रायगड यात्रा दर्शन माहिती : Page 5 of 20

पाठीमागे स्वयंपाकासाठी पत्र्याची एक मोठी शेड बांधलेली आहे. जवळच गंगासागर तलाव असल्यामुळे पाण्याची सोय उत्तमच. येथली व्यवस्था दरमहा 15 रुपये पगारावर पाचाडचा शेडगा नावाचा दाढीवाला बुवा पहात असतो. प्रवासी गड चढू लागले म्हणजे शेडग्याचा माणूस आपणहून पुढे जातो आणि सर्व व्यवस्था ठेवतो. असा त्याचा करार आहे. पाचाडच्या महार बांधवांकडे स्वयंपाकाची कामगिरी सोपवून, आम्ही न्याहारीच्या खटपटीला लागलो. गडावर धनगरांची वसति आहे. रानटी काट्याकुट्यानी मढवलेल्या त्यांच्या झोपड्या 3-4 ठिकाणी दिसल्या. त्यानी पाळलेल्या गाई म्हशी तमाम गडावर सगळीकडे चरत भटकत असतात. ताजे दूध दही ताक लोणी त्यांच्याकडे मुबलक मिळते. त्यांचा तो व्यापारच आहे. मात्र नवख्या माणसानी त्यांच्याशी व्यवहार करणे फार कठीण जाते. दहीदुधाच्या गाडग्याचे अडीज रुपये सांगून, अखेर खाराखिरीच्या कपाळफोडीने ते अवघ्या 10-12 आण्यात विकणारी ती धनगर मंडळी ( बाया नि बुवा ) आपल्या व्यापारात किती बेरकी असतील, याची कल्पना करावी. विद्यमान राजवटप्राप्त चहाचे गुळवणी धोटण्यापेक्षा, मडक्यांत उकळवलेले गरमागरम दूध पोटभर पिऊन न्याहारी केल्यावर, टोळीटोळीने मंडळी गडसंचारासाठी बाहेर पडली. आमच्यापैंकी तिघाचौघाना दुपारीच महाडला परतायचे होते. ते सामाईक न्याहारीची वाट न पहाता आधीच पुढे सटकले. गंगासागर तलाव रायगडावर हेच एक दर्शनीय स्थान आता उरले आहे. गडावर लहान मोठी अनेक तळी आहेत. पण गंगासागराइतका पाण्याचा स्वच्छ अखंड नि मुबलक पुरवठा कोठेहि नाही. गंगासागर शिवाजीमहाराजांनी बांधला. त्याला बाराही महिने पाणी असते.

माघ महिना उजाडला का बाकीची सारी निर्जल होतात. गंगासागर कातळात उकरलेला आहे. तो 360 फूट लांब नि 300 फूट रुंद आहे. बराच खोल असल्यामुळे तेथे रायगडच्या अखेर क्रांतीत खजिना बुडवल्याची दंतकथा आहे. गंगासागरात स्नान करावे, अशी सगळ्यांची इच्छा होती. पण डिसेम्बर महिन्याचा थंडीचा कडाका होता तो. पाण्यात बोट बुचकळताच अशा काही महि-या आल्या का तो वेत मानसिक स्नानावरच उरकावा लागला. उन्हाळ्यात मात्र गंगासागराचे स्नान आल्हादकारकच असणार, यात संशयच नको. नागप्पापेठ ऊर्फ बाजारपेठ. होळीच्या मैदानाला लागूनच ही सरळच दीड फर्लागांची बाजारपेठ पाहिली का मुंबईच्या हॉर्नबी रोडची आठवण होते. तसाच रूंद राजरस्ता. दोनी बाजूना फूटपाथ आणि एकसांची एकरकमी चिरेबंदी दुकानांची रांगच्या रांग. उंच ओट्यावर माल मांडण्याची दर्शनी ओसरी, आतल्या बाजूला साठा आणि त्यामागील खोलीत व्यापा-याने गि-हाइकाशी घाऊक व्यापाराची बोलचाल करण्याची बैठकीची जागा, असा थाट. मावळत्या बाजूच्या दुकानांची पिछाडी पीलखान्याकडे, पण उगवत्या बाजूच्या दुकानांची मागली दारे थेट तुटत्या कड्यावर. नागप्पापेठ पहाताच शिवरायाच्या नगर-रचनेच्या अभिरूचीचे किती कौतुक करावे असे वाटते. सध्या पेठेच्या दुकानांची भयंकरच पडझड झालेली, तरी त्यांचे चिरेबंदी कोरणीचे पाचे आणि भिंताडांचे शिलकी अवशेष पेठेची कल्पना चांगलीच देतात. रायगड कमेटीने या जागेच्या तोंडावर 'बाजार पेठ' अशी पाटी मारलेली असली, तरी तिचे मूळ नाव नागप्पा पेठ असेच होते. नागप्पा नावाचा एक प्रसिद्ध पुढारी व्यापारी होता. त्याचे स्मारक म्हणून नागाचे चित्र कोरलेली एक प्रचंड शिळा कोठेतरी असल्याचे आम्हाला समजले. पुष्कळ शोध केला तेव्हा एका काटेरी झुडपाच्या जाळीत ती वाकडी तिकडी पडलेली आढळली. या नागप्पाशेटीचे आडणाव खांडेकर असून त्याचे वंशज छत्रनिजामपूर जवळ एका गावी रहात आहेत. पेठेच्या तोंडाशीच ' पीलखाना " ( म्हणजे हत्ती बांधण्याची जागा ) अशी पाटी मारलेली चौफेर दगडी भिंताडाची जागा आहे. ती वखारीची जागा असावी. हत्तीखाना बांधण्याचे स्थापत्यतंत्र तेथे मुळीच दिसत नाहीं. टकमक टेकडी नागप्पा पेठेचे निरीक्षण करीत करीत मंडळी टकमक टेकडीजवळ आली. सामान्य निरीक्षणाबरोबरच महाशय चंद्रशेखर यांचे चलचित्रलेखनाचे काम सारखे चालूच होते. त्यानी सबंध रायगडाची तपशीलवार फिल्म घेतली आहे. तीन बाजूनी तुटलेल्या अंदाजे 3 हजार फूट खोल कड्यांची ही टेकडी रायगडाची भव्यता नि उग्रता दर्शवणारी आहे. शिवशाहीत देहान्ताची शिक्षा झालेल्यांचा येथूनच कडेलोट करण्यात येत असे. टकमकीच्या टोकाला निमूळता