ऊठ म-हाठ्या ऊठ: Page 9 of 31

पुंड खादीधारी बनले. नाक्यावरच्या गणेस टेबलरपासून तो थेट सचिवालयातील मंत्री महाशयापर्यंत त्यांच्या वगवशिल्याची साखळी बेमालूम तयार झाली. टाळक्यावर गांधी टोपी चढली रे चढली, का हवा तो गेन्या गंप्या मंत्र्याच्या दिमाखात जिल्ह्याच्या कलेक्टरलाही दमदाटीचा अक्कलकाढा पाजू शकतो. तशात सचिवालयात ठाण मांडून कोंदाटलेली स्वराज्याची महासागरी गंगा आखडत आखडत छोटेखानी झ-यासारखी ग्रामपंचायत, तालुका नि जिल्हा परिषदेच्या चिंचोळ्या खबदाडात अलिकडे घुसल्यामुळे, गावोगावचे गुंडेपुंडे त्याच गावातले देशपांडे म्हणून राज्यकारभारत और दिमाखाने मिरवू लागले. शिवाय, भल्याबु-या पूर्वाश्रमात जिचे दर्शनही चुकून कधी झाले नाही, ती महामाया लक्ष्मीच हातात खेळू लागल्यामुळे शेकडो वगळ्यांच्या बापजाद्यांच्या काळच्या केंबळी झोपड्यांच्या जागी टोलेजंग इमले उभे राहिल्याची किमया घडू लागली आहे. एरव्हीच्या साध्या सरळ व्यवहारातल्या संभाव्य आतबट्ट्याचा बट्टा आता त्यांच्यापासून फार दूर पळालेला आढळतो. प्रकृतीतही भलताच बदल होतो. पचनशक्ती अजीर्णप्रुफ बनते, कितीही पैका खाल्ला तरी त्यांना साधा ढेकरही चुकून यायचा नाही आणि आजूबाजूच्या इतरेजनांनी मुद्या पुराव्यानिशी तो ओकविण्याचा कधी उपद्व्याप केलाच, तर सफेद टोपीच्या वगवशिल्याची लागण संत्र्यापासून मंत्र्यापर्यंत जुळलेली खिळलेली असल्यामुळे, बदनामीचा बिब्बा अखेर तक्रारखोरांच्या अंगावर ठसठशीत फुलतो. लोकहितवादाचा मुखवटा चढविलेल्या काँग्रेस कम्युनिष्टादि सर्व पक्षांनी आपापल्या प्रांगणात नानारंगी डाळ दाण्यांची मुबलक पखरण करून ठेवल्यामुळे, शेकडो, हजारो कबुतरे, पारवे, चिमण्या तेथे आकर्षिल्या जातात.

सध्याच्या बेकारीच्या नि दुष्काळाच्या जमान्यात पारवे कबुतरांच्या बरोबरच अनेक वावदूक पोपटही सामील होतात. पक्षांना पोपटाची फार जरूर असते. पक्षांच्या नि पक्षनेत्यांच्या माहात्म्यांची पोपटपंची करायला कबुतर पारव्यांपेक्षा पोपट फार पटाईत. पारवे कबुतरे फक्त घुमाणा घालतात. चिमण्या चिवचिवाट करतात म्हणून पक्षीय म्होरक्यांचा ओढा पोपटांकडे विशेष. तशात एखादा पोपट `पत्रकार’ असला, तर त्याला पिंज-यात न ठेवता त्याच पंख कातरून मनगटावर खेळत ठेवण्याची ते विशेष खटपट करतात. अपक्ष स्वतंत्र बाण्याचा कितीही बहाणा करणारा पत्रकार-पोपट असो, त्याला पूर्व जर्मनीतली गोडगोड फळे चारून `भजनी’ लावून ठेवण्याची युगत कम्युनिस्ट पक्षनेत्यांना उत्तम साधलेली आहे. `मी अपक्ष, मी स्वतंत्र’ म्हणून तो बाट्या पत्रकार नाकाने कितीही कांदे सोलीत असला, तरी जनतेच्या मनाच्या लाजेकाजेसाठी-कम्युनिस्टांच्या चुलीवर त्याच्याच तांदळाचा भात गुपचूप शिजवून, शेजारी स्वतःच्या माजघरात बसून बकाणतो. आपण त्या गावचेच नव्हत, हा त्याचा बहाणा पाहणारांना दिसत नाही, असे थोडेच आहे? पण भ्रष्टाचाराच्या सध्याच्या जमान्यात सब घोडे बारा टक्के भावानेच विकले जातात. सकाळ गेली, संध्याकाळची वाट काय, अशा अवस्थेतील गोरगरीब श्रमजीवी जनतेच्या उद्धाराच्या प्रतिज्ञा-कंकणे चढविलेले कम्युनिस्ट पुढारी वर्षातून आठ दहा वेळा विमानाने भुरकन रशियादि युरोपीय अनेक देशांत जातात येतात कसे? एवढा पैसा त्यांना कुठून नि मिळतो कसा? हे एक आजवर कोणाला न सुटलेले कोडेच आहे. बामणेतरी आंदोलनाच्या जमान्यात मीही मंबई ते नागपूर आणि हुबळी गोव्यापर्यंत व्याख्यानांचे दौरे काढलेले आहेत. शहरे, तालुके, पेटे आणि खेडी मी फिरलेलो आहे. पण प्रत्येकवेळी दामाजीपंताचा प्रश्न समोर उभा ठाकायचा. ज्या ठिकाणचे आमंत्रण यायचे, तेथील मंडळींना मी स्पष्ट सांगायचा की `बाबांनो, जाण्या-येण्याचा खर्च तुम्हाला करावा लागेल.

जेवणासाठी साधी खेडुती झुणकाभाकर असली तरी चालेल पण खर्चाची वाहनांची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल.’ समाज जाजगृतीसाठी घराबाहेर पडायचे ते कफल्लक अवस्थेत आणि परतायचे तेही त्याच अवस्थेच्या थाटात. महाराष्ट्रातले एकूणेक जिल्हे मी पायदळी घातले. लहानसान खेडीही सुटली नाही. लोकांनी प्रत्येक मुक्कामापुरती वाहनांची नि प्रवासखर्चाची बाजू उचलायची नि मी व्याख्याने झोडायची अशी आयुष्यातली किमान वीस वर्षे तरी खर्ची पडलेली आहेत. कोणी मला देणग्या दिल्या नाहीत मी घेतल्याही नाहीत. मागास बहुजन समाजात शिक्षण-प्रचार नि अस्पृश्यता-विध्वंस या दोनच मुद्यांवर माझ्या प्रचाराचा कटाक्ष असे आणि चालू घडीची मराठी मंत्रिमंडळे आमदारक्या खासदारक्यातील त्या समाजातील व्यक्तिंचा पुढारपणा पाहिला, म्हणजे माझी निरिच्छ, निर्लोभ मागास जनसेवा पुष्कळच फलद्रुप झाली, असे समाधान न मानण्याइतका पुरावा खास आढळतो.