वैचारिक ठिणग्या : Page 8 of 20

संशय व्यक्त करताच, प्रभू रामचंद्राने कसलाही विचार न करता तिला ताबाडतोब अरण्यात हाकलून दिले... त्यावेळी सीता नऊ महिन्यांची गरोदर होती. अशा वेळी, रामाने एक जंगी दरबार भरवून लोकांना जाहीर रीतीने सांगायचे होते ः- ''नागरिक जन हो, तुम्हाला माझ्या महाराणीबद्दल काही संशय येत आहे. माझ्याबरोबर सिंहासनावर तिने बसू नये, असे तुम्हाला वाटत आहे काय ठीक आहे – तर मग, मला या राज्याची पर्वा नाही !... आत्ताच्या आत्ता सर्व राज्यसूत्रे भरताच्या स्वाधीन करून मीच सीतेसह अरण्यवासाचा रस्ता पत्करतो! तुमचा कितीही संशय असला, तरी सीतेच्या पावित्र्याबद्दल माझी बालंबाल खात्री झालेली आहे. इतरांच्या कुटाळक्यांकडे लक्ष देण्याचे मला मुळीच कारण नाही. प्रजाजनहो, नीट विचार करा! सीतादेवी ही माझी वाग्दत्त, विवाहबद्ध पत्नी आहे. ती पूर्ण दिवसांची गर्भवती असून लौकरच तिला मातृपद प्राप्त होणार आहे. अशा अवस्थेत, केवळ तुमच्या संशयाच्या लहरींचे रंजन करण्यासाठी मी जर तिचा त्याग करीन, तर राक्षसात आणि माझ्यात फरक तो काय मी जसा तुमचा राजा आहे, तसाच सीतेचाही राजा आहे! तुमच्याप्रमाणेच जर तिनेही न्यायाची मागणी केली, तर कोणत्या तोंडाने तिला न्याय नाकारता येईल सांगा! मी जर तिची ही न्यायची मागणीच मान्य केली नाही, तर राजपदालाच काय, पण माणुसकीलाही मी नालायक ठरेन.'' (‘हिंदुजनांचा –हास आणि अधःपात’ः पान७१) मानवनिर्मित अन्याय्य विषमता स्त्री आणि पुरुष दोन्हीही निसर्गनिर्मित प्रतीके असताना, त्यांच्यामध्ये ही मानव-निर्मित आणि अन्यायकारक विषमता नाही का? कशासाठी? त्यालाही आपल्याच धर्मग्रंथांचा आधार आहे; आणि त्या ग्रंथांमध्ये बदल घडवून आणणे, हे माणसाच्या हातातले आहे. कारण, बुद्धी ही केवळ मानव प्राण्यालाच लाभलेली दैवी देणगी आहे. जनावरांना ही असामान्य देणगी लाभलेली नाही. परंतु याच बुद्धीचा वापर माणूस करीत नसेल, तर तो जनावरापेक्षाही बेगळेच जनावर समजले पाहिजे. म्हणूनच, माणसाने सदैव चिकित्सा करूनच, आणि आपल्या बुद्धीला पटल्यानंतरच निर्णय घेतला पाहिजे! ग्रंथ प्रमाण मानण्याची वृत्ती माणसाला चिकित्सेचे स्वातंत्र्य देत नाही.

जिथं ‘चिकित्सा-स्वातंत्र्य’ नाही, तिथं बौद्धिक विकास नाही... जिथं बौद्धिक विकासावर बंदी, तिथं राज्यकर्त्यांनी समाज-विकासावर मोठमोठी व्याख्यानं देणें, म्हणजे बांडगुळानंच झाडाचं रक्त शोषणं होय! ‘हुंडा विध्वंसक सभा’ धार्मिक गुलामगिरीप्रमाणेच सामाजिक गुलामगिरीसुद्धा संपूर्ण स्त्री-वर्गावर लादण्यात आली आहे. त्या काळी तरी, शूद्रांच्या आणि स्त्रियांच्या दर्जामध्ये कोणताच फरक नव्हता. अशा परिस्थितीत, प्रबोधनकारांनी ‘हुंडा विध्वंसक सभे’ची स्थापना केली... एका हुंडेबाज (श्रीमंत) गधड्याची जिरवण्यासाठी प्रबोधनकारांनी एक गाढव भाड्याने आणले. त्या गाढवावर ‘गधडा लग्नाला चाललाय्’ अशी अक्षरे लिहिली !! आणि थाटामाटात त्याची मिरवणूक काढली... त्या ‘वराती’त घोषणा असायच्याः ‘हुंडेबाज गधड्याचा धिक्कार असो !’ ‘हुंडेबाज गधड्याचा धिक्कार असो !!’ हुंडेबाज गधड्याच्या मिरवणुकीच्या तावडीतून सुटले, तर त्यांच्या याद्या वर्तमानपत्रात जाहीर केल्या जात. त्यांचा नमुना असाः ''हुंडेमान्य हुंडेश्री.......................... (संपूर्ण नाव)... यांना रावसाहेब.......... यांनी १२,१०० रुपयांना विकत घेतले!'' प्रथम गाढवाला भाडे सहा आणे होते, ते वाढत वाढत २ ते ५ रुपयांपर्यंत गेले! ‘अडला नारायण धरी गाढवाचे पाय हो!’ (‘माझी जीवनगाथा’ ः पाने २८०-८१)  ‘आई थोर तुझे उपकार’ या छोट्याशा पुस्तिकेत मातेचा महिमा गाताना प्रबोधनकार म्हणतातः ‘आई हा असा एक चमत्कार आहे की, त्याच्या निकट परिचयामुळे त्यातील गूढ प्रेमाच्या रहस्याचे महत्त्व आम्हाला वास्तविक समजले, तरी उमजत नाही. उमगले तरी सापडत नाही!! आणि भासले तरी व्यक्त करता येत नाही.’ ‘आ’ ‘ई’ हे दोन स्वर, ही दोन अक्षरे... हा एक सुटसुटीत शब्द सोपा दिसतो खरा, पण या दोन अक्षरांच्या इवल्याशा जागेत सारे विश्व सामावलेले आहे ! या शब्दात एक विलक्षण जादू आहे. विश्वाच्या आदि अंताची माया या दोन अक्षरी शब्दातच संकलित झाली आहे. परमेश्वराने स्त्री-जातीला बहाल केलेल्या अलौकिक स्निग्धतेच्या सत्वगुणांचा अर्क आईच्या प्रेमात आत्म्याप्रमाणे रसरसत असतो!... आईचे