पोटाचे बंड: Page 6 of 7

लाथाडले तरी बिचूक त्यांची पिकदानी धरायला ते राजीखुषीने अक्कलहुशारीने धावतात, म्हणून त्यांना कोणी जेहत्ते लाळघोटे असेही म्हणतात. देवाला जसे संध्येतल्या निरनिराळ्या २६ नावाने हाका मारल्या तरी देव अखेर एकच, तसे हांजीहांजीखोर, लाळघोटे, पाजी, चुगलखोर, भाडखाऊ वगैरे अनंत नावे या महात्म्यांना कोणी दिली, तरी अखेर यांचे खरे नाव सुरवंट हेच होय. प्राचीन राजे लोकांनी या सुरवंटांना खुद्द दरबारात मानाची खुर्ची देण्याची वहिवाट पाडल्यामुळे, त्यांच्या पागलपणाची मोठी चलती उडाली. दरबारी खुषमस्क-या व दरबारी मानकरी या दोघा नंदीबैलांत खुषमस्क-याची पायरी वरची.

मानकरी खुषमस्क-या नसे, किंवा खुषमस्क-या मानकरी बनत नसे असे नाही. पण खुषमस्क-याचे पाऊल थेट सरकारस्वारीच्या रंगमहालापर्यंत लांबत असे; मानक-याला आपल्या मानेभोवतीच गिरक्या मारीत फिरावे लागत असे, एवढाच फरक खुषमस्क-याला जिव्हाचांचल्य आणि जुगलखोर लाळघोटेपणा एवढ्याच भांडवलावर राजाच्या हृदयाच्या अंतरंगापर्यंत जाण्याची परवानगी; पण शत्रूचा पाडाव करून आलेल्या सरधोपटमार्गी तलवारबहाद्दर गड्यास मानसन्मानाची दरबारातल्या दरबारात बोळवण. असा प्रकार असल्यामुळे सुरवंटांचा समुदाय साहजिकच अधिक वाढला आणि अखेर त्यांचे रूपांतर देशद्रोही देशघातकी मातृगमन्या नरपशूंच्या संख्याधिक्यांत झाले. सुरवंट हे बोलून चालून खिरीची भोक्ते. खीर संपली की सुरवंट गेले. गेले म्हणजे मेले नव्हत. सुरवंटांचे फुलपाखरांत रूपांतर होते. सुरवंट असतांना धीमेधीमे रांगणारा प्राणी रूपांतरात मनस्वी भरा-या मारणारा बनतो. राजेरजवाड्यांच्या प्राचीन खुषमस्क-यांची संस्था आज जरी नामशेष झाल्यासारखी दिसत असली, तरी विद्यमान राजांच्या भोवती निरनिराळ्या रूपांतराने सुरवंटांचीच कुंपणे पडलेली आहेत. त्याचप्रमाणे खुशालचेंडु श्रीमंतपुत्रांची दालने, अचाट बुद्धि चालवून बळेच लक्ष्मी मिळविलेल्या श्रीमंतांची माजघरे आणि एखादी विशिष्ट चळवळ चालविणारांना मधूनमधून उगाच लहरी दाखल देणग्या देऊन स्वतःचा बडेजाव माजविणारांच्या ओस-या सध्या नानाविध सुरवंटांनी नुसत्या गडबडलेल्या आहेत. हिंदुस्थानच्या राष्ट्रीय अस्तित्वाची व त्याच्या स्वातंत्र्याची जर कोणी राखरांगोळी केली असेल तर या चुगलखोर सुरवंटांनीच होय. गझनीच्या महंमदाच्या स्वारीपासून तो थेट सातारची छत्रपतीची गादी ईस्ट इंडिया कुंफणीच्या अंगाखाली जाईपर्यंत, नव्हे, १८५७च्या बंडापर्यंत, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यार्थ जे जे बरे वाईट प्रयत्न झाले, त्यांच्या नाशाला या हरामखोर चुगलखोल लाळघोट्यांची सुरवंटशाही कारण झाली, असा इतिहासाचा पुरावा आहे. सातारच्या प्रतापसिंह छत्रपतीला याच स्वराज्यद्रोही स्वार्थी चोरांनी राज्यभ्रष्ट कसे केले आणि सत्तावनच्या बंडांत कोणकोणत्या मानवी सुरवंटांनी चहाड्या चुगल्यांच्या चुल्हाणावर रंगो बापूजी गुप्त्यासह शेकडो राष्ट्रसेवकांना जिवंत भाजले, वाचा इतिहास याच लेखणीतून प्रबोधनाच्या आश्रयदात्यांच्या सेवेला क्रमशः रुजू होत आहेच.

तत्कालीन चुगलखोरांनी हिंदवी स्वराज्याचा मुर्दा पाडून, त्याच्या रक्तावर आपल्या जहागिरी व इनामे वंशपरंपरा रंगवून घेतली, आणि आपल्या पुत्रपौत्रादिकांना ‘पितरपाखातल्या खिरी’ची अखंड सोय करून ठेवली. आज तर ही चुगलखोर सुरवंटांची संस्था हिंदी राजे, श्रीमंत व कोट्याधीश गिरणी कारखानदार यांनी चांगलीच आश्रय देऊन चालविली आहे. हल्ली देशांत ज्या अनेक चळवळी सुरू आहेत, त्यातही या राजे व श्रीमंत लोकांनी आपल्या सुरवंटांची मुबलक पेरणी पेरून ठेवली आहे. उद्यांची अपेक्षित भारतीय लोकशाही म्हणजे राजेशाही व श्रीमंतशाही यांच्या उरावर फिरणारा रावणी वरवंटा होय, ही त्यांची खात्री असल्यामुळे त्यांना आपल्या सुरवंटामार्फत प्रत्येक चळवळीत फाटाफाटू पाडून आपले सुरवंटी ऐश्वर्य कायम राखण्याचा प्रयत्न करणे आवश्यकच होऊन बसले आहे. कित्येक श्रीमंत आपल्या सुरवंटांमार्फत आपल्या नकली जनसेवेची टिमकीही पिटवून घेत असतात. सारांश, सध्याचे हिंदी राष्ट्र हे चुगलखोरांचे राष्ट्र बनले आहे. श्रीसमर्थ आज अवतीर्ण झाले तर ते एकदम संतापाने ओरडून म्हणतील की, देशद्रोही तितुके कुत्रे । मारुनि घालावें परते ।। चुगलखोरी आणि हांजीहांजीखोरपणा या दोन दुर्व्यसनांचा आज फार फैलाव झालेला आहे. प्रत्यक्ष खुनी माणूस पत्करला; पण हे हांजीहांजी करणारे लाळघोटे, दगलबाज पत्करत नाहीत. ख-याचे खोटे आणि खोट्याचे खरे करणे ही त्यांची सहजलीला. खुनी माणसाचे काळीज उरफाटे असते असे म्हणतात; पण या लाळघोट्यांना मुळी काळीजच नसते. ज्यांचे अंतःकरणच मेलेले, त्यांना विवेक कसला आणि लाजलज्जा तरी