वैचारिक ठिणग्या : Page 7 of 20

बाटाल ना ! जात वाळीत टाकील तुम्हाला –'' ''झक् मारते जात ! जात नि पात !! आज घेणारच मी तुमच्या घरी चहा –'' दादा कर्ते सुधारके होते, नुसते बोलके नव्हते.  खानावळ चालवणारी साध्वी सखूबाई म्हणायची ः ''माझी खानावळ अन्नार्थ्यासाठी आहे. मी बामण ओळखीत नाही ! प्रत्येक हिंदूला मी एका पंगतीला वाढणार. अगदी, पाटाला पाट आणि ताटाला ताट भिडणार. जरूर असेल त्याने यावे; नसेल त्याने खुशाल भुके मरावे ! मला त्याची पर्वा नाही कुणी कुरबूर, टुरटूर करील, त्याला भरल्या ताटावरून ओढून उठवून हाकलून देईन '' (‘जुन्या आठवणी’ ः लेखक प्रबोधनकार ठाकरे).... यावरून जातिभेदावर प्रहार करणा-या लहानशा कार्यकर्त्यांविषयी दादांना किती विलक्षण जिव्हाळा होता, ते स्पष्ट होते.

 प्रबोधनकार यांच्या ‘टाकलेलं पोर’ या नाटकातला कर्ण म्हणतो, ''मानव नीच कुळात जन्माला येऊन स्वपराक्रमी पुरुषांनी या असल्या वरचढ लोकांच्या मग्रूरपणाला त्यांनी आपल्या स्वयंभू कर्तबगारीने वरचेवर पायबंद ठोकले नसते, तर या घमेंडी-नंदनांनी मागासलेल्या सर्व समाजांना कृमी-कीटकांपेक्षाही अत्यंत नीच दशेला नेऊन चिरडले असते.''  खालच्या स्तरावरील लोकांना आपला स्वाभिमान जतन करायचा असेल, तर त्यांनी सतत दोन हात करण्याची तयारी ठेवली पाहिजे. पराक्रम आणि कर्तृत्व गाजविल्याशिवाय तुम्हाला तुमचे ध्येय कधीही साध्य करता येणार नाही.म्हणूनच, दलित, मागासवर्गीय, अस्पृश्य या सर्व खालच्या थरातील लोकांसमोर प्रबोधनकारांनी श्रीकृष्णाचा नाही, तर कर्णाचा आदर्श ठेवला ! स्त्रीचे मोठेपण  स्त्रीचे मोठेपण सांगताना प्रबोधनकार म्हणतात ः ''जेथे मानवाची उत्पत्ती स्त्रीच्या पोटी, स्थिती स्त्री-सहवासावरच, तेथे त्यांचा लयही स्त्रीसाठीच झाला, तर स्त्रिया बेईमान कशा? पुरुष स्त्रीला कितीही क्षुद्र/शूद्र लेखोत, स्त्रियांची निसर्गदत्त मोहिनीच अशी पराक्रमी आहे की, स्त्रियांच्या सहवासाशिवाय पुरुष वर्ग केव्हाच आत्महत्या करून मोकळा होईल!''  ''स्त्रियांना अबला म्हणण्यातच त्यांनी सत्याचा खून पाडला आहे! स्त्री-वर्गाचा उपनिषद आणि भारत काळातील इतिहास पाहिला, तर त्यांची कर्तबगारी, सर्वशक्तिमान आणि मर्दपणाचा टेंभा मिरवणा-या पुरुषांपेक्षाही त्या सामर्थ्यवान असल्याचे डोळस माणसाला स्पष्ट दिसेल ! परंतु त्यांचा अवमान करण्याची अवदसा ज्यावेळी पराभूत पुरुष वर्गाला आठवली, त्याच वेळी त्यांना अबला ही संज्ञा लावण्याचे धाडस जन्माला आले.'' (‘प्रबोधनाचे ध्येय’ ः १८ ऑक्टो. १९२१)

 ''पूजार्थे क्रियते भार्या'' हे हिंदू धर्मातील सूत्र तुमच्या खास ऐकिवात असेल. विवाह आणि प्रेम याबद्दलची हिंदू समाजाची कल्पना कोणत्या कृत्रिम, यांत्रिक, पाशवी व बिन-काळजाच्या प्रेमशून्य आचार-पद्धतीवर उभारलेली होती; व ती किती घाणेरडी होती, ही गोष्ट अगदी ढळढळीतपणे तुमच्या नजरेला येईल, असल्या बळजबरीच्या, प्रेमशून्य संबंधांतून उत्पन्न झालेली प्रजा कशी होणार, याचे काय भविष्य सांगण्याची जरूर आहे? (‘हिंदुजनांचा -----हास आणि अधःपात’ पान ४४)  स्त्री-पुरुष समानतेच्या संदर्भात ''संगीत विधिनिषेध'' ह्या नाटकात प्रबोधनकार – निर्मित शांती ही बालविधवा म्हणते ः ''नवरा वारला त्याला मी काय करणार बाबा? मी का त्याला मारले? का मारायला सांगितले?''... त्यानंतर क्रांती हे दुसरे पात्र म्हणते, ''नवरा मेला म्हणजे तुम्ही मुडदेफरास पुरुष बायकांचे कुंकू पुसता व मंगळसूत्रे तोडता. मग एकाद्याची बायको मेली, तर त्याचे काय तुम्ही गंध पुसता का जानवे तोडता?'' शांती म्हणते, ''मला पुनर्विवाह करायचा अधिकार आहे. मी करणार, करायचा मला जन्मसिद्ध नसला तरी तारुण्यसिद्ध हक्क आहे!!'' (‘संगीत विधिनिषेध’)  ग्रंथ प्रमाण मानणे हे माणसांना जिवंतपणीच मृतावस्थेचा प्रत्यक्ष अनुभव देणारे दुसरे दास्य-प्रचारक जहर आहे; आणि या जहराची तिडीक हिंदुजनांच्या अगदी जिव्हाग्री जाऊन भिनलेली आहे.'' (‘प्रबोधन’ ः १ फेब्रु.१९२९)

 ''स्त्रियांची दास्यातून मुक्तता करायची असेल, तर धर्मग्रंथांचे प्रामाण्य खुशाल धुडकावून दिले पाहिजे. आमच्या रामायणासारख्या धर्मग्रंथाने किती घाणेरडा परिणाम समाज-जीवनावर केला आहे. कारण सीतेने लंकेमध्ये अग्निदिव्य करून आपले पावित्र्य निष्कलंक असल्याचे सिद्ध करून दाखवले. पुढे अयोध्येस आल्यावर कोणी एका सामान्य माणसाने सीतेच्या शीलाबद्दल