पोटाचे बंड: Page 4 of 7

भेद माजले आहेत, त्याला मूळ कारण चामड्याच्या झोपडीला लागलेली आग हे जरी असले, तरी ती आग तात्पुरतीच बुझऊन तिच्या ज्वाळा अव्याहत भडकत ठेवण्यावरच श्रीमंतांच्या श्रीमंतीची भरती अवलंबून असल्यामुळे, श्रीमंतीच्या न शमणा-या भुकेनेच हे भेद दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत चालले आहे. सामाजिक समतोलपणाचा कल श्रीमंतांच्या राक्षसी पोटाकडे कलंडल्यामुळेच आज पोटार्थी गरिबांचे हाल कुत्रासुद्धा खाईनासा झाला आहे. गरिबांचे हे हाल किंवा त्यांच्या पोटाचे हे बंड जगाच्या दुःखाला सर्वस्वी कारण आहे. ते कारण दूर करावयाचे असल्यास श्रीमंत कारखानदारांच्या धनलोभाला व सत्तातृष्णेला तोंडबेडी चढविण्याचे प्रयत्न मजुरांनी संघटित रीतीने केल्याशिवाय गत्यंतर नाही. सगळे पोटे पत्करली. पण श्रीमंतीची भूक लागलेल्या कारखानदारांच्या पोटाची आग परवडत नाही!

ही आग आमूलाग्र विझविण्यासाठी विलायतेत मजूर पक्ष अस्तित्वात आला आणि अनेक वर्षांच्या तपश्चर्येने आज तो साम्राज्य सत्ताधीश झाला, ही गोष्ट आमच्या हिंदी मजुरांनी सतत दृष्टीपुढे ठेवून संघटनेच्या जोरावर आपल्या पोटाचे बंड मिटवावे, असी सूचना करून आम्ही आमच्या पोटाच्या व्यवसायाकडे वळतो. माणसांतले सुरवंट [प्रबोधन वर्ष ३ रे अंक १०वा ता. १-३-२४] या जगात अनंत आश्चर्ये आहेत. आश्चर्यांनी ही सृष्टी नटलेली नसती, तर इहलोकची जीवनयात्रा अत्यंत उदासीन व कष्टप्रद झाली असती. कोठेही नजर टाका, जिकडे तिकडे काही ना काही आश्चर्य म्हणून आहेच. पृथ्वीच्या अगाध उदरातील खनिज द्रव्यांच्या चमत्कारांपासून तो थेट मनुष्यस्वभावाच्या चमत्कारापर्यंत एकापेक्षा एक वरचढ असा अनंत आश्चर्यांनी आपल्या सभोवारची ही सृष्टी आरपार फुललेली आहे. परंतु सर्वसाधारण मनुष्याला या आश्चर्यांचे निरीक्षण व अभ्यास करण्याइतकी फुरसद नसते म्हणा किंवा प्रवृत्तीच नसते म्हणा विशेषतः साता कोसावरचे दिसते, पण हाताजवळचे भासतसुद्धा नाही, हा माणसाचा स्वभावधर्मच पडल्यामुळे, हा स्वभावधर्मच केवढे मोठे आश्चर्य आहे, याची कोणी सहसा दाद घेत नाही. इतर सर्व शास्त्रांपेक्षा मानवस्वभाव-निरीक्षण व परीक्षण हे एक महत्त्वाचे शास्त्र आहे, व्यक्ती तितक्या प्रकृती ही म्हण आपण नेहमी बोलतो व लिहितो. पण या भिन्न भिन्न प्रकृती निरनिराळ्या व्यक्तीत का दिसतात, त्यांचा परिपोष कसा होतो, त्या प्रकृतीचा व्यक्तीच्या अंतर्बाह्य चारित्र्यावर काही ठसा उमटतो की नाही, उमटत असल्यास त्याचे परीक्षण कसे करावे, यइत्यादि प्रश्नांचा विचारच कधी आपल्यास सुचत नाही. मानसिक विकारांची सारी घडामोड अंतःकरणात चाललेली असते. या घडामोडीचे प्रतिबिंब चेह-यावर स्पष्ट उमटते. म्हणूनच एका तत्त्ववेत्त्याने म्हटले आहे की मनुष्याचा चेहरा म्हणजे अंतःकरण – घड्याळाची तबकडी होय. या तबकडीवर सर्व विकारांचे काटे बिनचूक फिरत असतात. इतकेच नव्हे तर त्यांच्या या बिनचूक विकारदर्शनाची ठोकळ चिन्हे चेह-यावर कायमची ठसली जातात. फिझिऑनमी म्हणजे चेहरेपट्टी. वरून स्वभावपरीक्षण करण्याचे एक स्वतंत्र शास्त्रच आहे. या शास्त्राच्या साह्याने व्यक्ति तितक्या प्रकृती कशा? एवढ्याच प्रश्नाचे उत्तर मिळते असे नव्हे, तर वदनाकृतीवरून प्रकृतीचेही तंतोतंत निदान ठरविता येते. नेहमीच्या व्यवहारात किंचित चिकत्सक दृष्टीने माणसांच्या चेहरेपट्टीचा त्यांच्या बोलण्या चालण्याशी व आचार विचारांशी तुलनात्मक निरीक्षणाचा अभ्यास ठेवला, तर काही दिवसांनी फिजिऑनमीचे शास्त्र न पाहताही आपल्यास मानव-स्वभावपरीक्षणाची कला हस्तगत होणे शक्य आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि त्याचे ज्ञान करून घेणे प्रत्येक विचारी व व्यवहारी मनुष्याला हितकर आहे. हा अभ्यास वाटेल तेव्हा वाटेल तेथे सुरू करता येतो. याला भांडवल लागत नाही. गुरूपदेशाची जरूर नाही. साहित्याची अ़डचण नाही. डोळे उघडे असले म्हणजे झाले. निरीक्षणाची कसोशी, मननाची पराकाष्टा आणि आपले सिद्धांत आपणच पडताळून पाहण्याची न्यायनिष्ठुरता, एवढ्या सामुग्रीवर हा अभ्यास तोंडातून एक अवाक्षरही न काढता इतका बळावतो की पुढे पुढे नुसता फोटो पाहूनसुद्धा एखाद्या माणसाच्या स्वभावाचे अचूनक निदान ठरविता येते.

या मनोरंजक विषयाकडे प्रबोधनाच्या वाचकांचे लक्ष वेधावे, म्हणून. माणसातले सुरवंट कसे असतात याचा थोडा शब्दपरिचय करून देण्याचे योजिले आहे. सुरवंट हा कीटक पितर पक्षातल्या हंगामातच विशेषतः उत्पन्न