पोटाचे बंड: Page 5 of 7

होतो आणि ‘पितरपाखातली खीर’ खाल्ली की गुप्त होतो. माणसातले सुरवंट असेच खिरीचे मोठे भोक्ते असतात. यांचा आणि श्रीमंतांचा मोठा परिचय. हे नेहमी श्रीमंतांच्या भोवती गोंडा घोळीत फिरत असायचे. यांचे पीक हिंदुस्थानाइतके इतर कोणत्याही राष्ट्रात उमाप पिकत नाही. हिंदुस्थानातल्या राजेरजवाजड्यांनीच या सुवंटाची अवलाद या देशात प्रथम मुबलक पैदा केली; आणि त्या मुळेच आज हिंदू श्रीमंतांचे दिवाणखाने व आंगणे या प्राण्यांनी गजबजून गेलेली आढळतात. श्रीमंतांना या सुरवंटांचे महत्त्वही तसेच जबरदस्त आहे. जगातून हे मानवी सुरवंट नाहीसे झाले किंवा केले, तर श्रीमंतांना आपल्या ख-या खोट्या श्रीमंतीचीचशी काय, पण खुद्द माणुसकीची बोंब तिव्हाट्यावर येऊन स्वतः मारावी लागेल. शेणाच्या कुझक्या पोहोट्यात ज्याप्रमाणे विंचू महाराज आपले बिनचूक उदयास येतात, त्याप्रमाणे श्रीमंतांच्या बेअक्कल पोरांचा जन्म होऊन त्यांच्या तोंडात मधाचा बिंदु जाण्यापूर्वीच या सुरवंटांच्या स्तुतिपाठाचा पाट आईबाप आणि ते पोर यांच्या कानात धो धो कोसळतो. पावसाने डोळे वटारून सा-या दुनियेला तब्बल बारा वर्षे जरी निर्जळी एकादशी घातली, तरी श्रीमंतीच्या उबा-यावर जगणा-या सुरवंटाच्या स्तुतिपाठाच्या पाटाचे पाणी रतिमात्र हटायचे नाही. सुरवंट हा श्रीमंताचा ‘सर्वंट’ असो वा नसो, त्याच्याशिवाय श्रीमंतांच्या श्रीमंतीला विधवेप्रमाणे दाहीदिशा शून्य होतात. आपली श्रीमंती विधवा होऊ नये, आपल्या वैभवाचा डांगोरा पोटातल्या पोटात जिरू नये, आपल्या बाष्कळ व थिल्लर वर्तनाचे लोकांत नागवे प्रदर्शन होऊ नये आणि आपण स्वतः इतर प्राकृत माणसांप्रमाणेच माणूस आहो ही जाणीव इतरांस व खुद्द स्वतःसही होऊ नये, म्हणून मानवी सुरवंटांचे थवेच्या थवे जवळ बाळगिण्याचा संप्रदाय प्राचीन भारतीय राजेलोकांनीच सुरू केल्यामुळे, तो आजपर्यंत अव्याहत चालू ठेवण्याचे पुण्य कार्य सध्याचे राजे व गर्भश्रीमंत लोक करीत असतात. काय करतील बिचारे! वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकून चालणारी ही इमानी मेंढरे!! राजे व श्रीमंत तोंड असून मुके, कान असून बहिरे, डोळे असून आंधळे आणि माणूस असून बेअक्कल का? अशा शंका पुष्कळांना पुष्कळ वेळा येते.

श्रीमंतांची शेकडा ९९ पोरे मूर्ख, लहरी व पोरकट का असतात? याचेही पुष्कळांना कोडे पडते. परंतु माणसांतला सुरवंट हा प्राणीच असा पराक्रमी आहे की श्रीमंतांच्या श्रीमंतीला त्याची झळ लागताच हे सर्व चमत्कार घडविणे त्याच्या बत्तीस दातांचा मळ! श्रीमंतीच्या उबा-यांत जन्मलेली आणि त्या उबा-यावरच जगणारी ही माणसांतल्या सुरवंटांची संख्या हिंदुस्थानात अलीकडे इतकी भरमसाट फुगली आहे की त्यांची एक स्वतंत्र जातच बनली आहे. सुरवंटाचा एक संप्रदायच निर्माण झालेला आहे. या सुरवंटांचे मुख्य आकर्षण-केंद्र जरी श्रीमंतांचे कासोटे व पायजमे असले, तरी त्यांच्या चळवळी समाजात सर्वत्र सुरू असतात. हा प्राणी दिसतो तसा नसतो. याचा चेहरा बावळट असला तरी अंतःकरण अचाट खटपटीत गुंग असते. अंतःकरणातले विचार चेह-याच्या तबकडीवर केव्हाच उमटू न देण्याची त्याची कुशलता वर्णनीय नसली तरी निरीक्षणीय खास असते. सुरवंटाच्या संप्रदायाचा गंडा मनगटावर चढविण्यापूर्वी प्रत्येक उमेदवाराला आपल्या हृदयाच्या कारभाराच्या दो-या चोहरा-तबकडीपासून आमूलाग्र उखडून काढाव्या लागतात. तोंडात दातांची बत्तिशी शिल्लक असो वा नसो, आपल्या श्रीमंत पुरस्कर्त्यांच्या तोंडून निघणा-या ब-या वाईट शब्दाला हीहीहीहीचे आगत स्वागत देण्यासाठी त्याची बत्तिशी हुकमी सज्ज पाहिजे. त्याच्या पाठीचा कणा बजरंग बलीच्या सोट्याप्रमाणे ताठ आणि कणखर असला, तरी श्रीमंतांच्या समागमात येताना कमरेपाशी तो धनुकलीप्रमाणे वाकविलेला असावा. ख-या खोट्याची चाड मुळीच न बाळगिण्याइतकी त्याची मनोवृत्ती परमहंस बनलेली असावी. उमेदवाराला चहाचे व्यसन असो वा नसो, त्याने चहाड्या चुगल्या सांगण्याची कला उत्तम हस्तगत – नव्हे, जिव्हागत – करून ठेवलीच पाहिजे. श्रीमंतांना पंचपक्वानांच्या मेजवानीपेक्षा चुगलखोरांच्या चुगल्या खाण्याची फार आवड असते. वेळी अन्नपाण्याशिवाय श्रीमंत लोक पंधरा वीस दिवस सहज जगतील, पण सुरवंटांच्या चहाड्यांशिवाय ताबडतोब आत्महत्या करतील. श्रीमंतांच्या प्रत्येक सुस्का-याला एकदा हां व एकदा जी करण्याचा सुरवंटांचा संप्रदाय असल्यामुळे, कोणी त्यांना हांजीहांजीखोर असे म्हणतात. त्यांना श्रीमंतांनी कधी झिडकारले,