रायगड यात्रा दर्शन माहिती

 आपल्या मित्रमंडळींसमवेत प्रबोधनकारांनी रायगडाची यात्रा केली. शिवछत्रपतींचे जाणते भक्त असणा-या प्रबोधनकारांसाठी ही यात्रा तीर्थयात्रेपेक्षा कमी नव्हती. त्याचे अत्यंत रसभरीत चित्रण या पुस्तकातून येते. रायगडचा इतिहासही यातून जीवंत होतो.

 जसा पंढरीमध्यें भुकेला भक्तीचा तो विठुराया । तसाच रायगडीं तान्हेला शक्तीचा श्री शिवराया ।। -कवि सोपानदेव चौधरी.

प्रासदो जगदीश्र्वरस्य जगतामानन्ददोsनुज्ञया श्रीमच्छत्रपते: शिवस्य नृपते: सिंहासने तिष्ठत: शाके षण्णव-बाण-भूमिगणनादानन्दसंवत्सरे ज्योतीराजमुहूर्तकीर्तिमहिते शुक्केशसार्पे तिथौ ।। 1 ।।

वापी-कूप-तडाग-राजि-रुचिरं रम्यं वनं वीतिके स्तंभै: कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहैर्मीहिते ( ?) श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो यावच्चंद्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ।। 2 ।।

- रायगडावरील श्रीशिवरायाच्या समाधीनजिक असलेल्या जगदीश्र्वराच्या मंदीराच्या महाद्वाराच्या आत शिरताना डाव्या बाजूच्या सुमारे 1।। हात लांब नि 1।।

हात रुंदीच्या चि-यावर कोरलेले दोन संस्कृत श्लोक. भारतात जन्म यायला पुण्याई लागते म्हणतात. पण त्यापेक्षा म-हाठदेशातल्या जन्माच्या पुण्याईचे माहात्म्य फार थोर. म-हाठदेशीं माझा जन्म. केवढे भाग्य माझे ! पण जिवाला एक रुखरुख लागलेली होती. तीनशे वर्षांपूर्वीचा चिरस्मरणीय मुकाबला. सारी दक्खन म्लेंच्छाक्रांत झालेली. हिंदुत्व शिल्लक उरण्याचाहि भरवसा दिसेना. हिंदुमात्र म्हणजे केरपाचोरा. त्याने केवळ जबरदस्तांच्या पखाली वहाव्या. असा काळदण्ड उभ्या भरतखंडात जारी. विंध्याद्रीच्या उत्तरेकडचा भारत मोगल बादशहीच्या भजनपूजनात गर्क . हिंदुजनांचे सत्व नि सत्वच मातीमोल झालेले. त्याना स्वराज्य कसले? अशा आणीबाणीच्या कालखण्डात ज्या पुरुषोत्तमाने हिन्दवी स्वराज्य-स्थापनेचा कर्णा फुंकला , सह्याद्रीची रानवट दरीखोरी स्वयंनिर्णयाच्या नि स्वदेश-स्वातंत्र्याच्या अपूर्व संदेशाने थरारवून हालती बोलती नि लढती केली आणि लोकोत्तर चातुर्याने म्लेंच्छ सत्तेचे निर्दाळण करून, रायगडावर हिंदुपदपातशाहीचा भगवा झेण्डा फडकवला, त्या महाराष्ट्राच्या परमेश्वराच्या-छत्रपति श्रीशिवरायाच्या -समाधीवर मस्तक घासावे, ही माझी फार वर्षांची मनीषा. जिवाला तळमळ लागली होती सारखी . शिवरायाच्या समाधीचे दर्शन नाही, त्या पुण्यश्र्लोकाने पायदळी पावन केलेल्या रायगडाची धूळहि कपाळी लागत नाही, कशाला जन्माला आलो मी महाराष्ट्रात ? यापूर्वी एक दोन आले होते पण ते साधले नाहीत. आता तर ( सन 1949 ) साठी उलटून पासष्टी चालू झाली. स्नेहीजन म्हणत "आता कसचे रायगडाचे आरोहण तुम्हाला जमणार? डालग्यात बसून मजूरांच्या खांद्यावरच वर जावे लागेल तुम्हाला." विनोदाने पण अंतरीच्या निर्धाराने मी म्हणायला की "छे बुवा, मेल्याशिवाय कोणाच्याहि खांद्यावरून कोठेही जाणार नाही. जाईन तर एका दमात पायी चालून महाराजांच्या समाधीपर्यन्त गडावर जाणार हा निश्र्चय". शिवरायांच्या कृपेने तो यथासांग पार पडला. त्याची कथा सविस्तर सांगतो. माझा रायगड यात्रेचा निश्र्चय ठरायचा अवकाश, भराभर जिव्हाळ्याच्या शिवप्रेमी स्नेहीजनांचे वर्तुळ माझ्याभोवती जमू लागले. सन 1949 च्या नाताळाच्या सुट्टीचा मुहूर्त नक्की केला. महाडचे लोकप्रिय पुढारी स्नेही महाशय सुरेन्दनाथ गोविंद उर्फ सुरबा टिपणीस यांच्याकडे कार्यक्रमाचा खलिता रवाना झाला. यात्रेच्या सर्व सांगतेची किल्लेदारी त्यांच्यावर सोपवली. वरोवरचे यात्रेकरू स्नेहीमंडळ. चंद्रकला चित्र या बोलपट संस्थेचे स्वावलंबी चालक, सुप्रसिद्ध स्टिल फोटोग्राफर नि सिने-डायरेक्टर महाशय चंदशेखर हे दत्ता वैद्य आणि भाई भगत या दोन मदतनिसांसह सबंध रायगडाचे चलचित्रीकरण करण्यासाठी सिने - कॅमेरे वगैरे साहित्य घेऊन यात्रेकरूंत सामील झाले.

जर्मनीतील विख्यात पाठशाळांच्या सिने-तंत्रपटु पदव्या पटकवणारे विख्यात सिनेडायरेक्टर महाशय कुमारसेन समर्थ बरोबर निघाले. नासिकचे महाराष्ट्रख्यात कविराज सोपानदेव चौधरी आपली कंठाळी खांद्यावर टाकून धावले. दादर कविमंडळाचे रसिक सदस्य लक्ष्मणराव सुळे ऊर्फ कवि ' विपिनसुरेंद्र गोविंद टिपणीस. विहारी ', रानडे रोड रहिवाशी संघाचे कार्यकर्ते महाशय रा. वा. कर्णिक, चंद्रकांत मुलेसकर वगैरे दहा बारा मंडळी उत्साहाने माझ्याबरोबर निघाली. रायगडावरील शिवरायाच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचे नवे बांधकाम पुरे करणा-या दिवंगत तात्यासाहेब सुळे इंजिनियरांची कनिष्ठ कन्या कुमारी सिंधू सुळे मुद्दाम निघाली . स्टेट ट्रान्सपोर्टचा प्रवास. काही वर्षांपूर्वी मुंबईहून महाड ते रायगडचा प्रवास फारच त्रासाचा होतो. मुंबईहून आगबोटीने निघायचे,घरमतरला उतरायचे, तेथून पडावाने पेणला जायचे, तेथे बैलगाड्या भाड्याने करून महाडला जायचे, असा किचकट त्रिस्थळी यात्रेचा होता.