रायगड यात्रा दर्शन माहिती : Page 8 of 20

जगदीश्वर मंदीराविषयी काही सांगायचे विसरलो. हे एक हेमाडपंती घाटाचे महादेवाचे मंदीर आहे. त्याचे चिंरेबंदी प्रवेशव्दार प्रेक्षणीय नि भव्य असून, तेथेच या लेखाच्या शिराभागी दिलेला संस्कृत श्लोक वळणदार बालबोध अक्षरानी खोदलेला आहे. या मंदिराचे बांधकाम हिराजी याने केले, असा उंबरठ्यावरहि एक छोटा लेख आहे. आत प्रशस्त आवार असून तेथल्या प्रचंड नंदीचा पुढला भाग कोणीतरी फोडलेला आहे. गाभा-यातली जागा नेहमी पाणथळ असते. अस्मानी सुलतानीच्या वेळी साळुंक्यावरचे शिवलिंग पळवण्यात आले होते म्हणतात. आता आहे ते मागाहून कोणीतरी नव्याने बसवलेले आहे. मंदिरात निजण्या-बसण्याची सोय आहे. सूर्यास्ताचा दिसणारा चमत्कार. समाधीकडून बालेकिल्ल्याच्या नगारखान्याकडे म्हणजे गडाच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे काठ्या ठोकीत जात असताना, कित्येक ठिकाणी ठक् ठक् तर पुष्कळ जागी डब् डब् असे जमिनीचे आवाज येतात. डब डब आवाजाची जागा अर्थात आतून पोखरलेली असावी. गडावर असताना शिवाजी महाराज, जिजाबाई व ईतर कुटुंबीय महादेवाचे दर्शन घेतल्याशिवाय अन्न घेत नसत.

रायगडावर भुयारांचा सुळसुळाट फार. राजधानीच ती. तेव्हा गुप्त भुयारे, खलबतखाने, पळवाटा, चोरवाटा यांचा बंदोबस्त भरपूर ठेवणे अगत्याचेच होते. वास्तविक बालेकिल्ला धर्मशाळेच्या अगदी जवळ गंगासागराच्या काठावर. पण आम्हाला समाधीच्या दर्शनाची उत्कंठा अतिशय तळमळीची म्हणून तो पहाण्याचे काम दुस-या दिवसावर सोपवून प्रथम आम्ही पूर्वेकडे धावलो. आता फक्त सूर्यास्ताची मौज पदाण्यासाठी किल्ल्याच्या नगारखान्याकडे धावलो. रायगडावरून मुंबईच्या समुद्रात होणारा सूर्यास्ताचा देखावा म्हणजे निसर्गाची एक प्रेक्षणीय चमत्कृतीच होय. सागराच्या पृष्ठभागाजवळ सूर्य येऊ लागला म्हणजे त्याचे अनेक आकार होतात. प्रथम रांजणासारखा, मग हॅट टोपीसारखा, नंतर दोन बाजूना लहान कड्या असलेल्या फुलांच्या कुंडीसारखा, मागाहून सोन्याच्या कास्केट करंडकासारखा,होडीसारखा, असे कितीतरी निरनिराळे आकार नि प्रकार नगारखान्याच्या शिखरावरून आम्ही पाहिले. याच वेळी फक्त गडावरून समुद्र दिसतो आणि सूर्याची सोनेरी किरणे पाण्यावर तरंगताना पहायला मिळतात. अंधार पडू लागल्यामुळे यात्रेकरू शिबिरात परतले. भोजनोत्तर चांदण्यात गप्पासप्पा, काव्यविनोद, सोपानदेवांचे उपहासगर्भ विनोदी काव्यगायन वगैरेचा भरपूर रसास्वाद घेतल्यावर सगळे निद्राधीन झाले. सूर्यास्ताप्रमाणे सूर्योदयाचीहि रायगडावर मौज असते. नगारखान्याच्या महाद्वाराच्या कमाणीतून थेट समोर दिसणा-या तोरणा किल्ल्याच्या माथ्यावर अरुणोदयाची प्रभा फाकते नि सूर्योदयाची किरणे त्याला प्रथम सोनेरी किरीट चढवतात. याचे चलच्चित्रण करण्यासाठी अगदी झुंजु-मुंजू होताच निघायचे असा चंद्रशेखर पार्टीचा बेत ठरला होता. पण सबंध दिवसाच्या श्रमाने त्याना खरपूस झोप लागली आणि ते धडपडत उठून धावले, तरी कॅमेरा वगैरे काढून तो रोखण्याच्या आधीच तो चमत्कार घडला. फक्त डोळ्यानी त्यानी पाहिला इतकेच. गडावर एकहि पक्षी आम्हाला दिसला नाही. गडावरचे हे एक नवलच. चिमणी नाही, घार नाही, फार काय पण ईश्वराप्रमाणे जळी स्थळी काष्ठी पाषाणी नेहमी आढळणारा कावळाहि गडावर कोठे दिसला नाही. शिखराखाली हजार फुटावर एक दोन घारी तळपताना दिसल्या. टकमकीवरून खोल खालवरच्या भूप्रदेशाचा सिनेफोटो घेताना चंद्रशेखरांच्या फिल्मेत त्या पकडलेल्या आहेत.

विंचू काटा साप यांचाहि गडावर उपसर्ग नाही, असे धनगर सांगत होते. कधीमधी वाघोबाची खारी फेरफटक्याला येते. पण आमचे दर्शन घेण्याची त्याना कोठेच लहर लागली नाही. (दि.26-12-1949 सोमवारचा कार्यक्रम.) बालेकिल्ल्याची सर्वसाधारण माहिती. ( रायगडाच्या पठाराची पूर्व-पश्चिम लांबी दीड मैल आणि दक्षिणोत्तर रुंदी एक मैल आहे. उत्तरेला टकमक आणि पूर्वेला भवानी नावाची टोके प्रसिद्ध आहेत.) समाधीच्या खालच्या आंगाला श्रीभवानी देवीचे गुहेसारखे एक स्थान असून, चिंतनासाठी शिवाजी महाराज तेथे जाऊन बसत असत, असे सांगतात. हे अतिशय अवघड जागेचे ठिकाण असल्यामुळे, तेथे जाण्याच्या खटाटोपात कोणी फारसे पडत नाहीत.

आमच्यपैकी एका दोघानी तिकडे जाण्याचा ' तानाजी बेत ' करताच, सोबतच्या महार बांधवानी तसे न करण्याविषयी निक्षून सांगितले. धनगरानीहि कानावर हात ठेवले. होळीचे मैदान. दहा हजार माणसे सहज बसतील एवढे हे मैदान किल्ला आणि नागप्पा पेठ यांच्या मध्यावर आहे. आता नुसते ओसाड मैदानच असले, तरी पूर्वी येथे शिमग्यानिमित्त किंवा