पोटाचे बंड: Page 7 of 7

कसली? लाज जाळल्याशिवाय लाळ घोटताच येत नाही. ज्यांनी लज्जेलाच लाजविली, त्यांना या जगात वाटेल ते दुष्कर्म करण्याची मुभा! धर्मार्थ मिळविलेल्या तांदळाचा भात त्यांच्या खुशाल पचनी पडतो. शिक्षणप्रसारार्थ जमविलेला फंड शेतात गुप्त झाला किंवा सार्वजनिक बोर्डिगासाठी आणलेले पत्रे त्यांच्या घरांवर उड्या मारून गप्प बसले, तरी त्यांच्या मनाला काही दिक्कत वाटत नाही; कारण या प्राण्यांना मुळी मनच नसते. असले हृदयशून्य लोक राजे व श्रीमंतांच्या पदरी असल्यामुळेच त्यांच्या दुष्कृत्यांवर सफेदा चढतो व लोकांत त्यांची कीर्ती होते. माणसांतल्या सुरवंटांचीच खरीखुरी हालचाल ते श्रीमंतांची मनधरणी करीत असताना व त्यांच्या मागेमागे गोंडा घोळविताना वाटेल त्याने मुद्दाम निरीक्षण करावी, म्हणजे माणसाची माणुसकी किती नीच अवस्थेपर्यंत येऊन पोहोचते, हे चांगले कळेल. असले स्वार्थासाठी वाटेल त्याचा गळा कापण्यास मागेपुढे न पहाणारे माणसातले सुरवंट ठिकच्या ठिकाणी ठेचण्याची ठोशेबाजी ठणकावून सुरू केल्याशिवाय हिंदुस्थानाची लोकशाहीच्या मार्गावर प्रगती होणे बरेच दुरापास्त आहे, एवढीच सूचना सध्या पुरे.

टीप *१ – ‘कनिंग’ या इंग्रेजी शब्दाचा भावार्थ स्पष्ट होण्यासाठी मारवाडी आणि पठाण या परिचित शब्दांची योजना केलेली आहे. या दोन लोकांचे सावकारी अत्याचार उभ्या हिंदुस्थानात कुप्रसिद्ध आणि सर्वश्रुतच आहेत.

टीप *२ – गोरा इंग्रज ‘स्पोर्टमनशिप’ची (दिलदारपणाची) नेहमी मोठी घमेंड मारतो. तो जर जर्नालिस्ट (वृत्तपत्रकार) असेल, तर या घमेंडीच्या वल्गनांची टिमकी बरीच तावातावाने वाजवितो; कारण जर्नालिस्ट हा स्पोर्टस् मनच असला पाहिजे, असे एक सूत्र आहे. पण हे स्पोर्टस्मनशिपचे स्पिरीट गोरा गो-याशी केव्हाही बिनतक्रार दाखवील; कारण दोघेही गो-या खाणीतले. पण काळ्या जर्नालिस्टशी वागताना, हिंदुस्थानला दत्तक आई मानून, फ्रेण्ड ऑफ इंडियाच्या दांभिक बुरख्याखाली वावरणारे गोरे पोटभरू जर्नालिस्ट आपल्या काळ्याकुट्ट हृदयातली डांबर मनाच्या हलकट पिचकारीने कशी उडवितात, याचा प्रस्तुत लेखकाला चांगला अनुभव आलेला आहे. + Mr. Mostyn was sent to Poona by the Bombay Government, for the purpose of….. using every endeavour, by fomenting the domestic dissensions or otherwise to prevent the Mahrattas from joining Hyder or Nizam Ally – History of the Mahrattas p. 340 (T. of I. Ed_ Bombay 1873) टीप *३ – देशी राजांची बदनामी करण्याचा हा असला आंग्रेजी वाण नाही पण गुण ब्रिटीश खालसातल्या भटी वृत्तपत्रकारांनी छान उचलला आहे. बेटे इंग्रेजी सत्तेची बेशरम गुलाम, पण डौल आणतात केवढ्या तत्त्वज्ञानाचा! मुंबईच्या ‘विविधवृत्त’ पत्राच्या संपादकाने काही दिवसांपूर्वी सर तुकोजीराव होळकरांनी इंदौरात कोटकोट रुपये खर्चून राजवाडे बांधल्याबद्दल कडकडून बायकी बोटे मोडली होती. परंतु व्हाईसरॉय साठी करोडो रुपये खर्चून दिल्लीस बांधायला सुरुवात झालेल्या महा राजवाड्याबद्दल शब्द काढायची त्याची छाती झाली नाही. स्वकीयांच्या पिकवी कंड्या, जबरदस्तापुढे गाळी लेण्ड्या!