्धा कविताबद्ध केल्याशिवाय लेखक वाचकाचे समाधान होत नसे, आणि परस्परांच्या भावनांची किंवा विद्वेत्तेची परस्परांस साक्ष पटत नसे. यामुळे हिंदुस्थानातले सर्व प्राचीन व अगदी अलीकडे शंभर वर्षा पूर्वी पर्यंतचे अर्वाचीन वाड़मय एकजात कविताबद्ध. प्रोज ऊर्फ गद्य भाग भाग जवळजवळ नाहीच. त्याला बहिष्कार होता, असे नव्हे; तर लेखकांच्या पद्यमय भावनेच्या शेतांत गद्याचे बीज मुळी थरारणे शक्य नसे. हासायचे तरी पद्यात आणि रडायचेहि पद्यात. उपदेशाला कविता आणि शिव्याशापालाहि कविता. विषय शास्त्रीय असो, नटव्या शृंगाराचा असो, नाहीतर टाळकुट्या भक्तीचा असो, जिकडे पहाल तिकडे कविता कविता कविता. पद्यमय भाव पद्यमय वाणी । गद्याची कहाणी कोण ऐके ।। असाच तो मनु होता. यामुळे हिंदुस्थानच्या प्राचीन इतिहास शोधणाराल काव्यांचा भरंमसाट ताटव्यात भटक भटक भटकावे लागते. शंभर ताटव्यांतल्या हजार फुलांचा परामर्ष तो घेईल, तेव्हा कोठे एखाद्या तत्वाचा बिंदु सिद्धांत रूपाने त्याला गवसायचा. बोलून चालून ती काव्यसृष्टी. न देखे रवि ते देखे कवि. असल्या पद्याळ ब्रह्मदेवांच्या विशाळ विश्वात कोणीहि गद्याळ संशोधक भटकू लागला तर तेथील काव्यपरिमळातच मधुकरा प्रमाणे गुंगून जायचा. मग कसले संशोधन न् कसले निरीक्षण ! विशेषत: गोष्ट नीट ध्यानात घेतली पाहिजे की काव्य भरल्या पोटी निपजते. गद्य म्हणजे घोडयाची भरधाव. पोट भरले असो नाहीतर उपाशी असो, घोड्याची भरधाव केव्हाहि सुरू. काव्य सुचायला मात्र पोटपाण्याची ददात तिळमात्र खपायची नाही. पूर्वी हिंदुस्थान म्हणजे समृद्धीची कामधेनू असल्यामुळे येथे कद्यापेक्षा पद्याची पैदास मुबलक झाली.

सध्या हिंदुस्थानात पोटाचेच बण्ड भयंकर उद्भवल्यामुळे, पद्याची रुणझुणती नेपुरे अजीबात माजी पडून, सडक सीताराम अशा स्पष्टवाची गद्याचा नगारा सर्वत्र दणदणाट करीत आहे. हाण टिपरी की काढ दणका. त्याला काव्याचा चटकदार नखरा, तालदार गति, डौलदार भाषा आणि पैलुदार विचरा वगैरे दारांची भटक खटक मुळीच मानवत नाही. उघाडे नयन रम्य उषा हसत आली या काव्यमय वाणीपेक्षा “उजाडले. उठा. ” ही सडेतोड भाषा गद्याला मानवते. त्यामुळे वाचकाला किंवा श्रोत्याला अर्थबोधासाठी अन्वयाची यातायात शब्दकोशाशी माथेफोड आणि उत्प्रेक्षा अलंकाराच्या सराट्यातली पायपिटी नव्हे विचारपिटी करण्याचा प्रसंग येत नाही. आमचे पूर्वीचे सर्व वाड़मय काव्यमय असल्यामुळे, टीचभर सिद्धांत त्यावर चार हात उत्प्रेक्षा अलंकारांची भरगच्च सजावट, असा प्रकार फार. सांगायचे असते एक आणि कवीच्या कल्पना अनेक. ‘राजा निजून उठला’ ही एक जरी गोष्ट सांगायची असली, तरी उपमेसाठी विश्वासातल्या सा-या ग्रहांना आणि चंद्र सूर्याला खाली उतरून, कल्पनेच्या रंगभूमीवर त्यांचे एकादे साग्रसंगीत नाटक नटविल्याशिवाय कवीच्या काव्यवेदनांची खाज कधीच जिरायची नाही. आणि, कविराज एकदा का उपमांच्या आणि अलंकारांच्या ओघांत घसरणीला लागले की इकडे राजा निजून उठून ठसका लागून मेला, तरी यांचे “तो कसा निजून उठला” यावरचे प्रवचन बेफाम चालूच. निरंकुश: कवय: ! कवीला कशाची अटक नाही. जंगमाला त्यावर बनवून स्थावरला आकाशात गिरक्या मारायला लावणे कवीच्या हातचा मळ. कल्पनेच्या कसरतीने आकाशाला सुद्धा जे चहाची बशी बनविणारे, त्या कवींनी माणसाच्या धडावर हत्तीचे मुंडके बसवून, चार हाताचा