वैचारिक ठिणग्या : Page 3 of 20

ध्येय ठरविलें. तत्वाचा प्रश्न आला की त्यांनी त्याबाबत कधीही तडजोड केली नाही. विधवांच्या केशवपनाची ती अभद्र रूढी असो, देवालयांतील ब्राम्हण पुजा-यांची हुकूमशाही असो, अस्पृश्यतेचा प्रश्न असो वा हुंड्याचा, न्याय मिळविण्यासाठी सारख्याच त्वेषाने किंवा तिडिकेने लढत राहावे इतकेच त्यांना माहीत होते. त्यांना यापासून परावृत्त करण्यासाठी कित्येकांना त्यांना मोहवशकरण्याचा प्रयत्न केला, पण त्या जाळ्यात ते कधी सापडले नाहीत.

अत्यंत सावधानपूर्वक ते या मोहापासून दूर राहिले. अन्याय्य रूढी, जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वक्तृत्व, लेखन आणि प्रत्यक्ष कृति या माध्यमातून त्यांनी सतत पुराणमतवाद्यांशी लढा दिला. आपल्या समाजातील सर्व दुखण्याचे मूळ ब्राम्हणी कर्मकांडात आहे असे त्यांचे मत होते. धार्मिक पूजेचे विधी, उपासतापास आणि ''धर्म'' या नावाखाली सर्व जातीमध्ये जे रुढ परिपाठ आहेत, ते सर्व ब्राम्हणांनी स्वतःच्या हितासाठी प्रस्थापित केले आहेत. या दुष्ट रुढींमुळेच स्त्रियांवर अन्याय होतो, विशेष अधिकारापासून वंचित अशा गरीब बहुजन समाजावर अन्याय होतो. थोडक्यात सर्व अशिक्षित जनता या रुढीखाली भरडली जाते असे त्यांना वाटत असल्याने प्रबोधनकारांनी या मूळावर म्हणजे ब्राम्हणशाहीवर घाव घालण्याचे ठरविले. सुधारक विचारांच्या, उदारमतवादी ब्राम्हणांविषयी त्यांच्या मनांत द्वेषभावना नव्हती. पण धंदेवाईक भट-भिक्षुकशाही व्यवस्थेचे ते टीकाकार होते. संत एकनाथाच्या जीवनावर आधारलेले ''खरा ब्राम्हण'' या नावाचे त्यांचे एक नाटक आहे. त्या नाटकांत त्यांनी स्वतःची ख-या ब्राम्हणाची संकल्पना उलगडून दाखविली आहे. तथापि धंदेवाईक भिक्षुकवर्गावर ते कठोर टीका करीत असत. या त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे ते राजर्षिशाहू महाराजांच्या संपर्कात आले. शाहू महाराज हे स्वतःच सुधारणावादी आणि महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे प्रबोधनकारांचे ते चहाते झाले यात आश्चर्य नाही. पण प्रबोधनकार मात्र त्यांचे होयबा झाले नाहीत. महाराजांनी त्यांची परीक्षा घेतली, कसोटी पाहिली आणि नंतर त्यांनीच जाहीरपणे सांगितले की, ''ज्याला लाच देऊन वश करुन घेता येणार नाही, किंवा विकत घेता येणार नाही अशी मी एकच व्यक्ती पाहिली ती हीच(प्रबोधनकार) होय.'' नंतर ते मुंबईत स्थायिक झाले. त्या काळात त्यांनी हुंडा प्रतिबंधक चळवळ हाती घेतली. हुंडा पद्धतीवर कडक घणाघाती हल्ले केले. हुंडा प्रतिबंधक सर्व जातीची एक स्वयंसेवक सेना स्थापन केली. ही सेना स्वाध्याय आश्रम नावाच्या संस्थेच्या माध्यमातून निर्माण केली व त्यासाठी आपल्या ''प्रबोधना''चा उपयोग केला. या हुंडा प्रतिबंधक मोहिमेचा इतका चांगला परिणाम झाला की त्यामुळे अनेक वरपित्यांना आधी घेतलेली हुंड्याची रक्कम वधूच्या पित्यांना परत करणे भाग पडले. त्यांच्या या मोहिमेची झळ एका न्यायाधिशालाही भोवली.

ज्या काळात आधी ''प्रेम'' करणे हा व्यभिचाराचा गुन्हा समजला जाई त्या काळात प्रबोधनकारांनी अनेक प्रेमिकांचे विवाह लावून दिले होते. ते एक विपुल लेखन करणारे, झपाटलेले लेखक होते. पण त्यांचा भर साहित्यिक गुणाविशेषावर नसून सर्व लेखन विशिष्ट ध्येयाच्या प्रचारासाठीच होते. त्यांनी लिहिलेली ''टाकलेले पोर'' आणि ''खरा ब्राम्हण'' ही दोन्ही नाटके त्याचस्वरुपाची असणे स्वाभाविक होते. या नाटकांनी इतिहास निर्माण केला. ''खरा ब्राम्हण'' नाटकाच्या प्रयोगाला परवानगी देऊ नये, असा पुण्यातील ब्राम्हणांनी न्यायालयात अर्ज केला. या नाटकाचे संवाद अभ्यासून न्यायाधिश म्हणाले, ''ठाकरे धर्माची बाजू उचलून धरीत आहेत. त्यांना विरोध कशासाठी करता? सहकार्य करा!'' संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा त्यांच्या जीवनातील सर्वात महत्वाचा लढा होता. आयुष्यभर संघर्ष करीत राहिल्याने त्यांचे शरीर कृश झालेले होते. वार्धक्यामुळे धावपळ अशक्यप्राय होती. तशा प्रतिकूल स्थितीत त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला नेतृत्व दिले. माग हटण्याचे त्यांनी नाकारले. या चळवळीला दिलेले त्यांचे योगदान इतर कोणापेक्षाही कमी नव्हते. बरोबरीच करावयाची तर ती आचार्य अत्रे किंवा कॉमरेड डांगे यांच्याशी करता येईल. या लढ्यात त्यांनी सर्वात महत्वाची अशी एक भूमिका बजाविली ती ही की, अनेक वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांना आणि व्यक्तींना या चळवळीसाठी एकत्र बांधून ठेवण्यात त्यांनी यश मिळविले. चळवळ