वैचारिक ठिणग्या : Page 5 of 20

आवश्यकता होती. प्रारंभी तिने थोडा सामाजिक विकास साधला, पण थोड्याच काळात तिचा लवचिकपणा नाहीसा होऊन जन्म हाच वर्ण-व्यवस्थेचा मुख्य, नव्हे एकमेव आधार बनला.

 प्राचीन हिंदुस्थानात ज्या संस्था अस्तित्वात आल्या, त्यांचे इतिहासदृष्ट्या निरीक्षण केले, तर भटांच्या या आश्रम-धर्माच्या आणि वर्णाश्रमाच्या वल्गना म्हणजे शुद्ध बाजारगप्पाच ठरतात. आता भिक्षुकांच्या वर्णशुद्धी, रक्तशुद्धी अथवा जातिशुद्धीचा विचार केला, तर या घमेंडी वायफळ आहेत! कोणाचेही रक्त पूर्वी भेसळीशिवाय राहिलेले नाही, आणि पुढेही रहाणार नाही.  वर्ण या शब्दाचा अर्थ केवळ विवक्षित व्यवसाय किंवा धंदा करणा-या स्त्री-पुरुषांचा संघ, श्रेणी एवढाच होता... आत्मसंरक्षणासाठी, उदरविर्वाहासाठी किंवा स्वतःच्या सुरक्षिततेसाठी जो ज्याचा आश्रय घेऊ शकतो, तो त्याचा आश्रम!  हिंदु समाज म्हणजे एक मोठा थोरला उंच मनोरा आहे. जिवंत माणसे एकावर एक रचून त्यांच्या ढिगा-यांनी हा बनविलेला आहे. प्रत्येक माणसाला पोलादी तारेत जखडून त्याची खुरमुंडी मोट बांधलेली आहे. अशा लक्षावधी मोटा एकावर एकठेवीत ठेवीत कळसाला त्यांचे घुमट साधले आहे.  पायथ्याला अस्पृश्य-शूद्रांच्या गठड्या, त्यांच्या डोक्यावर वैश्यांना कोंबून बसविले आहे. त्यांच्या टाळक्यांवर क्षत्रिय उभे आहेत; आणि या मनो-याच्या कळसावर हातपाय पसरून बसणा-या जातिसंरक्षक भटा-भिक्षुकांनी, कळस-कुत्र्यांनी शूद्रांच्या दुःख-निवारणार्थ आजपर्यंत काय केले?

 वर्ण-व्यवस्था जन्मावर आधारलेली नव्हती, ती गुण-कर्मावर आधारलेली होती.... माणसाची बुद्धिमत्ता जर अनुवंशिक आहे असे मानले तर, शूद्रांमध्येही महान पंडित का तयार झाले? त्या पंडितांना तुम्हा ब्राह्मणाचे स्थान दिले का?.... नाही!  गुण-कर्मावरून जाती किंवा वर्ण ठरवायची राष्ट्रीय चळवळ सुरू झाली, तर ब्राह्मण वर्गातील ७।।। बंधू गुणकर्माचा कस लागताच शूद्राच्या वर्गात धाडकन् ट्रान्सफर होतील! आणि शूद्र वर्ग ‘डिस्टिल्ड’, गाळीव शुद्ध ब्राह्मणांतीत हाडे वरवंट्याखाली ठेचू लागेल.  जातिभेदाचा पुरस्कार करणारी सामाजिक क्षेत्रातील भिक्षुकशाही म्हणजे हिंदुस्थानला जडलेली व्याधी होय.  प्रबोधनकारांची आजी, वय सांगायचीः ''महाराची सावली पडली तर ब्राह्मणाचा महार होतो तर मग महाराचा ब्राह्मण का होत नाही? कसला रे हा सावलीचा चावटपणा?''  जातीभेदाचे बीजारोपण करण्याचा मान ब्राह्मणांकडे जातो. खुद्द शिवाजी विरुद्ध बंड करून कृतघ्नतेचेही पातक त्या वेळच्या ब्राह्मणांकडून घडले... शिवाजी महाराजांच्या व्यापक, राष्ट्रीय भावनेचा, उदात्तपणाचा आणि कनवाळूपणाचा गैरफायदा घेऊन ही सनातनी बंडाळी ब्राह्मणांनी ठिकठिकाणी चालू ठेवली.

 एकाद्या जातीचा नायनाट करण्याचे दोन मार्ग आहेतः एक शरीर-वध आणि दुसरा नीचतर जातीत समावेश. पहिल्या मार्गाने क्षत्रिय जातीचा नाश करणे ब्राह्मण जातीस शक्य नसल्याने त्यांनी दुस-या मार्गाचा अवलंब केला; क्षत्रियांचे वैदिक कर्म हिरावून घेऊन त्यास शूद्र बनविण्याचे प्रयत्न सुरू केले.  महाभारतीय युद्धकाळ आणि बौद्ध धर्माचा उदयकाळ यामधील कित्येक शतकांचा जो अवधी गेला, त्याला ‘कृष्णयुग’ अथवा ‘अंधाराचा काळ’ हे नाव देणे योग्य होईल. ज्या अनेक संस्थांनी आमच्या सामाजिक जीवनाला भलभलती वळणे लावली, त्यांची सुरुवात याच अंधार-काळात झाली. याच काळात स्त्रिया आणि शूद्र यांच्या हक्कांवर व जीवनावर गदा आली. ब्राह्मणांच्या भिक्षुकी सत्तेचा पारा बेसुमार वाढला. कडक जातिभेद निर्माण झाले. स्त्री-स्वातंत्र्याला प्रतिबंध घडला; आणि शूद्रांना शुद्ध गुलामगिरीचे दास्य मिळाले, ते याच ‘अंधार-काळात’. बौद्ध धर्माचा उदय

 बौद्ध धर्माचा उदय म्हणजे सर्व बाजूंनी हिंदुस्थानच्या सुवर्णयुगाची मंगल-प्रभातच म्हटली पाहिजे. या युगाने स्त्रियांना स्वातंत्र्य दिले आणि जातीभेदाच्या चक्रात पिळून निघालेल्या शूद्रांचा सर्वतोपरी उद्धार केला.  इ. स. ७५० ते ८३० दरम्यान रजपूत राजांनी शंकराचार्याच्या पायंड्यावर पाऊल ठेवून मध्य हिंदुस्थानच्या सर्व प्रदेशातून सर्रास बौद्ध जनांचा छळ आणि ससेहोलपट सुरू केली. ब्राह्मणांनी त्यांना सहाय्य केले.  यावेळी बिचा-या बौद्धांची स्थिती मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखी होती. त्यांची खेडी उद्ध्वस्त करण्यात आली. घरेदारे जाळली, लुटली गेली. बायकांची अब्रू घेण्यात आली. पुरुष आणि मुलांना हद्दपार केले. त्यांची सर्रास कत्तल करण्यात आली.  आज आमच्या डोळ्यांपुढे वावरणारे हारी, डोम,