वैचारिक ठिणग्या : Page 9 of 20

प्रेम आईलाच ठावे, इतरांना – विशेषतः पुरुषांना त्या प्रेमाची खरी कल्पना येणे शक्य नाही.

(‘आई, थोर तुझे उपकार’ः पान ७६) ‘धर्माचा बाप मनुष्य’ १६.५.२३ च्या अग्रलेखात प्रबोधनकार म्हणतात, ‘धर्माने मनुष्य निर्माण केलेला नाही, मनुष्याने धर्माला जन्म दिला आहे. अर्थात, धर्माचे कर्तृत्व मनुष्याच्या हाती आहे! धर्माला मनुष्यावर अरेरावी गाजविता येणार नाही!... प्रत्येक नव्या काळाशी समगामी होण्याइतका लवचिकपणा धर्मात नसेल, तर तो आणणे मनुष्याचे कर्तव्य आहे! आणि तो येत नसेल, तर त्या धर्माला गचांडी देऊन, त्या ऐवजी नवीन धर्माला जन्म देणे मनुष्याच्या अधिकारातले आहे! इसवी सनापूर्वीच्या हजार बाराशे वर्षातल्या कायद्यांची बळजबरी या २०व्या शतकात ध्रर्म जर मनुष्यावर करीत असेल, तर त्या शिरजोर धर्माला व त्याच्या पुरस्कर्त्यांना बेधडक फासावर लटकवावे !! मनुष्याच्या उमलत्या, उत्क्रांत आकांक्षांना विरोध करणारा धर्म हा धर्म नसून अधर्मच होय !’ )‘प्रस्थान’ःपान ५२, ५३)  हिंदु धर्माच्या संदर्भात प्रबोधनकार म्हणतातः ‘हिंदू धर्माविषयी एक प्रकारची अढी माझ्या मनात अगदी लहानपणापासून पडत गेली. जो धर्म माणसांना माणुसकीने वागण्याइतपतही सवलत देत नाही, सदान् कदा ‘देवाची इच्छा’ या सबबीखाली अश्रापांचा छळ खुशाल होऊ देतो, तो देव तरी कसला नि तो धर्म तरी काय म्हणून माणसांनी जुमानावा? या विचारांनी माझ्या मनात एक नेहमीच पोखरण घातली म्हणा ना!’ ( ‘माझी जीवनगाथा’ः पान १६२) बाजारू स्वरूप  हिंदू धर्माला ब्राह्मणांनी कसे बाजारू स्वरूप दिले याविषयी प्रबोधनकार म्हणतातः ''मुसलमानी धर्म स्वीकारताना काही मोठा अवाढव्य विधी करावा लागत नसे. इस्लामी धर्माची तत्त्वे ज्याला मान्य झाली, तो मुसलमान झाला ! म्हणजे, जो स्वतःला मुसलमान म्हणवतो, तो मुसलमान – अशा रीतीने आपद् धर्म म्हणून मुसलमान झालेल्यांना ‘जो स्वतःला हिंदू म्हणवितो, तो हिंदू !’ असा उलटा उतारा देऊन हिंदू धर्माच्या प्रवर्तकांत असू नये, या आत्मघातकी परिस्थितीचे वर्णन कोणत्या शब्दांनी करावे?'' (‘हिंदू धर्माचे दिव्य’ – पान १५-१६)  असे आत्मपरिक्षण करणा-या एकट्या जिजाऊमाता निघाल्या. बजाजी निंबाळकर मुसलमान झाला. विजापूरच्या बादशहाने त्याला मुलगी देऊन जावई करून घेतले... काही काळानंतर बजाजी विजापूरहून स्वदेशी आला. त्याने जिजाबाई मातोश्रींची भेट घेतली. शिवबा गोंधळून गेले.जिजामाता त्यांना म्हणाल्या, ''शिवबा ! यात तू इतका गोंधळून का गेलास? बजाजी निंबाळकरांनी आपद् धर्म म्हणून परधर्माचा स्विकार केला, यात त्यांचा दोष काय? आज त्यांना पश्चात्ताप होऊन ते परत आले आहेत. पश्चात्तापासारखी दुसरी शुद्धी नाही व प्रायश्चित्तही नाही ! आपल्या शिंगणापूरच्या श्री शंभू महादेवापुढे बजाजींना लौकिक प्रायश्चित्त घेऊन खुशाल हिंदू धर्मात परत घेण्याची व्यवस्था करा !'' (‘हिंदू धर्माचे दिव्य’ ः पान ६१-६२) शिवाजीराजे एवढेच करून थांबले नाहीत, तर आपली मुलगी सखूबाई बजाजीचा मुलगा महादेव याला दिली !... लग्नविधीच्या सोहळ्यात शिवाजी आणि बजाजी एका ताटात जेवले !! परिस्थितीपुढे शरणागती पत्करण्याऐवजी तिच्यावरच स्वार होऊन कोणाच्याही रागालोभाची पर्वा न करता, जिजामातेने घेतलेला निर्णय किती क्रांतिकारी होता !!!

 प्रबोधनकार म्हणतातः ''हिंदू धर्माचे आजचे स्वरूप भेकड आणि नामर्द आहे. त्याची विजयाकांक्षा ठार मेलेली आहे. प्रचलित हिंदू धर्म इतरांच्या लाथा खाऊन बेजार झालेला असतानाही, स्वकीयांवर उर्मट सुलतानशाही गाजविण्यास त्याला शरम वाटत नाही. कोट्यवधी अनुयायांची संख्या दररोज परधर्मात जात असताही, हिंदू धर्म उलट्या काळजाच्या दिवाळखोर व्यापा-याप्रमाणे स्वतःच्या संस्कृतीच्या भांडवलाच्या टिमक्या पिटण्यास कचरत नाही ! सारांश, स्वयंनिर्णयाचे फवारे सोडणारे नामर्द हिंदू धर्माच्या क्षेत्रात अत्यंत जुलमी आणि पाषाणहृदयी वर्तन करीत असतात ! ज्यांचा धर्मच मुळी मानसिक गुलामगिरी वाढविणारा, जुलमी आणि अन्यायी आहे, त्या हिंदूत जगत्-नेतृत्वाची आकांक्षा कशी थरारणार? थरारली, तरी यशस्वी कशी होणार? हिंदू म्हणतात धर्माचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही, तरी बरे ! रजपुतांच्या शौर्याची अखेर माती केली. धार्मिक वर्चस्वाखाली भिक्षुकशाहीने मराठी स्वराज्याला