पावनखिंडीचा पोवाडा: Page 3 of 5

म्हणतां नाक मुरडतो? हा नच तो बाजी॥ ज्या नामदें राज्य गमवलें ठरवि तुम्हां पाजी ॥५॥

शिवरायाचा केवळ आत्मा सागर शौर्याचा॥ प्रभूवीर तो बाजी झाला विषय पोवाडयाचा॥६॥

चार मासपर्यंत झुलविली मुसल्मान सेना॥ फाजल शिद्धी खुद्ध डुलविती आश्रयें माना॥७॥

ज्या कायस्थें रक्त ओतिलें शिवप्रभुच्या कार्या॥ अग्रगण्य हा बाजी त्यांतिल पूज्य सर्व आर्यां॥८॥

॥चाल॥जोहर चढवि मग हल्ला॥जोह०॥ अति निकाराचा॥ प्राणान्तीचा॥ रोखिली तोफ ती बुरुजा ॥करि फक्त मुख्य दरवाजा॥

‘जय’ म्हणति म-हाठे ‘तुळजा’॥‘देशाचि राख तूं लज्जा’ हां हां म्हणतां करील सर तो फाजल किल्ल्यासी॥उदो०॥

----------------------------------------------

- ६ - दाणा दारू सर्व संपली उरलि मात्र चिंता॥ प्रसंग आला बिकट सुचे ना अक्कल श्रीमंता॥१॥

शिवाजी बाजी कृष्ण पार्थ जणु करिती एकांता॥ टाळ्या मारित ‘ठरले’ म्हणती टळवूं आकांता॥२॥

शह उठवा मग तह करण्याला शिवराजा राजी॥ कळवी ताजी खबर शिध्दिला परस्परां बाजी॥३॥

तहनाम्याचें वृत्त ऐकतां फाजलखां रमले॥ कारण होते सैनिक त्याचे अतिशय दमलेले॥४॥

"अच्छा अच्छा बहोत खाशी तहनामा करना" सैनिक म्हणती जल्द करो अभि क्यौं नाहक मरना॥५॥

कंडि पसरतां थंडी पडली मुस्लमान सेना॥ खाना पीना चम्मच रंडी दारू नाच गाना ॥६॥

घोडयावरचे जीन उतरले तोफाही निजल्या॥ मेजवानीच्या हंडया सगळ्या छावणींत शिजल्या॥७॥

जिकडे तिकडे रंगराग कुणी गाती कुणी खाती॥ आतां ऐका काय म-हाठे किल्ल्यावर करिती॥८॥

॥चाल॥ पाहुनी ढिलाई रिपुची॥ पा०॥ फाजलखांची ॥ जोहराची ॥ छातिचा कोट मग केला॥

शिवप्रभु पुढारी झाला॥ सोडिला पन्हाळा किल्ला ॥तुडवीत मोंगलां गेला॥ निशेमधें जे पिसे शिपाई कोण पुसे त्यासी॥ उदो०॥

----------------------------------------------

- ६ - अरी करीं तो दउनी निसटुनिया गेला॥ अशी वंदता कळतां फाजल वदे "सुभानल्ला!"॥१॥

"भागो भागो दवडो दवडो" एक शध्द उठला॥ झोंप साखरी लागे कोणा कोणि बरळत सुटला॥२॥

डंका झडला ‘हुशार रहना कुच करना जल्दी’॥ परंतु मानी कोण अवेळीं चढाइची वर्दी॥३॥

घोडयावरचे जीन चढविलें बैलाच्या पाठी॥ हत्तीवर कंठाळि ओढि तो उंट तोफ मोठी॥४॥

राकट कडवे परंतु रडवे राउत ते सजले॥ शिगं फुंकतां अति त्वरेनें शिवमार्ग गेले॥५॥

वायूवेगां सारूनि मागें मागेल चमु धावे॥ खरोखरी त्या तीव्र गतीला कवीनिंही गावें॥६॥

भल्या पहाटे सैन्य म-हाठी गांठियले त्यांनीं॥ नंतर कुत्तरतोड लढाई करिति दळें दोनी॥७॥

मरे परी तिळ हटे न ऐशा चिकट म-हाठयांशी॥ मुसल्मान अति प्रेमें लढती करूनि शिकस्तीशी॥८॥

॥ चाल ॥ मावळे लोक बहु थोडे ॥ मावळे०॥ जिवाचे धडे करिती सौगडे॥ परि शत्रुसैन्य जोराचें ।करि हल्ले अति निकराचें॥

जणुं तुफांन वावटळीचे ॥ढांसळवि गिरी आशेचे ॥ प्रळ्यकाळ हा गिळतो वाटे जणुं महाराष्ट्राशी ॥उदो०॥

----------------------------------------------

— ८— झडकरि आपण महाराज ! या खिंडीतूनि जावे ॥ अपार शत्रूसेना ग्रासिल क्षण न य़ेथ रहावें ॥ १ ॥

मी धरतो हे नाक दाबुनि पावनखिंडिचें ॥ तोंवर जावें खुशाल घेउनि सैन्य मावळ्यांचे ॥ २ ॥

ठेवा निवडक कांहि मावळे माझ्य़ा पाठीशीं ॥ उभा रहातों असा इथे मी ठोंकूनी छातीशी ॥३॥

सुखरुप जोवरि असे शिवाजी तोंवरिं काळाला ॥ भीक न घालूं लाख रिपूंना दवडूं पातळा ॥४ ॥

असे निक्षुनी बोले बाजीप्रभु गहिवरला ॥ महिवर हा जणु भक्त मारुती संकटी अवतरला ॥५ ॥

आलिंगुनि बाजीस चालला शिव ढाळित असवें ॥ मनी म्हणे ती धन्य़ जननि ते धन्य़ तिचे कुसवें ॥६ ॥

कसा एकटा प्रभूवीर हा दई तोड अरिला ॥ म्हणूनि शंकूनी वरचेवर शिव फिरवी मानेला॥७ ॥

तलवारीनें ‘जा जा ’बाजी खुणवी फिरवि पट्टा ॥ राहिं न क्षण शिर नीट धडावर ज्य़ांस बसे रट्टा ॥८ ॥

॥चाल॥ विसरलो गोष्ट मुद्दय़ाची ॥विस० ॥ शिवरायाची ॥ प्रभू बाजीची ॥ बाजीस धरी शिव पोटीं.॥

हृदयांस आणिलें ओठी॥ भडभडून आलें पोटीं