वैचारिक ठिणग्या : Page 6 of 20

मच्छी, चांभार, केवरा, बागडी, नामशूद्र, महार, धेड, मांग इत्यादी अस्पृश्य जनांचे संघ हा छळवाद होऊन बहिष्कृत झालेल्या बौद्धजनांचेच अवशेष आहेत.  जातीभेद, स्त्री-दास्य, कर्मकांड, मायावाद अशा कितीतरी दुष्ट प्रथा समाजात रूढ झाल्या याबद्दल स्टॅन्ले लेन्पूल म्हणतातः ''हिंदूंच्या जातीभेदामुळे त्यांचा पाडाव झाला.... रजपूर राजे व क्षत्रि सरदार पिढीजात हाडवैराने जखडलेले; मानापानाच्या वेडगळ कल्पनांनी, मागचा पुढचा विचार न करता, ऐहिक स्वार्थावर नजर न देता, वाटेल तसे वागणारे होते. त्यांच्या धर्माचा पाया जातीवर म्हणजे जन्मावर व कुळावर रचलेला होता''  हिंदु समाजाचा विनाश घडवून आणण्यास दुसरे कोणीच जबाबदार नाहीत, तर त्याला स्वतः हिंदू हेच जबाबदार आहेत. त्यामुळे हिंदू समाजाला पुन्हा आपला उत्कर्ष करून घ्यायचा असेल, तर त्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.  जातीभेद टिकविण्याचे एक मुख्य कारण म्हणजे हिंदु समाजात फैलावलेली रक्तशुद्धीची बाष्कळ कल्पना! प्रत्येक जातीला आपल्या स्वतःच्या रक्तशुद्धीची एवढी घमेंड की, जणू काय ती अगदी ‘आयोडाईज्ड सार्सापरिल्याची’ चालती बोलती खाणच!

 जातीतल्या जातीत लग्न लावण्याचा, स्वयंवराच्या पद्धतीला गचांडी मिळण्याचा आणि बालपणीच लग्न ठोकण्याचा उपक्रम या रक्तशुद्धीच्या कल्पनेनेच केला.  नुसती लेक्चरे, लेख, सहभोजने या बाहेरच्या मलमपट्ट्या आहेत... या वर्माच्या मर्मावरच डाग देण्याचे काम सत्यभामेनेच केले पाहिजे! बायकाच जेव्हा या अशास्त्रीय व अनैतिक कल्पनेविरुद्ध बंड करण्यास सज्ज होतील, तेव्हाच जातीभेद खास नष्ट होतील! तात्पुरता नव्हे, कायमचा रसातळाला जाईल आणि अखिल हिंदू समाज हा संघटित बनून जगाच्या धकाधकीच्या मामल्यात टिकेल.  स्वराज्य जसे मागून मिळणार नाही, तशी ‘अस्पृश्यता घालवा’ म्हणून कोणीही घालवणार नाही. हक्क आणि अधिकार कोणी कोणाला देत नसतो, ते बळजबरीने घ्यावे लागतात त्यासाठी आत्मयज्ञाची शिकस्त करावी लागते. स्वावलंबनाचा बाणा कडकडीत आचरावा लागतो. अस्पृश्यात एकोपा हवा !  अस्पृश्यात जर जातीभेदाचा म्हसोबा बोकाळणार नाही; आणि जर सर्व अस्पृश्य जाती एकोप्याने अस्पृश्य विध्वंसनाचा व समान हक्क मिळवण्याचा प्रयत्न स्वावलंबनाच्या बळावर करतील, तर ही ७० कोटी सामर्थ्याची लोकशक्ती देशातल्या वाटेल त्या राजकारणी पक्षाला पुरून उरण्यास समर्थ होईल !!  तुम्ही माझ्यावरही विश्वास ठेवू नका. येडपटांनो, तुमच्या भाग्याने तुम्हाला डॉ. आंबेडकरांसारखा तरणा-जवान तुमच्या हाडा-रक्तामांसाचा पुढारी लाभला असताना तुम्ही आमच्या सारख्यांच्या मागे का लागावे? अहो, मेंढ्यांचा पुढारी दाढीवाला बोकड असावा! लांडगा चालेल का? त्या आंबेडकराला जाऊन भेटा. तोच तुमचे कल्याण करणार... बाकीचे आम्ही सारे बाजूचे पोहणारे... समजलात?  १९२६ सालच्या दादर सार्वजनिक गणेशोत्सवात दादांची सिंहगर्जनाः ''आज जर आमच्या अस्पृश्य बंधूंना गणेश पूजनाचा हक्क ३ वाजेपर्यंत देण्याचा शहाणपणा जावळे-कमिटीने दाखवला नाही, तर मी स्वतः ही गणपतीची मूर्ती फोडून टाकीन!'' ही सिंहगर्जना ऐकताच जीर्णमतवाद्यांनी शरमेने माना खाली घातल्या आणि अस्पृश्यांना ताबडतोब गणेश पूजनाचा हक्क मिळाला! (जय महाराष्ट्र !!!)

 ती. दादांच्या ‘खरा ब्राह्मण’ या नाटकातील मुख्य पात्र विठू महार हा आपल्या भक्तिभावाने आणि सात्विक आचरणाने खरा ब्राह्मण ठरला आणि त्याला विरोध करणारे सगळे खोटे ब्राह्मण ठरले.  प्रयोग संपल्यावर कमिशनर म्हणाले, ''या नाटकात ज्यांना बामण-निंदा दिसते, ते एक तर लफंगे किंवा आंधळे असावेत! अस्पृश्योद्धारावर इतके परिणामकारक आणि तेही एका संताच्या चारित्र्यावर लिहिलेले नाटक आम्ही तरी प्रथमच पहातो आहोत.''  वालचंद शेट नाटक पाहून म्हणाले, ''अस्पृश्योद्धारावर इतके हृदय पिळवटून टाकणारे परिणामकारक नाटक आम्ही आजच पाहिले! हे नाटक पाहून अस्पृश्यतेची किळस न येणारा माणूस, माणूस म्हणताच येणार नाही !!.... फार, फार सुंदर नाटक लिहिलेत आपण.''  एक महार सुभेदार प्रबोधनकारांना म्हणाले, ''आमच्या घरी या की, एकदा !!'' ''तुम्ही येणार थोडेच?'' सुभेदारीणबाई नम्रपणे बोलल्या. ''का नाही येणार?'' आत्ता येतो तुमच्या घरी.... आहे कार त्यात एवढं ! सून म्हणाली, ''महाराच्या हातचा चहा तुम्ही कसा घ्याल