पोटाचे बंड: Page 3 of 7

म्हणजे एक पाण्याचा बुडबुडा किंवा गिरणीवाल्या शेट्याची गुलामगिरी करण्यासाठीच देवाने दिलेला एक काळ, या कल्पनेमुळे व्यसनांचा झालेला अतिरेक आणि दिवसाचे २४ तास जीवनकलहाची तोंडमिळवणी करता करता मेटाकुटीला आलेली ती त्रासदायक चिडखोर वृत्ती हे चित्र पहाणा-याच्या तोंडून अखेर हाच उद्गार निघेल की ‘नरक जर पृथ्वीवर कोठे असेल तर तो येथेच येथेच येथेच!’

सारांश, गिरण्या, कारखाने व फॅक्ट-या म्हणजे जिवंतणीच माणसांना मरणाचा अनुभव दाखविणा-या आणि माणसे असताही त्यांची जनारे बनविणा-या नरकाच्या खाणीच म्हटल्या तरी चालतील. या खाणी कोणी उत्पन्न केल्या? या खाणी पोटाने निर्माण केल्या. होय. पण असे हे पोट तरी कसले की त्याची खांच बुझविण्यासाठी कोट्यवधि माणसे जिवंतणी प्रेतासमान होतात? असे हे राक्षसी पोट तरी कोणाचे की ज्याच्या शांतवनासाठी लाखो लोकांच्या पोटातली आतडी पिळून निघावी? त्यांच्या रक्ताचे झालेले पाणीसुद्धा त्यांच्या शरीरात उरू नये? औद्योगिक प्रगतीच्या नावाखाली अखिल राष्ट्राच्या शारीरिक प्रगतीचे होळकुकडे करण्यास उद्युक्त झालेले आणि भुकेने पेटलेली पोटे ‘दया करा, थोडी अधिक भाकर द्या’ म्हणून किंकाळ्या मारीत असताना ज्या पोटाच्या वीत दीडवितीवरच असलेल्या कानांची भोके साफ बुजून जातात, असे हे पोट तरी कोणते? आणि कोणाचे? हजारो लाखो पोटांच्या तिडकांवरच ज्याची भूक भागविली जाते, असे तो पोट म्हणजे प्रदर्शनात ठेवण्यासारखीच एखादी वस्तु असेल काय? नाही. पोटासारखेच पोट. पण त्याच्या भुकेची आग आणि खाद फार भयंकर. हे पोट दुसरे तिसरे कोणाचे नसून गिरणीवाले कारखानदार यांचे होय. जगातल्या पोटाच्या पापावर या बड्या पोटांची खाच शृंगारली जात असते. कारखानदार आणि कामगार यांच्यामध्ये श्रीमंतीचे एक भले जाडजूड फिल्टर लटकले असल्यामुळे. कामगारांच्या लक्षावधी पोटांच्या तिडका त्यात शिरताक्षणीच त्यांचे पौष्टिक खाद्यात रूपांतर होते. या फिल्टरामुळे मजुरांच्या पोटांच्या किंकाळ्या कारखानदारांना मुळीच ऐक न येता, त्याऐवजी त्यांच्या श्रीमंती वैभवाला झिलईची झकाकी चढविणा-या स्तुतिस्तोत्राच्या मंजुळ गायनात त्या किंकाळ्यांचे परावर्तन होते. पोटाच्या पापाने निर्माण केलेल्या श्रीमंत आणि गरीब या भेदाने जगात आजपर्यंत जितके अत्याचार केलेले आहेत, तितके महायुद्धांनी राजक्रांत्यांनी किंवा ठगांच्या दरोड्यांनीही केलेले नाहीत. पोटाच्या पापातूनच श्रीमंती जन्माला आली असल्यामुळे माणसांची जनावरे बनविणे आणि पशूपेक्षांही जडमूढांना माणुसकीचा मुलामा चढविणे, या गोष्टी तिच्या सहजलीला होऊन बसल्या आहेत. श्रीमंतीचे आवरण जर खेचून झुगारून दिले तर तिच्या अंतरंगाच्या मसाल्यात सा-या जगाच्या पातकांचा सडका नरक ओतप्रोत भरलेला आढळेल. इतकेच नव्हे, तर शेकडा ९८-९९ श्रीमंत फक्त श्रीमंतीच्या प्रसादानेच माणसांत मोडतात, नाहीतर त्यांना टोणग्या डुकरांपेक्षा अधिक कसलीही किंमत नाही, हेच अखेर प्रत्ययाला येईल. पोटाच्या पापाचे बंड कसे असते याचा देखावा प्रत्येक गिरणी संपाच्या वेळी मुंबईस दिसून येतो.

या देखाव्यात गिरणीवाल्यांच्या हृदयात मुर्दाडपणा आणि कामगारांच्या उपाशी पोटाच्या तीव्र किंकाळ्या ही चित्रे विचारी मनुष्यास अनेक सनातन तत्त्वांचे शिक्षण देणारी आहेत. कारखानदार श्रीमंत हजारो रुपये किमतीच्या मोटारी उडवीत आपल्या धनकनकसंपन्नतेचे प्रदर्शन करीत असतात. परंतु ही मोटारदौड आपण पोटार्थी गोरगरिबांच्या पोटावरच करीत असतो, हे त्यांच्या लक्षात येत नाही. गिरणीवाल्या शेट्यांच्या मोटारी जिवंत माणसांच्या ताज्या तिखट कष्टाळू रक्ताच्या पेट्रोलवर दौडा मारीत असतात. गोरगरीबांच्या अंगातून थबथब निथळणा-या घामाच्या पटाचे वंगण या ऐदी श्रीमंत घेलाशेटांच्या मोटारीत पडत असते. लाखो स्त्रीपुरुष आणि मुले यांच्या शरीराची हाडे न हाडे पिचतात, तेव्हा या नफेबाज धनाड्यांच्या माड्यांची बहाले आणि मोटारीचे सांगाडे सज्ज होतात. गोरगरीब स्त्रीपुरुष मजुरांच्या ऐन उमेदी जीविताच्या राखरांगोळीवर या लाखाधीशांना पुरुषोत्तमत्वाचा अधिकार प्राप्त होतो आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रात यांच्या मोठेपणाच्या टिमक्या वाजतात बोट पैशासाठी पापाचा परवल पत्करते; पण पैसा मात्र असा हरामखोर आहे की तो वाटेल तसल्या पापावर पुण्याचे पांघरूण पांघरतो! आजच्या जगात श्रीमंत व गरीब, मजूर व कारखानदार, ऋणको व धनको आणि गुलाम व धनी हे जे