वैचारिक ठिणग्या : Page 4 of 20

यशस्वी होईपर्यंत सर्वजण एकत्र टिकून राहिले हे प्रबोधनकारांच्या मुत्सद्देगिरीचे आणि अधिकाराचे फलित आहे. थोडक्यात सांगावयाचे तर प्रबोधनकार हे एक थोर समाजसुधारक होते, पण पुरोगामी महाराष्ट्रात त्यांच्या कार्याचे योग्य आणि पूर्ण मूल्यमापन झालेले नाही,हे केवढे दुर्दैव! लोकजागृती, लोकशिक्षण आणि समाजपरिवर्तन हेच जीवनाचे ध्येय मानणारे प्रबोधनकार ठणकावून सांगतः ''सामाजिक क्रांतीशिवाय राजकीय क्रांती पूर्णपणे वांझ आहे!'' आणि ही सामाजिक क्रांती घडवून आणण्यासाठी लोकभाषे-शिवाय दुसरा मार्गच नव्हता..... मात्र, प्रादेशिक दुरभिमानाला त्यांच्या मनात मुळीच थारा नसे. ‘प्रबोधन’चे ध्येयच मुळी असे होतेः- समाजकार्यी स्वधर्मतत्त्वी सदा शिलेदार । प्रजापक्ष नवमत संवादी राजस सरदार ।। विशिष्ट पंथ प्रवर्तकांची व्यर्थ न करी पूजा । व्यक्तीचा न मिंधा, बंदा सत्याच्या काजा ।। विश्व निर्मिले जये दयाळे त्या जगदीशाला । भिऊन केवळ, नच अन्यायाला लागे कार्याला ।। --- ‘प्रबोधन’ ः १६ ऑक्टो. १९२१

 सामाजिक क्रांतीशिवाय राजकीय क्रांती फोल आहे.  सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रे गुलामगिरीच्या आचार-विचारांनी चिडचिडलेली, बौद्धिक क्षेत्रात जाणतेपणाचा मक्ता मूठभर सुशिक्षितांच्या हातात बाकी सर्वत्र अज्ञानाची अमावस्येची काळीकुट्ट रात्र, औद्योगिक चतुराई ठार मेल्यामुळे आर्थिक बाबतीत सर्वत्र पसरलेले दैन्य आणि दास्य-अशा स्थितीत राजकीय स्वातंत्र्याची अपेक्षा म्हणजे जुगार खेळणा-यांची सट्टेबाजी.... ही स्वराज्याची लॉटरी लागलीच, तर मूठभर मोठ्या माशांना बाकीच्या अनंत धाकट्या मासोळ्यांना बिगर-परवाना गिळण्याचा सनदपट्टाच होय.  सामाजिक उच्च-नीच भेदभाव, आपण व आपला समाज इतर समाजापेक्षा उच्च दर्जाचा मानणा-या नाना फडणवीशी आणि धार्मिक क्षेत्रात भिक्षुकशाहीची दिवसाढवळ्या चाललेली भांगरेगिरी, या सर्व राष्ट्रविनाशक, समाज-विध्वंसक व दास्यप्रवर्तक दोषांचा आमूलाग्र नायनाट झाल्याशिवाय स्वराज्याचे अमृत प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने जरी हिंदुस्तानच्या घशात कोंबले, तरी त्यापासून त्याचा लवमात्र उद्धार होणार नाही.  सामाजिक व धार्मिक गुलामगिरी कडक सीलबंद ठेवून स्वातंत्र्याची शेखी मिरविणारे लोक, एक तर मूर्ख अथवा अट्टल लुच्चे असले पाहिजेत.  ब्राह्मण ही जात आहे आणि भट-भिक्षुकी हा पेशा आहे. ज्यांना भिक्षुकशाहीची गुलामगिरी नष्ट करून माणुसकीच्या धर्म-स्थापनेची बुद्धी होत नाही, त्यांनी स्वराज्याच्या वल्गना करणे म्हणजे वेश्येने पातिव्रत्यावर पुराणे झोडण्याइतके फाजिलपणाचे आहे.

 सुधारणेसाठीच सुधारणा हेच ख-या सुधारकाचे ब्रीद असते, मग त्याची भाषा रोखठोकच रहाणार! आपल्या विचाराने, आचाराने आणि प्रत्यक्ष कृतीने ज्याने वैचारिक वाङमयाचा महान वारसा महाराष्ट्राला दिला, त्या साहित्यिकास त्याच्या हयातीत एकही वेळा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले नाही. कसे मिळणार? कारण, त्याचे विचार पचविण्यासाठी आतडी मोठी नकोत का? रयत शिक्षण संस्थेचे बीज  १९४५ साली प्रबोधनकारांची एकसष्टी साजरी झाली, तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले, ''आज मी एक गुपित फोडतोः रयत शिक्षण संस्थेची कल्पना माझी असली, तरी त्या बीजाला चैतन्याचे, स्फूर्तीचे आणि उत्साहाचे पाणी घालून अंकुर फोडणारे आणि सुरुवातीलाच संकटाच्या प्रसंगी धीर देऊन विरोधाचे पर्वत तुडविण्याचा मार्ग दाखविणारे माझे गुरू फक्त प्रबोधनकार ठाकरे आहेत..... मी त्यांना वडिलांप्रमाणे पूज्य आणि पूजनीय मानतो. का मानू नये मी? एका प्रसंगी निराशेच्या आणि संतापाच्या भरात चित्त्यासारखी उडी मारून ठाक-यांनी माझ्या हातची बंदूक हिसकावून घेऊन माझे माथे ठिकाणावर आणले नसते, तर कुठे होता आज भाऊराव आणि त्याच्या कार्याचा पसारा?''  ''चातुर्वर्ण्याची निर्मिती गुणकर्मानुसार झाली असे गीता-कारांचे प्रसिद्ध वचन आहे.... ब्राह्मणात सत्त्वगुण प्रमुख, क्षत्रियात रजोगुणाचे प्राबल्य, वैश्यात तमोगुणाचे आधिक्य व शूद्रात कोणताही गुण प्रभावी नाही म्हणे !.... गुणांचा कमी-अधिकपणा कशावरून ठरवायचा? तर कर्मावरून... कमीत कमी गुणाचे प्रतिबिंब दिसते. असा हा तर्कवाद. म्हणजे गुण हे कारण, तर कर्म हा त्याचा परिपाक. सारांश, गुण म्हणजे अव्यक्त कर्म, तर कर्म म्हणजे व्यक्त झालेले गुण.  ह्या शुद्ध व्यावहारिक वर्ण-व्यवस्थेचे असंख्य जातीत पर्यवसान होऊन एकीची बेकी झाली... गुण-कर्मानुसार चातुर्वर्ण्याची निर्मिती झाली. व्यावहारिक किंवा सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्या काळात या व्यवस्थेची