रायगड यात्रा दर्शन माहिती : Page 7 of 20

धाडस केले नि ते कुदळ्या मारुन पळाले. अखेर मुंबईचे शिवभक्त कै. महाशय बाळकृष्ण मोरेश्वर ऊर्फ तात्यासाहेब सुळे इंजिनीयर यानी हिरिरीने ते काम पत्करले आणि पुष्कळ त्रास अडचणी सोसून ते पुरे केले. कामगाराना निष्कारण रोजच्या रोज गडाची चढ उतर होऊ नये, एवढ्यासाठी तात्या सुळे रोज रात्री महाडला परत यायचे आणि दुसरे दिवशी पहाटेस कामगारांच्या शिध्याचे गाठोडे पाठीशी बांधून गडावर जायचे.आजच्या घुमटदार समाधीचा प्लॅन सुद्धा तात्यानीच तयार केलेला होता. समाधीचा पाया खोदण्याचे काम चालू असता 12 फूट खोलीवर पहार अडू लागली. श्री. तात्यानी आसपासचा भाग हलक्या हातानी मोकळा करवला, तेव्हा दोन कमानीवर एक शिळा नि आत पेटीसारखे काही आढळले. शिळा दूर करताच पेटीत शिवरायाच्या अस्थि नि रक्षा नीट जपून ठेवलेल्या सापडल्या. आजूबाजूला राखेचे ढिगार पडलेले होते. सुळे यानी अस्थि नि रक्षा पुन्हा भक्कम बंदोबस्ताने आत पुरल्या. पण बाकीची राख ब्रिटिश सरकारने पेट्याच्या पेट्या भरून गडावरून खाली नेली त्याचे काय झाले समजले नाही. समाधि-दर्शनाचा आमचा आनंद. समाधीजवळ येताच महाराजांच्या जयजयकाराचा नुसता हलकल्होळ उडवला सगळ्यानी. सर्वानी आधी त्या महाराष्ट्राच्या मायबापाच्या समाधीवर साष्टांग प्रणिपाताने कपाळे घासली. डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. आमच्या अंतश्र्चक्षूंपुढे 275 वर्षांपूर्वीचा शिवशाही पराक्रमांचा नि वैभवाचा इतिहास चलचित्रपटासारखा भराभर खेळू लागला. जवळच समोर महाराजांच्या इमानी वाघ्या कुत्र्याची सुंदर समाधि महाशय श्रीमंत तुकोजीराव होळकर आणि सौ. शर्मिष्ठादेवी होळकर यानी 5 हजार रुपये खर्चून बांधलेली आहे. त्या समाधीच्या माथ्यावर त्या इमानी श्वानाची ब्रांझ धातूची, पुढचे पाय उभे ठेवून महाराजांच्या समाधीकडे टक लावून पहात बसलेली प्रतिमा पहाताच सगळ्यांच्या डोळ्याना टचकन पाणी फुटले आणि त्या इमानी जीवाला प्रणिपात करायला हात चटकन जुळले. वाघ्या कुत्र्याची समाधि. असा शिलालेख या समाधीवर लिहिलेला आहे. या समाधीच्या उपक्रमाच्या कामी महाशय अनंतराव चित्रे आणि सुरेन्द्र गोविंद टिपणीस यांचेच परिश्रम मख्यत्वे खर्ची पडलेले आहेत. येथील वस्तूची किंवा वास्तूची नासधूस करणारावर खटला भरण्याची जीर्णवस्तुसंरक्षक सरकारी खात्याची कायदेशीर धमकी जागोजाग पाट्या ठोकून जाहीर झालेली असली, तरी त्या वस्तूंची अथवा वास्तूंची निगा राखण्याचा सरकारी बंदोबस्त काही नाही.

महाराजांच्या नि वाघ्याच्या समाधीवरचे शिलालेख काळे डाग पडून खराब झाले होते. समाधीभोवतालची जागा ढोरांच्या शेणानी नि काट्याकुट्यानी भरून गेली होती. कोणीहि याची तपासपूस किंवा झाडलोट करीत नाही. बरोबर आहे. धोबीका कुत्ता, ना घरका ना दारका ! शिवाजीने कमावलेल्या स्वराज्याच्या आयत्या बिळात वारसदारीच्या अपघाती पुण्याईने नागोबासारखे फुसफुसणारे शेकडो म-हाठे संस्थानिक महाराष्टात आहेत ( आता 'होते' म्हटले पाहिजे ), त्या लेकाच्यानी कधी केली रायगडाची काही कदर ? म-हाठी जनतेचे काय ! मूळचीच ती दरिद्री ! तिला कितीही लाज शरम वाटली, तरी व्यवहाराच्या बाजारात शरम थोडीच चलनी नाणे ठरणार आहे ? प्रतिमेची पूजाअर्चा. आम्ही सगळ्यानी पाणी आणून समाधि नि शिलालेख स्वच्छ धुऊन काढले. आजूबाजूची जागा शक्य तेवढी सराट्यानी झाडून साफ केली. इंजिनियर तात्या सुळे यांची कन्या कु. सिंधू नि तिच्याबरोबर आलेल्या कुमारिकानी हळद कुंकू गंधाक्षता फुले ऊदधूपादिकानी महाराजांच्या प्रतिमेची पूजा केली. महाशय चंद्रशेखर आणि मी दोघानी हातांत नारळ घेऊन छत्रपति श्रीशिवाजी महाराजकी जय या गर्जनेत ते फोडले. सोपानदेव चौधरीनी त्याच गर्जनेच्या तारस्वरात ललकारी मारून शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा पोवाडा पहाडी आवाजाने गाऊन तेथले सारे वातावरण महाराष्ट्राभिमानाने थरारवून सोडले. प्रसाद वाटल्यावर झटपट पावलानी सूर्यास्ताचा चमत्कार पहाण्यासाठी आम्ही नगारखान्याकडे निघालो. सूर्य अस्ताचलाकडे कलंडला होता. पश्चिमेकडच्या डोंगरांच्या उंचउंच टेकडांचे विशाळ कवडसे पूर्वेकडील डोंगरांच्या रांगांवर पडले होते. जणू काय, काळ्या रंगात बुचकळलेल्या ब्रशाने सतरंजीच्या पट्ट्यासारखे जाडजूड पट्टेच चिता-याने ओढल्यासारखे ते दिसत होते. काय मनुष्यस्वभाव आहे पहा ! समाधीच्या दर्शनपूजनात गर्क झाल्यामुळे , जवळच दहा पंधरा हातांवर उभ्या असलेल्या विशाळ