रायगड यात्रा दर्शन माहिती : Page 6 of 20

होत गेलेला अवघा 15-16 फूट रुंदीचा पायरस्ता. ना झाड ना झाडोरा आसपास. वारा वहात असला तर इकडे ढोरसुद्धा चुकून फिरकायचे नाहीं, तर माणसाची कथा काय ? वा-याचा झोत नसेल तर शेवटच्या टोकापर्यन्त धीराचा माणूस जाऊ शकतो. वरून खाली कोठेहि नजर टाकली तर ठरत नाही. डोळे फिरतात. पण 3 हजार फूट खोलावरचा गावांच्या मनोहर पुंजक्यांचा, शेतमळ्यांचा, मधून नागिणीप्रमाणे वहाणा-या नदीचा तो रम्य निसर्गपट पाहिला का डोळ्यांचे पारणे फिटते.

उघडलेली छत्री घेऊन टकमकीवर जाणे फारच धोक्याचे. वा-याने छत्री उडवली का छत्रीधराचा निमिषार्धात झालाच समजा कडेलोट. "छत्रीचा दांडा सोडू नकोस." एकदा शिवाजी महाराज गडाच्या पहाणीसाठी टकमक टेकडीवर गेले असता, त्यांच्यावर उंच दांड्याची मोठी रेशमी भरजरी छत्री धरणारा हुज-या वा-याच्या झोताने अचानक कड्याबाहेर फेकला गेला. महाराज एकदम मोठ्याने गर्जून ओरडले- "घाबरू नकोस. छत्रीचा दांडा सोडू नकोस. घट्ट धरून ठेव." झाले. तो हुज-या दांडा घट्ट धरून वा-याच्या झोतावर तरंगत तरंगत पायथ्यशी असलेल्या निजामपूर गावात सुखरूप उतरला. तेव्हापासून त्या गावाला छत्री-निजामपूर हे नाव पडले. शिवरायांच्या या प्रसंगसावधानावरून पॅराशूटची कल्पना जुनी का नवी हा प्रश्न पडतो. महाशय चंद्रशेखरानी या टकमकीचे सर्वांग - चित्रीकरण मोठ्या धाडसाने केले. चारपाच इसमानी त्यांचे पाय नि कपडे मागे खेचून धरलेले आणि हा धाडसी पठ्ठ्या टकमकीच्या थेट अखेरच्या चिंचोळ्या टोकावर उपडा पडून 20 पौंड वजनाचा सिनेकॅमेरा चालवीत आहे. हे दृष्य पाहून "अरे, याना जीव द्यायचा आहे की काय ?" अशी सुरबा टिपणिसानी धमकीच्या भयंकर कर्कश आरोळी ठोकली. काम पुरे केल्यावर चंद्रशेखर म्हणाले- " शिवरायाच्या कृपेने माझे चित्रण यशवंत झाले. अहो, असा योग येणार कधी ? समजा, या धाडसात मेलो असतो, तरी शिवरायांच्या समाधीजवळ माझी म-हाठ्याची हाडे पडली असती. आहे कुठे असला योग माझ्या नशिबात ? " सूर्य कलंडला. साडेतीनचा सुमार. टकमकीकडून आम्ही महाराजांच्या समाधि-स्थानाकडे जायला निघालो. याच वेळी कर्णिक, भुलेसकर, आवळसकर मास्तर आणि त्यांचे वाटाडे रघू टिपणीस परत जाण्यासाठी गड उतरू लागले होते. महाद्वाराच्या बुरजावरून त्यानी आम्हाला जयजयकाराची हारळी दिली. आम्हीहि टकमकीवरून जय महाराष्ट्राचा जबाब दिला. समाधीचा थोडासा इतिहास. नागप्पा पेठेपासून ईशान्येकडे जगदीश्वराच्या देवळाचे नि समाधीचे कळस स्पष्ट दिसू लागतात. मूळ समाधीचा पूर्वी नुसता चिरेबंदी चौथराच होता. हासुद्धा कित्येक वर्षे उकीरडा नि झुडपांच्या जाळीखाली गडप झालेला होता. सुप्रसिद्ध मराठी नट कै. यशवंतराव टिपणीस यांचे वडील बंधू कै. तात्या टिपणीस कट्टर शिवभक्त. सन 1896-97 साली टिळकांची शिवाजी उत्सवाची चळवळ चालू झाली असताना त्यानी एक दिवशी तो समाधीचा चौथरा हुडकून उरकून बाहेर काढला आणि तेथे भगवा झेण्डा फडकत ठेवला. त्याचे काही दगड निखळले होते.

मुंबईचे पारशी इतिहास-संशोधक करकेरिया यानी स्थानिक इंग्रजी वृत्तपत्रांत लेख लिहून मुंबई सरकारचे नि म-हाठी जनतेचे त्या दुर्दशेकडे लक्ष वेधले. तेव्हा समाधीभोवती कुंपण घालून तिच्या जुजबी दुरुस्तीसाठी महाड तालुका कचेरीतून दर साल पाच रुपये ( पाचशे किंवा पाच हजार नव्हेत हो फक्त पाच रुपये. ) इंग्रज बहादुर सरकारातून सांकशन झाले. लोकमान्य टिळकानी हा समाधिदुरुस्तीचा प्रश्न हातात घेऊन बराचसा फंड जमवला. तो पुण्याची डेक्कन बॅंक आणि सरदार नातू यांचेकडे अमानत ठेवला. पुढे त्या बॅंकेचे निघाले दिवाळे आणि रुपयाला अवघे 9 आणे टिळकांच्या हातात परत आले. दुरुस्ती करायची, त्यालाहि सरकारची परवानगी हवीच होती. कारण रायगड पडला सरकारच्या मालकीचा जंगल विभाग. ती परवानगी येता येता सन 1925 साल उजाडले. अखेर सरकारी पहाणी झाल्यावर, उरलेल्या फंडातर्फे रोख 14 हजार रुपये सरकारकडे भरणा करण्यात आले. फंड लोकांचा, पण समाधीचे काम करणार सरकार . कायदाच पडला तसा ! आधी रायगडासारख्या अवघड चढणीच्या ठिकाणचे समाधीचे बांधकामाचे कंत्राटच कोणी घेईना. एका दोघानी