पोटाचे बंड

 प्रबोधनकार नेहमी प्रबोधनमधील महत्वाचे लेख छोट्या छोट्या पुस्तिकांच्या रुपाने प्रकाशित करत एक-दोन आणा किंमत असलेल्या या पुस्तिकांनी प्रबोधनकारांचे विचार घरोघर पोचवले. त्यापैकीच माणसातील सुरवंट आणि पोटाचे बंड या दोन लेखांची ही पुस्तिका.

 [प्रबोधन वर्ष ३रे अंक ९वा ता. १६-२-२४]

सृष्टीचा हा कल्पनारम्य परंतु कल्पनातीत प्रचंड पसारा, त्या पसा-याचा पिसारा नाना रंगांत रंगवून पारमेश्वरी इच्छेचे गूढ उकलण्यासाठी किंवा उखडण्यासाठी मानवांच्या अहर्निश चाललेल्या धडपडी आणि त्या धडपडींच्या धकधकीच्या मामल्यात सत्ता-प्रस्थापनार्थ चाललेल्या परस्पर चुरशीचे सामने, हा सर्व देखावा शांत चित्राने व किंचित् चिकित्सक दृष्टीने निरीक्षण करणाराला अखेर हेच दिसून येते की या सर्व जगङ्व्याळ खटाटोपाच्या चैतन्यशक्तीचा मूळ उगम, पृथ्वीच्या गोलाला हादरून सोडणा-या या पॉवरचा डायनामो, जर कोठे असेल तर माणसाच्या पोटात. जगाचा एकूण एक व्यवहार या पोटासाठी. क्रांतीची भस्मासुरी भूक आणि शांतीची तृष्णा पोटालाच प्रथम लागते. इतिहासाची पृष्ठे मानवी रक्ताच्या लालभडक रंगाने रंगविणारी युद्धे व महायुद्धे आजपर्यंत या पोटानेच घडवून आणली. राजकीय वर्चस्वाची भावना. जित आणि जेते, कारखानदार आणि कामगार किंवा मालक आणि नोकर हे भेद पोटाच्या पोटीच जन्मलेले आहेत. सावाचा चोर पोट करते. सज्जनाचा दुर्जन पोट बनविते. मित्रालाच शत्रू पोट ठरविते आणि शत्रूलाही मित्र बनविण्याच्या कामी पोटाच्या तिडकांची वकिली किंवा याचनाच कारणीभूत होते. आजूबाजूच्या परिस्थितीचा जोर असताना ज्या रणधुरंधर नरवीरांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना केवळ आपल्या नामोच्चाराच्या दरा-यात ठेवले, त्याच मर्दांवर विपरुत काळाची झाप पडताच, केवळ पोटासाठी त्याच प्रतिस्पर्ध्यांपुढे दीन गाईप्रमाणे अधोवदन उभे राहण्याचे आलेले प्रसंग इतिहासात शेकडो आढळण्यात येतात.

मानी मनुष्याच्या मानाची मान कापण्याचा कुपराक्रम आजपर्यंत पोटानेच विशेषतः गाजविलेला आहे. असे हे पोटाचे वर्णनीय लफडे म्हणजे सृष्टीविधात्याने जगाच्या हालचालीत ठोकलेली ‘गेनबाची मेखच’ म्हटले तरी चालेल. एक पोट नसते, तर या जगाला मसणवटीचे रूप आले असते मसणवटीत भुते तरी वावरतात व तीही म्हणे पोटासाठीच! तेव्हा मसणवटीची उपमाही शोभणार नाही. पोट नसते तर जगच जगले नसते, किंबहुना ते अस्तित्वातच आले नसते आणि ‘अन्नासाठी दाही दिशा । आम्हां फिरविशी जगदीशा’ ही दीनवाणी किंकाळी फोडण्याचा प्रसंग व्यंकटेशस्तोत्राच्या देवीदासावर आलाच नसता! सगळी बंडे पत्करली पण हे पोटाचे बंड पत्करत नाही. राजकारणी क्रांत्यांची बंडे आपल्याला मोठा भयंकर वाटतात. क्रांतिचक्राचा थयथयाट सुरू झाला की यात पडणा-या माणसांच्या आहुती पाहून किंवा ऐकून आले मन चर्र होते. परंतु त्या बंडांना किंवा मानवांच्या कत्तलींना मूळ कारण आपले पोटच आहे, अर्थात् ते किती भयंकर असले पाहिजे, याचा मात्र सहसा कोणी विचार करीत नाही. याला कारण पोटाचा आपलेपणा किंवा आप्पलपोटेपणा. ‘चमडीके झोपडीमे आग लगी, बुझानेवाला कौन है?’ असा सवाल टाकीत दारोदार फिरणा-या फकिराची कीव येऊन आपण त्याला मूठभर अन्नाचा गोळा देऊन त्याची बोळवण करतो आणि त्या पुण्याची नोंद चित्रगुप्ताने आपल्या पापपुण्याच्या खतावणीवर जमेच्या बाजूला चटकन केली या समजुतीने संतुष्टचित्त स्वस्थ बनतो. परंतु एवढ्याने ‘बुढानेवाला कौन है’ या फकिराच्या सवालाचे अखेर उत्तर फकिरालाही मिळत नाही व अन्नदाताही ते देऊ शकत नाही. ते कोणीही आजपर्यंत देऊ शकला नाही. कारण टीचभर दिसणा-या परंतु विश्वाला गिळून उरणा-या चमडीच्या झोपडीची आग कधी विझणेच शक्य नाही. ही आग म्हणजे जगाच्या सर्व चैतन्याची माता. ती विझविली किंवा विझाली की जगानेच राम म्हटला पाहिजे.

जगाचे अस्तित्वच ज्या पोटावर टिकले आहे, त्याचे महत्त्व वर्णन करताना शेषाचीही जीभ सुकून त्याच्या पोटात तिडकांचे बंड सुरू व्हायचे, त्यापुढे या पामर प्रबोधनकाराची मानवी लेखणी काय होय? पोटाचे बंड आज सा-या जगावर धुमाकूळ घालीत आहे. रशियातली राजक्रांती पोटानेच केली आणि झारला सहकुटुंब कुत्र्याच्या मौताने मारलो तोही या पोटानेच. जर्मनीसारखे बलाढ्य राष्ट्र, पण