वैचारिक ठिणग्या : Page 20 of 20

होऊ दिली नाही, तर निंदकाच्या माशा येतील कशाला आपल्याजवळ ‘घोंग घोंग’ करायला? (‘माझी जीवन गाथा’ः पान १५१)  म्हणूनच शाहू छत्रपतींच्या मृत्यूची बातमी कानावर येताच प्रबोधनकार कळवळले ः ''अरेरे, दीन दुबळ्यांच्या भवितव्यावरचा सर्च लाईट विझला !'' (पान २६६)  प्रबोधनकार म्हणतातः ''निर्मळ सत्य प्रतिपादनाच्या आड प्रत्यक्ष परमेश्वर आला, तरी त्यालाही लाथ हाणून अप्रिय सत्याची तुतारी फुंकण्यास सत्यवादी वीर मागेपुढे पहात नाही !'' (‘प्रबोधन’ ः १ सप्टेंबर १९२२, पान १२) केमाल पाशाचा आदर्श  ''मनुष्य कितीही विद्वान असला, कितीही विचारवंत असला तरी संकटाचा एकदा फटका लागताच ज्योतिषाच्या मोहजालात अडकण्याचा धोका तो टाळू शकतो, असे नाही ! पण, तो टाळलाच पाहिजे..... लोकांनी या फंदात पडू नये, म्हणून तुर्कस्थानात अतातुर्क केमालपाशाने ‘रमल’ चा धंदा फौजदारी गुन्हा ठरविला !..... आपल्याकडे केंद्रातही ज्योतिषाला ठाणेदारी लाभली आहे, मग इतरांची काय कथा?'' (‘माझी जीवनगाथा’ः पान ३८३)

 जातिभेद आणि स्त्री-दास्य यांचे नाते जुळ्या बहिणींप्रमाणे आहे; तेव्हा सामाजिक समता आणि स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करायची असेल, तर ती जबाबदारी अस्पृश्य समाजाने आणि संपूर्ण स्त्रीवर्गाने उचलणे गरजेचे आहे !  लोकहितवादी, आगरकर, गोपाळकृष्ण गोखले यासारख्या असंख्य सुधारकांची मुक्तकंठाने स्तुती करताना प्रबोधनकार म्हणतात, ''महाराष्ट्रातील मुसलमान जात्या मूळचे हिंदूच, पण टिळकांच्या गणपती-मेळ्यांनी व शिवाजी उत्सवांनी त्यांची मने हकनाक दुखावली गेली. नाईलाज म्हणून ते फटकून वागू लागले, तर त्यात दोष कुणाचा?''  ''हिंदुस्तानच्या राष्ट्रीय उद्धारात हिंदूंना मुसलमानांच्या एकीचीही आवश्यकता आहे; ही गोष्ट राजकीय क्षितिजावर महात्मा गांधींचा उदय होईपर्यंत कोणीच लक्षात घेतलेली दिसत नाही !'' (‘संस्कृतीचा संग्राम’ ः पान १०-१२) आजही आपल्या समाजात विषमता, अज्ञान, अंधश्रद्धा, हुंडापद्धती, हुंडाबळी, देवधर्म, पुराणांचे दास्यत्व, श्राद्ध आदि कर्मकांडे, सत्यनारायण आणि महाआरती यांचे स्तोम माजलेले आहे. अशा वेळी प्रबोधनकारांच्या बुद्धिप्रामाण्यवादाची कास धरून समाजाला निरोगी, सुदृढ बनविण्याच्याच मार्गाने वाटचाल आपणास केली पाहिजे. जय महाराष्ट्र । जय हिंद ।। जय जगत् ।।।