पोटाचे बंड: Page 2 of 7

या टीचभर पोटाच्या आगीने त्याच्या सर्व शस्त्रास्त्रसंपत्तीची राखरांगोळी करून त्याला गाईपेक्षाही हीनदीन केले. पोटाच्या बंडानेच इंग्लंडात मजूरपक्ष निर्माण झाला आणि चालू घटकेला इंग्लिश साम्राज्याची सर्व सूत्रे या पोटार्थी पार्थिवांच्याच हाती आलेली आहेत. सर्व जगांत पोटाने मारलेले जर कोणते राष्ट्र असेल तर ते हिंदुस्थानच होय. पोटाचे भयंकर बंड अहोरात्र येथे आज कित्येक वर्षे बिनअटकाव व विनाउपाय चालू आहे. राजकीय बंडाच्या उपक्रमाचा नुसता वास येताच त्याच्या पाळ्यामुळ्या उखडताना सुक्या ओल्याचीही जे इंग्रेज सरकार लवमात्र क्षिती बाळगीत नाही, त्याच सरकारला एतद्देशीय पोटाच्या बंडाची दखल करण्याची बुद्धी होत नाही, हे आश्चर्य नव्हे काय? इंग्रेजी पोटानेच इंग्रेजी साम्राज्याचा जगङ्व्याळ वेलविस्तार वाढविला आणि अखेर आज तेच पोट प्रबळ बंडखोर बनून त्याच साम्राज्याचे सूत्रधार बनले आहे. पोट काय करणार नाही – नव्हे, करवणार नाही? पोटानेच हिंदी लोकांना फिजी केन्याचे काळे पाणी दाखविले आणि पोटाच्या बंडामुळेच तेथले गोरे लोक बंडखोर व मस्तवाल बनले. पोटाच्या पोटी पुण्याच्या काय काय खाणी आहेत. त्याचा ठावठिकाणा जरी अद्याप कोणास लागलेला नाही, तरी पोटाची पापे आज सा-या जगभर दिवसाढवळ्या मोकाट वावरत आहेत, यांत मुळीच संशय नाही.

पोटाच्या पापाचे उत्तम प्रदर्शन म्हणजे मुंबई. हिंदुस्थानच्या अवाढव्य पोटाच्या खास तिडका मुंबईस केंद्रित झालेल्या आहेत. भरतखंडाच्या पोटाच्या पापाचे माप मुंबईच्या ताजव्यात खुशाल बिनचूक मोजून घ्यावे. मुंबई आणि पोट या दोन शब्दांची सांगड इतकी निकटची पडलेली आहे की मुंबईकडे धाव घेणारा प्रत्येक माणूस – मग तो महाराष्ट्रीय असो, नाहीतर यंडुगुडू मद्राशी असो – पोटासाठी वाटेल ती खटपट करणाराच असतो. पोट जसे टीचभर पण त्याचा व्याप जगभर, तशी मुंबई टीचभर पण तिच्या पोटाचा आटारेटा जगभर. पोटाच्या पापाने नाडलेला प्रत्येक प्राणी अखेर निर्वाणीला मुंबईची कास झरतो. व्यापार, उद्योगधंदा, शास्त्रे, कलाकौशल्य, विद्या वगैरे सर्वच बाबतीत मुंबईने पहिला नंबर पटकाविलेला पाहून सकृद्दर्शनी तिच्या बाह्य झकाकीने प्रेक्षक थक्क होतो. चोवीस तास अहोरात्र चैतन्यपूर्ण असलल्या या नगरभवानी (Queen of Cities)च्या इंद्रधनुतुल्य सौंदर्याने तो मोहित होतो. परंतु या सर्व बाह्य लखलखाटाच्या मुळात पोटाच्या पापाचे खत पडत आहे, हे मात्र त्याच्या कल्पनाचक्षूला गोचर होत नाही. विद्युत्प्रकाशाचा लखलखाट, खंडोगणती गिरण्यांचा धडधडाट, मोटार, टामरेलीचा खडख़डाट आणि मुंग्यांच्या वारुळालाही लाजविणारा रस्तोरस्ती व गल्लोगल्ली असणारा पोटार्थी पाप्यांचा सुळसुळाट पाहून क्षणभर कौतुक वाटते. पण अरेरे! या सर्व धडपडाटाची लखाकी किती अमानुष तत्त्वावर चाललेली आहे? गिरण्या व तत्सम इतर कारखाने पाहिले की आम्ही औद्योगिक मोक्षाच्या मंदिराकडे झपाट्याने चाललो आहो, असा भास होतो खरा; परंतु या मोक्षसाधनाच्या तपश्चर्येत आम्ही कोणकोणाची कशी आणि किती आहुति देत आहो, याची खुद्द तापस्यांनाच जर कल्पना होत नाही तर इतरांना कशी व्हावी? किती तरण्याबांड जवानांच्या शरीराची माती या गिरण्यांत पडत असते? किती उमद्या, जवान स्त्रियांच्या नीतीचे धिंडवडे रात्रंदिवस उडत असतात? किती महत्त्वाकांक्षी माणसांच्या आयुष्याच्या दो-या या गिरण्यांनी व कारखान्यांनी तोडल्या आहेत? किती लहान लहान बचड्यांना अगदी लहानपणापासूनच ‘तू मजूर आहेस, तुझा जन्म या गिरण्यांसाठी राबण्याकरिताच झालेला आहे’ असे प्रत्यक्ष शिक्षण या औद्योगिक कारखान्यांनी दिले आहे. गिरण्या, कारखाने, फॅक्ट-या वगैरे संस्था ‘पोट भरण्याच्या जागा’ आहेत, या भावनेने आपले घरदार, गणगोत, शेतीवाडी व पुष्कळ प्रसंगी पोटची पोरे टाकून मुंबई व तत्सम गिरणाळू ठिकाणी धावून आलेल्या किती पोटार्थ्यांचे पोट आजपर्यंत कितीशा बुझालेल्या आहेत? उप्पर तो और बनी, अंदरकी बात खुदा जाने! इतर ठिकाणची गोष्ट सोडून द्या, फक्त एकट्या मुंबईतील गिरणी कामगारांचीच स्थिति पहा. त्यांची रहाण्याची ती खुराडी, त्यांची अन्नान्नदशा, त्यांच्या शरीरावरच्या त्या चिंध्या, रात्रंदिवस अक्षरशः काबाडकष्ट करून त्यांच्या चेह-यावर आलेली ती प्रेतकळा, कुटुंबात राहूनही त्या विषयी वृद्धिंगत होणारा निराशाजन्य एक प्रकारचा तिटकारा, जीवित