शनिमहात्म्य: Page 2 of 85

सृष्टीच्या कारभाराचा दण्डकच आहे.

(५) जसे पूर्वजन्मार्जित बरे वाईट संचित असेल, तसेत भोक्तृत्व या जन्मीं भोगल्याशिवाय सुटकाच नाही. पण त्यामुळे क्रीयमाणाचा अथवा पुरुषार्थाचा मार्ग डागळला जात नाही. तो मोकळाच असतो.

(६) केवळ एकांडा प्रयत्नवाद यशस्वी होतोच, असा सिद्धांत नाही. प्रयत्नवादाच्याहि पलीकडे देववाद म्हणून आहेच. दैववाद फोल असला, तरी देववादाकडे पाठ फिरवून एकांडा प्रयत्नवाद तडीला जात नाही. ‘ जो जो प्रयत्न रामाविण । तो तो दु:खास कारण.’

(७) प्रत्येक प्रयत्नाला ‘भगवंताचे अधिष्ठान ’ पाहिजे. भक्तीशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय कर्म यशस्वी होणार नाही.

(८) बाह्य परिस्थिति भडकली, तरी ‘अंतरिचा ज्ञानदिवा मालवूं नकोरे. ’ ग्रहदशेच्या परिणामांशी प्रतिकाराची टक्कर देण्यासाठी आत्मशक्तीचे चैतन्य दसपट शतपट वाढविले पाहिजे.

(९) आत्मशक्ती वाढविण्यासाठी समर्थ श्रीरामदासांनी सिद्ध करून दाखविलेली श्रीमारुती-उपासना हीच सर्वतोपरी समर्थ आहे. भीमरूपी बजरंगबली मारुतीरायाचे ‘धक्कधिंग ’ चारित्र्य उपासकाचा आत्मविश्वास आत्मशक्ती व आत्मचैतन्य वृद्धिंगत करून, त्याच्या हृदयात ‘राम ’ उत्पन्न करील.

(१०) सत्व आणि रज गुणांच्या फाजील प्रमाणाने हिंदुस्थानाचाआणि विशेषत: महाराष्ट्राचा घात झालेला आहे. आता तामस प्रवृत्तीचा विकास झाल्याशिवाय, ‘जगावे का मरावे ’ हा प्रश्न सुटणे कठीण आहे.

(११) शोकें शोक वाढे । हिमतीचे धीर गाढे ।। १ ।। येथें केले नव्हे काई । लंडीपण खोटे भाई ।। २ ।। करिती होया होय । परि नव्हे कोणी साह्य ।। ३ ।। तुका म्हणे घडी । साधिलिया एक थोडी ।। ४ ।।

थोडेसे आत्मनिवेदन प्रिय वाचक ! प्रस्तुतच्या ‘‘शनिमहात्म्य’’ पुस्तकात कै. गुरुवर्य आगरकरांची नितांत नास्तिक वृत्ति, ज्योतिषी लोकांची आंधळी आणि भेदरड प्रकृति, किंवा तात्याजी महिपतीची नैराश्यवाद-प्रवर्तक पौराणिक फलश्रुति, यांपैकी एकाहि मार्गाचा अवलंब मी केलेला नाही. केवळ एक संसारी, या नात्याने माझ्या प्रत्यक्ष अनुभवाला जे जे आले आणि स्वाध्याय चिंतनाने मी त्यांचा जसा जितका विचार केला, तोच विचारांचा शब्दपट वाचकांपुढे प्रणिपातपूर्वक मी उघडून ठेवीत आहे. प्रत्येक प्रकरण म्हणजे माझ्या विचार व आचार क्रांन्तीचे एकेक चढती पायरी असल्यामुळे, ‘ग्रहदशेच्या फे-याचा उलगडा’ मी कोणत्या रीतीने केला, याची वाचकांना स्पष्ट कल्पना येईल. शनिमाहात्म्यावर मी विचार करू लागल्या दिवसापासून तों हे पुस्तक लिहून हातावेगळे होईपर्यंत, माझ्या बावरलेल्या चित्तवृत्तीला असामान्य शांति स्थैर्य व धैर्य प्राप्त झाले. माझ्या परिस्थितीतल्या प्रत्येक वाचकास, या पुस्तकाच्या मननपूर्वक वाचनाने, तोच अनुभव यईल, अशी माझी खात्री आहे. केवळ काहीतरी वाचायचे म्हणून हे पुस्तक वाचणारांना, त्यातली आत्मियत्वाची तिडीक उमगणे शक्य नाही. ज्याला जन्मात कधी ओरखड्याचा अनुभव नाही, त्याने दुस-याच्या जखमेची टायली खुशाल करावी ! प्रस्तुत पुस्तकाचे मुद्रण अनेक अडचणींतून ताऊन सुलाखून झालेले आहे. ‘शनिमाहात्म्या’ला ‘विक्रम’ छापखानाच भेटावा, हा योग सुद्धा विचार करण्यासारखाच आहे. आजपर्यंतच्या माझ्या पुस्तकांची छपाई व उठाव यांच्या मानाने, हे पुस्तक बरेच गबाळ दिसेल. पण त्याला माझा नाईलाज आहे.

जेथे परिस्थितीने माझी व घरच्या अपत्यांचीहि सर्व बाजूंनी हेळसांड व आबाळ केली, तेथे हे पुस्तकरुपी अपत्य सुद्धा गबाळ अवस्थेत बाहेर कां पडू नये ? माझ्या आश्रयदात्यांचे मजवली अकृत्रिम प्रेम आणि वाढता विश्वास, प्रतिकुळ परिस्थितीच्या अज्ञातवासात जन्मलेल्या या माझ्या अपत्याचा योग्य तो सत्कार करतील, अशी मला आशा आहे. नाठाळ अपकारकर्त्यांपेक्षा स्नेहाळ उपकारकर्त्यांची संख्या मला फार मोठी लाभलेली आहे, ही श्रीहरीचा मजवर मोठा प्रसादच होय. प्रस्तुत पुस्तकाची कल्पना निघाल्यापासून तों ते आज प्रसिद्ध होईपर्यंत अनेक मित्रांनी मला अनेक प्रकारचे सहाय दिले. त्या सर्वांच्या चरणी मी आदरपूर्वक माथा ठेवून, माझ्या हृदयस्थ कृतज्ञ भावनांना व्यक्त करीत आहे. विशेषत; गेल्या नऊ महिन्याच्या माझ्या अज्ञातवासाच्या काळ्याकुट्ट काळात, प्रबोधनाच्या हजारो आश्रयदात्यांनी मुद्दाम क्षेमसमाचार पुसला, मला उत्तेजनाचे संदेश व भेटी दिल्या, आणि कित्येकांनी सांपत्तिक मदत पाठविली, ही जनता-जनार्दनाची कृपादृष्टी माझ्या