प्रबोधन सहाय्यक फंड : Page 2 of 3

संस्था परीस्थितीच्या धसमुसळींत ताडकन उखडल्या जातात. , तर माझ्या सारख्या स्वतंत्र मतवादी एकांड्या शिलेदाराच्या चिमुकल्या संस्थेची गोष्ट कशाला? प्रतिकुळ परिस्थितीच्या नुसत्या चुटपुट्त्या धक्याने सुध्दा सारा कागदी पत्त्याचा किल्ला नजरे समोर जमीन दोस्त! फरक इतकाच की मोठमोठ्या लिमिटेड कंपन्याचे कारभारी पोटार्थ कावळेच असल्यामुळे कंपनीचे टिंपाड वाजताच दाही दिशांना भुर्रर्र उडून जातात; माझा व्यवहार एकच व्यक्तीच्या असल्यामुळे , तुफानात जहाज फुटले तरी अखेरपर्यंत मला माझ्या ध्येयाचे सुकाणू सोडता येत नाही. सर्वांप्रमाणे मलाही पोट हे आहेच. मी निपोट्या अपवाद असणेंच शक्य नाही. पण त्याबरोबरच मला माझे काही विशिष्ट जीवनकार्य करायचे आहे. त्याचे एक ठरलेले ध्येय आहे. त्यासाठी मी अनेक लौकीक लाभांवर लाथ मारलेली आहे; त्यासाठी नित्य चाललेल्या कर्तव्याच्या आणि विचारांच्या बर्याा वाईट धडपडीवरच जीवनाचा बरावाईट पणा अवलंबून असल्यामुळे, केवळ पोटाच्या सबबिवर ध्येयाला मला पाठ दाखविता येत नाही. एक सोडून शंभर क्रांतीचे स्फोट झाले तरी उसळत्या लाटेपुढे मस्तक वाकवून , मी पुन्हा ताठ मानेने उभा राहणार आहे. यशापयशाचा भार श्रीहरीच्या चरणी वाहून, साधेल तशी कर्तव्याची शिकस्त कुशलतेने करीत रहणे, एवढेच मला समजते. अखिल मानवांप्रमाणेच मी एक प्रवाहपतित संसारी आहे. सुखदुःखांच्या परवडी जाता येतात तशा असतात. त्या सर्वांची अनिवार्य बरी वाईट बाधा भोगून, या जिवीताचे जिवनकार्य यथामति बजावनारा मी एक स्वावलंबी जीव आहे. चालू युगांत वृत्तपत्र ही कितीही मोठी पराक्रमी शक्ती असली, तरी देशी आणि विदेशात: मराठी वृत्तपत्रांचे जीवन आणि अस्तित्त्व अत्यंत क्लेशमय किंबहुना घातबट्याचे असते. संफादकाला पोट बांधुन काम तर करावे लागतेच; पण वृत्तपत्राच्या छपाई सफाईच्या पायी तो अगदी मेटाकुटीला येतो. ज्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न भरधाव वकीलीच्या, वैद्यकीच्या किंवा भरगच्च पगारी नोकरीच्या चबचबीत वंगणावर सुटलेला आहे आणि केवळ फुरसदीचा खेळ किंवा मनाला विरंगुळा म्हणूनच जे वृत्तपत्रि देशसेवेच्या ऎदी फंदात पडतात. त्या महाभागांची गोष्ट अपवाद म्हणून बाजुला ठेवली पाहिजे. पण केवळ जनसेवेलाच आमरण वाहून घेणार्याच वृत्तपत्रकाराचे जिणे बाहेरुन कितींही साजिरे गोजिरे दिसले, तरी ते अत्यंत लाजिरे असते, एवढी दृष्टी लोकांना येईल, तर ते असल्या जनसेवकाकडे फार निराळ्याच माणुसकीने पाहतील, असें मला वाटतें.

(३) धनीच दाद लावणार. सेवकाच्या सुखदु:खाची दाद त्याच्या धन्याने लावली पाहिजे. त्याच्या आपत्तचे निवारण अन्नदात्यांनी केले पाहिजे. प्रबोधन जनता जनार्दनाचा सेवक. त्यांच्याच अन्नावर त्याचा पिंड वाढला. अगदी अलीकडे, म्हणजे १९२४ च्या क्रांती काळापासून, नियमीतपणाची कसरत जरी त्याला साधली नाही, तरी केलेली सेवा विचार क्रांतीच्या क्षेत्रांत किती श्रेष्ठ दर्जाची झाली, याची साक्ष हजारो आश्रयदात्यांनी आपापल्या पत्री मला वेळोवेळी श्रुत केलेलीच आहे. त्या विषयी माझा आत्मविश्वास कदापि लंजुर होणे नाहि. प्रबोधनाने आपल्या धन्याल कधि खोटी मसलत दिलि नाही. का कधी भरंसाट पिसाटाने त्यांच्या सत्यशोधनाने विकल्प उत्पन्न केला नाही. श्रीहरीने जशी मति दिली व लेखणी चालवली , तशी गेलि ५ वर्षे सेवा केली. आज हा आपला एकनिष्ठ सेवक ग्रहदशेच्या फेर्यांीत सापडून , सेवेला मुकला आहे. त्याला आजपर्यंत आपण उदार मनाने पोसले आणि केली सेवा गोड मानून त्याला उत्तेजन दिले. आज तो आपत्तींच्या भोवर्यां त सापडुन खाली पडला आहे; त्याला हात देऊन उठविणे धन्याचे कर्तव्य आहे. देवाने कृपा केली ते दैवाची वक्रगति सुध्दा सरळ होते. अशी संतांची ग्वाही आहे. प्रबोधनाचा धनी जनता-जनार्दन . त्यानेच कृपेची पाखर घातली, वेळींच तो धावण्याला धावला, तर त्याच्या कृपावृष्टीपुढे ग्रहदशेची दृष्टी काय होय? सर्व उपाय थकले, प्रयत्न बोथट झाले आणि भवति न भवति मुळे विचारांत सुध्दा विक्रमाचा तेल्याचा घाणा फेरु लागला. अशा अवस्थेंत अखेरीचा ठाव म्हणून देवाच्या पायी मिठी घालीत आहे. त्राहि माम-मला तार-अशी तारस्वरांत आज आरोळी ठोकीत आहे. देवाने दाद द्यावी.

(४) प्रबोधन सहाय्यक