वैचारिक ठिणग्या

प्रसिद्ध एकपात्री कलाकार आणि लेखक रंगनाथ कुलकर्णी यांनी प्रबोधनकारांचे विचार ठिणग्या या पुस्तकात एकत्रित केले आहेत. प्रबोधन प्रकाशनने छापलेल्या या पुस्तकात आपल्याला प्रबोधनकारांच्या विचारांची धग अनुभवता येते.

 

प्रबोधनकार ठाकरे यांच्या वैचारिक ठिणग्या संकलन- रंगनाथ कुलकर्णी

प्रबोधन प्रकाशन

संकलक रंगनाथ कुलकर्णी ३५ चिरंतन, शिवसृष्टी कुर्ला(पूर्व), मुंबई ४०००२४ दूरध्वनीः ५२२१७५८.

प्रकाशकः सुभाष देसाई विश्वस्त प्रबोधन प्रकाशन सद् गुरू दर्शन, प्रभादेवी, मुंबई ४०००२५.

अक्षर जुळणीः एम. के. प्रिन्टर्स १०, निर्मल इंडस्ट्रीयल इस्टेट, राममंदिर रोड, गोरेगाव(पश्चिम), मुंबई ४००१०४.

प्रकाशनः २५ एप्रिल १९९९ किंमतः २५- रु.

प्रस्तावना

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची नेमकी ग्रंथसंपत्ती किती हे सांगणे कठीण आहे. मराठी साहित्याची अत्यंत विश्वसनीय अशी दाते सूची देखील तो नेमका आकडा देऊ शकलेली नाही. कारण दादांचा मुक्काम महाराष्ट्रात इतक्या ठिकाणी होता की, त्यांनी कुठे कुठे काय काय लिहिले हे कोणी ठामपणे सांगू शकेल असे वाटत नाही. सांगली जिल्ह्यात दादांच्या एका अनुयायाने जतन करून ठेवलेला एक मोठा ठेवा राज ठाकरे यांनी मिळवला. काही पुस्तके मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातून उपलब्ध झाली. सरकारच्या योजनेनुसार दादांच्या समग्र ग्रंथांचे प्रकाशन करीत असताना मी गारगोटीहून डॉ. मा. गो. माळी यांच्याकडील एक पुस्तिका आणि दादांचे कोल्हापूरचे प्रकाशक ‘दासराम बुक डेपो’ यांजकडून काही पुस्तिका मिळवल्या. त्यांची एकत्रित संख्या ४०च्याही पुढे भरते. दादा जिथे जिथे जात तिथे तिथे पुस्तिका काढीत असत. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या १९५६ ते १९६० या काळात त्यांनी दर रविवारी जळगावच्या बातमीदार पत्रात लेख लिहिले. त्याच काळात ‘नवाकाळ’ मध्ये ‘घाव घाली निशाणी’ हे सदर दर रविवारी लिहिले. हे ठेवे अजून उपलब्ध व्हायचे आहेत. प्रसिद्ध लेखक, एकपात्री प्रयोगकार वगैरे बरेच काही असणारे, रंगनाथ कुलकर्णी यांनी या समुद्रात बुड्या मारून काही टपोरे पाणीदार मोती वेचून त्यांचा हा छोटासा संग्रह तयार केला आहे. प्रबोधनकारांचे विचार केवळ त्या काळापुरते होते. आज महत्त्वाचे नाहीत असे म्हणून हा मामला सोडता येणार नाही. कारण त्यांनी ज्या सामाजिक दोषांवर आणि अन्यायावर अग्निवर्षाव केला ते प्रकार आजही घडत आहेत. दादा नुसते विचारांचे सुधारक नव्हते. जिथे कृतीची गरज पडली त्या ठिकाणी त्यांनी कोणाचीही भीडभाड न ठेवता ती केली. असले विचार सांगण्याबद्दल आणि कृतीत आणल्याबद्दल त्यांनी अनन्वित हालअपेष्ठा सहन केल्या पण हार पत्करली नाही. द्विभाषिक राज्य हा महाराष्ट्रावरचा सर्वात मोठा अन्याय होता. त्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समिती घडवण्यापासून तो लढा यशस्वी होईपर्यंत एकत्र ठेवण्यापर्यंत त्यांनी केलेले काम आज फारशा लोकांच्या आठवणीत नाही. रंगनाथ कुलकर्णी यांनी उतारवयात खूप मोठे काम केले आहे. त्या कामाचा आकार लहान असला तरी मोल मोठे आहे.

- पंढरीनाथ सावंत.

मनोगत

आदरणीय श्री. केशव सीताराम ठाकरे तथा दादा यांना ‘प्रबोधन’कार म्हणतात ते उगाच नाही. ते ‘प्रबोधन’चे संपादक होते. तसेच ते स्वकर्तृत्वाने आणि वृत्तीनेही ‘प्रबोधन’कारच होते. त्यांच्या वाणीत तुकारामाचा सडेतोडपणा होता, तर लेखणीला मर्द मावळ्याच्या तलवारीची धार होती. मी स्वतः दादांची अनेक भाषणे ऐकलेली आहेत. तसेच आचार्य अत्र्यांच्या मैफिलीत त्यांच्या गप्पाही ऐकल्या आहेत. सामाजिक समता, जात-पात तोडणे, स्त्री-पुरुष समानता, अंधश्रद्धा निर्मूलन, साक्षरता प्रसार वगैरे विषयांवरील दादांची मते आजच्या तरुण-तरुणीपर्यंत तातडीने पोहोचविणे मला अगत्याचे वाटते. गेली दीडदोन वर्षे मी पुस्तिकेच्या प्रकाशनासाठी भांडवल उभारणी कशी करावी, या चिंतेत होतो. तो प्रश्न परवा अजितेम जोशींच्या सांगण्यावरून श्री. सुभाष देसाई यांनी आता सोडविला आहे. या दोघांच्या ऋणात मी राहू इच्छितो. श्री. पंढरीनाथ सावंत यांचे मनापासून आभार. ही सुबोध पुस्तिका तयार करताना मला आज-याचे प्रा. नवनाथ शिंदे यांनी केलेल्या मौलिक संशोधनाचा खूप उपयोग झाला. त्यांना मनापासून धन्यवाद ! मोठमोठे ग्रंथ ग्रंथालयात पडून राहतात. विद्वान पंडित सवडीने ते वाचतात. पण,