रायगड यात्रा दर्शन माहिती : Page 11 of 20

आपोआप जाऊन गडाखाली पडत असे. हिरकणी बुरूज. टकमकीच्या जोडीचा ' हिरकणीचा कडा ' तितक्याच कडालोटीचा नि नजरफाट घसरणीचा . टकमक नि हिरकणी म्हणजे रायगडाच्या भव्यतेचे दोन विशाळ डोळेच म्हटले तरी चालतील. या कड्याचा एक इतिहास आहे. हिरकणी नावाची पाचाडनजिकच्या कोळंस गावची एक गवळण दुधाचा रतीब घालायला गडावर आली असताना, जाबता-बंदीची सायंकाळची तोफ उडाली नि गडाचे दरवाजे बंद झाले. तिचे तान्हे मूल घरी नि घरची वाट तर झाली बंद ! आईचे काळीज ते ! तटातटा तुटू लागले. काळोख पडल्यावर हिरकणी त्या निसटत्या तुटत्या कड्यावरून मोठ्या शिताफीने निसटून गेली कोळंसला आपल्या घरी तान्ह्याला पाजायला. दुस-या दिवशी पहाटे रोजच्याप्रमाणे दूध घेऊन हिरकणी गडाच्या दरवाजावर आलेली पाहून, गडकरी चमकले. ' अरेच्चा ! काल संध्याकाळी ही गडावर अडकून राहिली होती नि आता कशी खालून वर आली ? ' त्यानी महाराजांकडे वर्दी दिली. हा वेळ पावेंतों रायगड अभेद्य समजला जात होता. एकदा दरवाजा बंद झाला का आतला माणूस बाहेर जायचा नाही, बाहेरचा आत शिरकायचा नाही. चोहीकडून गड चढा-उतरायची तर सोयच नव्हती. आणि प्रकार पहावा तर हा असा ! महाराजानी हिरकणीला बोलावून चोकशी केली. "आईचं काळीज, गेलं वाट काढीत मायबाप. त्याला गड काय नि कडे कपारी काय ! " असे तिने सरळ उत्तर दिले. एक साधी गवळण बाई जर या कड्यावरून सहज जाऊ शकते, तर गनिमाला काय कठीण ? महाराजानी त्या तुटत्या कड्यावर भक्कम पाषाणांची तटबंदी करून घेतली. ' करून घेतली ' असे लिहिणे बोलणे फार सोपे आहे. पण खोल खालवर सुमारे 2500 फूट सुळक्यासारख्या सरळ तुटलेल्या कड्यावर आणि ते सुद्धा वरचा 100-150 फूट भाग सोडून मध्यंतरीच हे बांधणीकाम केले असेलच कसे, हे तत्कालीन आश्चर्य आज घडीलाहि लवमात्र कमी झालेले नाही. दारूगोळ्यांची कोठी.

श्रीगोंदे टोकाच्या पूर्वेला ही 90 फूट लांब नि 20 फूट रुंदीची कोठी आज उध्वस्त झालेली आहे. हिच्या भिंतीची जाडी साडेतीन फूट आहे. समोरच्या काळकाईच्या टोकावरून इंग्रेजानी तोफ चालवून या कोठीचा भडका उडवल्याचे सांगतात. टोपीभर रुपयांच्या लालचीने कोणी एका महाराने इंग्रेजाना ही अचूक मा-याची जागा दाखवल्याचा प्रवाद आहे. पण काळकाईचे टोकाचे दूर अंतर पहात्या इतक्या दूरच्या पल्ल्याच्या तोफा त्यावेळी असणेच शक्य नाही. गडावरच फितूर झालेल्यानी दारूकोठी पेटवून दिलेली असावी, असा सरळ अंदाज निघतो. बारा टाक्यांचा चमत्कार . या दारूकोठीजवळच कातळात फोडलेली एकाजवळ एक अशी पाण्याने तुडुंब भरलेली बारा टाकी आहेत. कोणत्याहि एका टाक्यांत दगड टाकला तर बाकीच्या सगळ्या टाक्यांतले पाणी हालते. परतण्याची तयारी . एवढ्या प्रदेशाचे निरीक्षण, परीक्षण नि चित्रीकरण व्हायला दुपारचे 3 वाजले. गड उतरण्याचे वेध लागले आणि पोटातहि कावळे कावकाव करू लागले. शिबिरात परत येताच सामानसुमान गडाखाली पाठवण्याची आणि भोजने उरकण्याची गडबड उडाली. टोळीटोळीने मंडळी गडाखाली उतरू लागली. रायगडच्या हवेत भूक फार छान लागते. एरवी एक किंवा फार तर दीड चपाती खाणारा माणूस मी. पण गडावर नुसत्या न्याहारीला नाचणीच्या जाडजूड अडीज भाक-या, दह्याचे एक पक्क्या शेराचे गाडगे आणि नारळाएवढा तांबड्यालाल मिरच्यांच्या चटणीचागोळा या बहाद्दराने फन्ना केला. चढावापेक्षा हे गड-उतरणीचे काम मोठे कठीण नि किचकट. काठीचा नेट घेता घेता खांदाडे दुखू लागले. पायाखालचे बारीक गाटेगोटे सटासट निसटतात. गवत-पाचोळ्यावरून चालणेहि निसरड्याचे असते. काही खोल उतारावर तर चक्क बैठक मारून अनवाणी घसरगुंडी करावी लागते. सुमारे साडेपाचाच्या सुमाराला आम्ही पाचाड गाठले. तेथल्या जिजामातेच्या इमारतीच्या चौथ-यांचे व बागेचे निरीक्षण चित्रीकरण करून कोंझरकडे धावा घेत निघालो. रोजची सर्विस बस भरल्यामुळे, परत येण्याचे स्पेशल आश्वासन देऊन ती निघून गेली. साडेआठ वाजेपर्यन्त कोंझरच्या उघड्या शेतात तळ ठोकून बसलो सारे गप्पा मारीत, गाणी गात