ऊठ म-हाठ्या ऊठ: Page 10 of 31

उच्च पदव्यांलकृत असलेल्या ज्या काही मराठी बांधवांना अलिकडे आपण स्वयंभू सुसंस्कृत असल्याचा गर्व झाल्यासारखा दिसतो, त्यांनी ३०-४० वर्षांपूर्वी आपण कोठे कोणत्या अवस्थेत होतो, याची किंचित तरी प्रामाणिक जाणीव नि आठवण ठेवली, तरी त्याच्या गर्वाचे ठाण अस्थानी असल्याचा साक्षात्कार त्यांना होईलसे वाटते. राजकारणी पक्ष आणि ट्रेड युनियनने म्हणजे म्होरक्याच्या कामधेनू गंगाजळी बनल्या आहेत. कित्येकांच्या लाखो रुपयांच्या स्थावर मिळकती ठिकठिकाणी झाल्या आहेत. कित्येकांनी हजारो रुपये पागड्या भरून स्वतःच्या निवासासाठी आलिशान फ्लॅट मिळविलेले आहेत. कित्येकांच्या मोठमोठ्या व्यापाराक गुप्त भागीदा-या आहेत. युनियनच्या वर्गणीची लाखो रुपयाची लक्ष्मी दरमहा हातात चलनी खेळत असते ती निराळीच, श्रमजीवी जनतेकडून हुकमे हुकूम गोळा केलेल्या पैशावर गबर झालेला हा नवीन लाखाधिशांचा वर्ग निर्माण झालेला आहे. राजकारणी पक्ष आणि ट्रेड युनियन्स ही अचाट बुद्धी चालवून अफाट लक्ष्मी मिळविण्याचा सोस असणा-या हिकमती खटपट्यांचा राजरोस व्यापार होऊन बसला आहे. यात जनतोद्धार नाही, राष्ट्रोद्धार नाही, आहे तो फक्त पक्षनेत्याचा आणि युनियने चालविणा-याचा आत्मोद्धार! पक्षीय आणि युनियनी वर्तुळ्याच्या कक्षेत अडकलेल्या पाठचाल्यांच्या नि पायचाट्यांच्या लक्षात या व्यापाराचे एटक फारसे येत नाही, असे नाही. पण ते तरी काय करणार? अटकली गाय, फटके खाय, वरिष्ठ नेत्यांच्या उबा-याच्या वरच्या थरात असलेल्या गणंगांना पोसून गोंजारून गुबगुबीत राखले, म्हणजे शेंड्यावरच्या गणंगेश्वरांना अंतररंगाचा बाहेरच्या जागाला फारसा थांगपत्ता लागत नाही.

महिन्याच्या महिन्याला युनियनच्या वर्गण्या बिनतक्रार भराव्या, खुद्दांचा हुकून सुटेल तेव्हा संप मोर्चे काढावे, दंगली कराव्या, आगी लावाव्या, लाठीमार खावा, तुरुंगात जावे, या पलिकडे हे असे का नि ते तसे का? असले सवालटाकण्याची पाठचाल्या अनुयायांना शहामतच नसते. मार पडतो, गोळीबार होतो, तो सा-या पाठचाल्यांवर, गोळी लागून ठार झालेला आणि लाठीमारात जखमी नि निकामी झालेला पक्षनेता अथवा युनियननेता आजवर कोणी एखादा पाहिला आहे काय? परवा ऑल इंडिया काँग्रेसचे अधिवेशन माटुंग्याला भरले होते. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण आणि संपूर्ण महाराष्ट्र समित्यांच्या वतीने सडक धडक मोर्चे काढण्यात आले. काही नेत्यांची धक्काबुक्की झाली, बरेचसे पाठचाले पोलिसी लाठीखाली जाम चेचले गेले आणि कित्येक पोलिसी लॉकअपमध्ये अटकले. त्यांना सोडवायला एकही पक्ष किंवा युनियन नेता धावला नाही. सारांश, गोळी लाठीला जनता आणि पोळीला नि हारतु-याला पुढारी महाशय, असले देखावे अलिकडील अनेक आंदोलनांत लोकांनी पाहिलेले आहेत. तरीही त्यांच्या भजनी लागलेल्या लोकांना हे संत महंत कसल्या मसाल्याच्या मनोवृत्तीचे आहेत, याचा शोध नि बोध घेण्याइतका विचाराचा मगदुरही उरलेला नाही. स्वाभिमानाला मुकलेल्यांची मने अशीच गुलाम नि परस्वाधीन बनतात. 000 आम्हीच आमचे मित्र नि शत्रू इंग्लंडादि देशात सामान्यतः फक्त राज्यकर्ता आणि विरोधी असे दोनच पक्ष असतात. आमच्याकडे मात्र पायलीचे पन्नास पक्ष बोकाळलेले.

प्रजोत्पादनापेक्षा पक्षोत्पादनाचा जोर मोठा. त्यातही पुन्हा केव्हा कोणता पक्ष आपला मुखवटा बदलील, शेजारच्या एखाद्या पक्षाच्या पोटात जाईल आणि काही काळाने पुन्हा नव्याच नावाने संसार मांडील, याचा नाही. प्रत्येक पक्ष आणि ट्रेड युनियन कपाळावर अखिल भारतीयत्वाचा मळवट फासूनच जन्माला येतो. या `अखिल भारतीय’ बाशिंगाचा सध्या इतका विचका उडालेला आहे का सांगता पुरवत नाही. राहत्या गल्लीच्या बाहेरही ज्यांना कोणी ओळखत नाही, पोस्टमनलाही ज्यांचा ठिकाणा लागत नाही, अशा अनेक संस्था `अखिल भारतीय’ बाशिंगे चढवायला विसरत नाही, आसेतु हिमाचल भारताचा राजकारणी मोक्ष सिद्ध करणारा आमचाचा काय तो एकमेव पक्ष, राष्ट्रवाद फक्त आम्हीच गावा नि तुम्ही ऐकावा, राजकारण काय ते आम्हासीच ठावे, इतरांनी ते आमच्याकडून शिकावे आणि सावलीसारखे आमच्या मागे चालावे, हा प्रत्येक पक्षाचा दावा, चातुर्मासी टाकळ्याप्रमाणे सर्वत्र बोकाळलेल्या पक्षांच्या राजकारणी धामुधुमीमुळे, समाजाच्या सामाजिक उत्थानाचा किंवा संघटनाचा विचारच हद्दपार झाला आहे आणि त्याची कारणेही फार जुनाट मूळ धरून बसलेली आहेत. देशाचे पारतंत्र्य निपटून काढण्यासाठी गेल्या शतकाच्या उत्तरार्धात लो. टिळक प्रभृति जी मंडळी