रायगड यात्रा दर्शन माहिती : Page 3 of 20

फराळ केल्यावर , गप्पागोष्टीबरोबरच सोपानदेव चौधरींचे सुस्वर काव्यगायन झाले.

पाचाडच्या महारवाड्यात अवचित दिवाळीच साजरी झाली म्हणा ना. रात्री 12 वाजता शालागृहात सगळ्या पांथस्थांच्या पथ-या थाटल्या आणि उदय़िक श्रीशिवरायाच्या स्फूर्तिदायक राजधानीचे नि समाधीचे दर्शन होणार, या गोड आशावादात ' जय महाराष्ट्र ,छत्रपति शिवाजी महाराजकी जय ' या गर्जनात आम्ही निद्रावश झालो. जय राजगड ! जय महाराष्ट्र ! केवळ ऐतिहासिक स्थळे पहाण्यासाठी जाणारी ट्रिपवाली मंडळी आणि आम्ही, यांच्या भावनेतच एक मूलभेद होता. खरोखररच महाराष्ट्राचे कुलदैवत, आम्हा म-हाठ्यांचा परमेश्वर , छत्रपति शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या दर्शनासाठी निघालेले आम्ही भाविक मनोवृत्तीचे यात्रेकरू होतो. पहाटे साडेपाच वाजता एकदम ' जय रायगड, जय महाराष्ट्र ' गर्जनांची सरबत्ती झडली आणि आमची उठाऊठ झाली. मुखमार्जनादि विधि उरकून चहापान होताच, उगवत्या सूर्यनारायणाच्या कोवळ्या सुर्यकिरणांची मातृपितृतुल्य गोंजारणी घेत घेत , 7 वाजता आम्ही रायगडाच्या चढणीला लागलो. काठीच्या टेकाने एकेक पाऊल आता दमछाट टाकावे लागत होते. बरोबर सुरबा टिपणीस, चिंतोपंत देशपांडे, आवळसकर मास्तर वगैरे महाडकर मंडळी असल्यामुळे, प्रत्येक चढणीला जागोजागचा इतिहास, आख्यायिका नि दंतकथांची त्यांची रसाळ प्रवचने आमचे चढणीचे आयास हलके करीत होती. थोड्याच वेळात मंडळींची टोळ्याटोळ्यानी पांगापांग झाली. एक टोळी हजार फूट उंचीच्या कड्यावर, दुसरी थोडी मागे एकाद्या नजरफाट चढावावर. एकमेकाना आपापल्या टप्प्याचा ईषारा देण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या नि जय महाराष्ट्रच्या गर्जनानी रायगडाची दरीखोरी एकसारखी ध्वनिप्रतिध्वनीनी दुमदुमत राहिली. सिंधु सुळेबरोबर आलेल्या दोनतीन मुलींचा नि मुलांचा उत्साह काय सांगावा ? रायगडचा आजचा चढाव म्हणजे तुम्हा आम्हा शहरी प्राकृताना दोरीवरची किंवा बाटलीवरची कसरतच. पण ती मुले नि मुली हरणासारख्या तडातड उड्या मारीत सगळ्यांच्या आघाडीला धावा घेत चालली होती.

समुद्राच्या सपाटीपासून रायगडाचे शिखर अंदाजे 3000 फूट उंचीवर आहे. काही वर्षापूर्वी लोकमान्य टिळकांच्या खटपटीने स्थापन झालेल्या रायग़ड कमिटीने ठिकठिकाणी बांधलेल्या चढावांच्या पाय-यांचे नि तोडी, गडावर सारखी ये जा करणा-या गाईम्हसरांच्या वरदळीने, आज पार निखळुन उध्वस्त पडलेल्या आहेत. कित्येक ठिकाणचे चढाव थेट आपल्या छातीसमोर उभ्या सुळक्यासारखे येत असल्यामुळे, प्रत्येकाने आपल्या पावलांकडे नीट पाहून चालावे हा वाडवडलांचा पोक्त ईषारा पावलागणिक आठवत होता. कित्येक जागी तर एका पावलापुरतीच निमुळती पायवाट. उजव्या बाजूला उंच दरड आणि डाव्या बाजूला खोलवर तुटलेला कडा आणि पायथ्याशी नकाशासारखा पसरलेला नयनरम्य भूप्रदेश खेडेगावांचे पुंजके, शेतवाड्या, बगिचे, राया तलावांचे ठिपके आणि सर्वामधून सळसळत वाकडीतिकडी धावणारी एकादी नदी, हा निसर्गाच्या लेखणीने काढलेला भूप्रदेशाचा नकाशा पाहून डोळ्यांची भूक भागवण्याचा मोह वरचेवर होतो. पण चढावाची पावले टाकता टाकता तो मोह भागवण्याचे कर्म मात्र भंयकर. नजर गर्रकन फिरते. चालण्याचे थांबवूनच हा कड्याखालचा देखावा क्षणभर पहावा लागतो. एरवी, डावीकडे पाहू नका, सरळ चला, हा वाटाड्याचा कर्कश इशारा इमाने इतबारे मानावाच लागतो. कारण, नजर तरळून पाऊल चुकले का माणूस गेलाच गडगडत खाली वाडवडलांच्या खास भेटीला ! रायगडाचा बहुतेक चढाव एका माणसाचीच पाऊलवाट आहे. गड - चढणी चालली असताना, इतरांप्रमाणे माझ्याही मनात एकच प्रश्न वरचेवर येत होता. राजधानीचा रायगड. शिवरायाच्या राजाभिषेकप्रसंगी आग्रेज - फ्रेंचादिकांची वकिलात मंडळे व्यापारी, भिक्षुक, कलावंत, पायदळ, घोडेस्वार, नालख्या पालख्या, मेणे, वगैरे लाख दीडलाख जमाव रायगडावर आला नि गेला, तो काय याच छातीफोड नि नजरफाट पायवाटेने ? आज गायर नि म्हसरं या वाटेने जातात येतात. पण हत्ती घोडेस्वार नि सांडणीस्वार कसे काय आले गेले असतील ? निराळाच एकदा प्रशस्त राजमार्ग कोठेतरी असावा काय ? एका दोघाना ही शंका मी विचारली तेव्हा कोणी म्हणे वाडीवरून रस्ता होता, तर दुसरा सांगे वरंघ गावावरून होता, तर तिसरा बिरवाडीचे नाव सांगतो. मला एकहिविधान पटले नाही. गडाच्या अखेरच्या पडझडीत तो रस्ता कायमचा गडप झालेला असावा अथवा