शनिमहात्म्य

 प्रबोधनकारांची एखाद्या विषयाची केलेली चिकित्सा ही मुलखावेगळी असायची. कारण त्याला कोणत्याही एका विचारधारेत बांधता येत नसे. त्यामुळे ती सनातन्यांना सुधारकी वाटायची आणि सुधारक्यांना सनातनी. याचं उत्तम उदाहरण म्हणजे शनिमहात्म्य अर्थात ग्रहदशेच्या फे-यांचा उलगडा. यात प्रबोधनकारांनी आपल्या पडत्या काळातल्या आयुष्याचे वर्णन केलंय, तेही आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे.

----------------------------------------

|| जय जय रघुवीर समर्थ ||

शनिमाहात्म्य अर्थात ग्रहदशेच्या फे-यांच्या उलगडा

लेखक - केशव सीताराम ठाकरे

संपादक : प्रबोधन आणि लोकहितवादी प्रकाशन, बाळ आणि कंपनी मुंबई नं. १४

किंमत दीड रुपया. All Rights Reserved by Author Printed by M. C. Lele B. A. at Vikram P. press Girgaon. Bombay, No. 4 Published by Messrs, Bal & Co. by Prabhakar Gopal Chitre 10 Miranda’s Chawl, Dadar, Bombay No. 14 पुस्तकें मागविण्याचा पत्ता बाळ आणि कंपनी १० मिरांडाची चाळ, दादर, मुंबई नं. १४.

----------------------------------------

सच्चिदानंद-विलीन श्रीराममारुती महराज. वृत्ती हनुमंताची शक्तीने भीम भक्ति रामाची | प्रीती हरिनामाची कीर्ती श्रीमारुती यांची || ज्यांच्या कृपाप्रसादें बदलो हे चार बोबडे बोल | अर्पण त्यांचे त्यांना, गुरुमहिम्याचे कसे करू मोल ||

----------------------------------------

प्रबोधनकार ठाकरे कृत शनिमाहात्म्याला शनिग्रहाचा आशीर्वाद.

माझ्या सत्य स्वरुपाचा इतिहास । तूं श्रुत करावा महाराष्ट्रास । नैराश्याचा सोडवला फास । म्हणोनी आलो तव राशी ।। १ ।।

आजवरी छळिले पुष्कळ । परंतु सगळे अजागळ । कल्पना करिती बाष्फळ । माझ्या चरित्राची ।। २ ।।

ज्योतिषी वर्तविता साडेसाती । यांच्या विझती ज्ञानज्योती । निष्क्रीय निर्बल होऊनि जाती । आत्महत्यारी करंटे ।। ३ ।।

नाही ज्ञान ना विश्वास । नाही स्वाध्यायाचा हव्यास । पारखे जे विचारास । आचार कैसा घडेल त्या ? ।। ४ ।।

प्रारब्ध भोगणे संचितापरी । क्रीया माणाची नवलपरी । पुरुषार्थाची तिखट सुरी । संचितासहि खंडिते ।। ५।।

तुलाहि नव्हते हे ज्ञान । वाढलासि प्रचंड पाषाण । म्हणोनि हाणिला क्लेश-घण । प्रबोधावया तुजलागी ।। ६ ।।

संकटांची ठिणगी पडता । ज्ञानदीप पेटला तत्वता । संक्रांतीला क्रांन्ति घडता । जन-प्रबोधनीं फुरफुरशी ।। ७ ।।

चिकित्सेला लाऊन धार । केला चिंतनाचा विस्तार । विचारांसवे प्रत्यक्ष आचार । क्लेश-घर्षणीं पाजळिला ।। ८ ।।

टाकिता समर्थं-चरणी भार । हनुमत करी बुभु:कार । त्याने केला ग्रंथविस्तार । अभिनव शनिमाहात्म्य ।। ९ ।।

आत्मराज जैसा बोले । तैशी तुझी लेखणी हाले । साडेसातीचे सार्थक झाले । जनता जनार्दन पूजिला ।। १० ।।

मुख्य भगवंताचे अधिष्ठान । उपासना हनुमंत-भजन । मार्ग दावीला हा ग्रंथ जाण । निश्चये करोनि सर्वांसी ।। ११ ।। ।।

बजरंग बली की जय ।।

----------------------------------------

थोडक्यात फार अथवा ग्रंथाचे सार.

(१) आकाशस्थ नवग्रहांचे बरे वाईट परिणाम मनुष्यांवर त्यांच्या त्यांच्या कुंडलीतील ग्रहमानाप्रमाणे होतात. त्यातल्या त्यात शनीचे परिणाम विशेष दृश्य आणि तापदायक होतात.

(२) ते टाळण्याचा किंवा सहननीय करण्याचा म्हणजे तात्याजी महिपतिकृत ३८८ ओव्यांचे ‘शनिमाहात्म्य ’ चोपडे खास नव्हे. या चोपड्याच्या पारायणाने मनुष्य निराशावादी आणि आत्मद्रोही बनतो. कारण त्यात आशावादाचा किंवा आत्मचैतन्याचा एक शब्दसुद्धा नाही. (३) आपत्ति संकटे क्लेश इत्यादि परिस्थितीचे विपरित किंवा प्रतिकूळ प्रसंग म्हणजे ईश्वरी क्षोभ मानणे, किंवा त्यामुळे ईश्वरी न्यायाला दोष देणे, अविचाराचे आहे. अशा परिस्थितीच मनुष्याच्या सत्वाची खरी पारख होऊन, त्याची माणुसकी कसाला लागते. जो सत्वाला पारखा झाला, तो जिवंत असूनहि मेला. जो निश्चयाने, धैर्याने व शांत वृत्तीने त्यांना तोंड देत गेला, तोच मर्द आणि तोच खरा वीर.

(४) परिस्थितीला कंटाळून जो आत्महत्येसारखा भ्याड मार्ग पत्करतो, त्याची किंमत तितकीच. लोकसंख्येची असली भरताड कमी झाल्याबद्दल आनंद मानावा ‘जबरदस्ताचा टिकाव हा