ऊठ म-हाठ्या ऊठ: Page 8 of 31

होते, बाकीचे ३६जण बेपत्ता झाले (हवेत विरले!) ९ जण सरकारी हुकुमान्वये गोळ्या घालून ठार मारण्यात आले. आज एकदा डोव्हिस्की फोव्हिस्की सोवियत लोकवटीचा कर्तुमर्तुमन्यथा कर्तुम दण्डधा-याच्या अधिकारात नि दिमाखात मिरवताना दिसावा, तर उद्या त्याला हरामखोर ठरवून गोळीबाराने खतम करण्यात यावा, असे प्रकार तिकडे रगड झाले. हरमाखोर श्रेष्ठाच्या पाठोपाठ त्यांच्या अनुयायांच्याही शेकड्यांनी कत्तली व्हायच्या हे ठरलेलेच. सोवियत रशियात स्वतंत्र विचारांना बिलकूल मुभा नाही. लेखकाने किंवा एखाद्या कवीने सोवियती सत्तागुंडांच्या धोरणाविरुद्ध पुसटसा जरी उल्लेख केल्याचे दिसले किंवा कोणी कानफाट्याने कळविले, का भरलीच त्याची पनोती. असे काही स्पष्टवक्ते लेखक-कवी जिवाच्या भयाने रशिया सोडून परागंदा झाल्याच्या हकिकती पुष्कळांनी एकल्या, वाचल्या असतील. जेथील स्वदेशाभिमानी नि स्वातंत्र्यप्रेमी लक्षावधी जनतेला एक तर सायबेरियासारख्या दूर उजाड प्रदेशातल्या गुलामखान्यात डांबले नाही, किंवा त्यांची सर्रास कत्तल केली नाही, असा सोवियतांचा भक्ष्यस्थानी पडलेला एकही देश दाखविता येणार नाही. सोवियती कबजातील पूर्व जर्मनीच्या बर्लिन वॉलची कहाणी आजही जो जो तिथे जातो न पाहतो त्याच्या डोळ्यात अश्रूंचा धबधबा फोडते. जगात पुष्कळ राज्यक्रांत्या झाल्या नि नवीन राजवटी निर्माण झाल्या, पण सोवियतसारखी मानवी रक्तप्राशनाला सोकावलेली राजवट म्हणा लोकवट म्हणा फक्त एकमेव तीच.

लोकवटीपेक्षा त्या अवस्थेला झोण्डवट म्हणणेच यथार्थ ठरेल. भारतातले कम्युनिस्ट चळवळे तीच रक्तपाती आक्रस्ताळी परंपरा येथे भक्कम रुजविण्याच्या खटाटोपात अखंड गढलेले असतात. कोणाला केव्हा ते `शत्रू नंबर एक’ ठरवतील नि त्याच्या नरडीचा घोट घेतील, त्याचा नेम नाही. आज नुसते ते वाचिक लिखित शब्दांनी हे करीत असतात, कारण अजून त्यांच्या हाती भारताची सत्ता आलेली नाही. पण भारताच्या नि भारतीयांच्या कठोर दुर्दैवाने चुकून आलीच, तर आसेतुहिमाचल रक्तपाती खाटिकखाना केल्याशिवाय राहणार नाहीत. उजवे कम्युनिस्ट रशियावादी नि डावे चीनवादी, हा सारा भारतीयांच्या भुलभुलावणीचा फसवा देखावा आहे. अंतर्यामी दोघेही एकजिनशी एकवटलेलेच आहेत. आज त्यांचे पाय भारतभूमीवर असले, तरी डोकी मात्र रशिया-चीनच्या सत्तेच्या पेढीवर गहाण पडलेली आहेत. आग्यावेताळ कम्युनिस्टांच्या येथील उत्पत्तीपासून इतर राजकारणी पक्ष एकमेकांकडे कट्टर शत्रूत्वाच्या तिरक्या ताठर नजरेने पाहू लागले. राजकारणी पक्षातील या वैमनस्यामुळे, महाराष्ट्रातील माणसा-माणसातील आपुलकी नष्ट झाली; कुटुंबव्यवस्था रसातळाला गेली; व्यक्तिमात्राच्या स्वाभिमानाला तडे गेले; कोणताही गुंता सामोपचाराने सोडविण्याची भावनाच मावळली आणि `ऊठ सोट्या तुझे राज्य’ असली बेगुमान बेदरकारी बोकाळली. म्हणजे शिवपूर्वकालापेक्षा म-हाठी जनतेची वैयक्तिक, सासांरिक, सामाजिक, धार्मिक अवस्था आज विलक्षण कोडेबाज घोटाळ्याची होऊन बसली आहे.

सगळयांनी आपापल्या स्वाभिमानाच्या माना निरनिराळ्या पक्षनेत्यांच्या मुठीत आपणहून दिलेल्या आहेत; आणि त्यांच्यापासून शिकले काय? तर आचारविचारांची बेगुमान बेदरकारी, आक्रस्ताळीपणा आणि दण्डुकेबाजी! संस्थेच्या भरमसाट फुगवणीमुळे नाळगुदासारखा सुजलेला आणि गेली १८-१९ वर्षे जुम्या संस्थानिकांच्या वारसदारी थाटाने सत्ताधारी बनलेल्या काँग्रेस पक्षाच्या राजकारणी आबादाबाचा महिमा सध्या `उपरसे और बनी, अंदरकी बात खुदा जाने’ अशा अवस्थेत आहे. स्वराज्य मिळाल्यावर काँग्रेसपक्षाच्या मठाला टाळे लावा, असा म. गांधींनी स्पष्ट इशारा दिलेला होता. स्वातंत्र्याच्या आंदोलन काळातच खरे म्हटले तर काँग्रेसची खरी कामगिरी झाली. कारण, तेव्हा म. गांधी आंदोलनाच्या झेंड्यावर उभे होते. त्या काळी कम्युनिस्टादी सगळे पक्ष काँग्रेसच्या वळचणीने बोलत चालत होते. आज डावे-उजवे म्हणविणारे बहुतेक कम्युनिस्ट पुढारी खांद्यावर खादीची गाठोडी घेऊन खादी विकायाल फेरीवाल्यांसारखे घरोघर दारोदार भटकत होते. प्रजा समाजवादीही तेच करीत होते. पण ब्रिटिशांनी स्वराज्याची झोळी दाखविताच ती आपल्या खादी टोपीत ओतून घ्यायला काँग्रेसवाले पुढेच असल्यामुळे, साहजिकच ते दान त्यांच्या हातात पडले. काँग्रेसमध्ये घुसायला घुश्यांच्या लायकी नालायकीचा विशेष मुद्दा कसलाच नव्हता आणि आजही नाही. पावलीला पट्टी न्यायाने एक पावली भिरकावली, नखशिखांत पांढरीफेक खाकी पांघरली का बन गया काँग्रेजी आदमी. अचाट बुद्धी चालवून बळेच लक्ष्मी मिळविण्याच्या सुप्तगुप्त फंदाने फुरफुरलेल्या शेकडो अलबत्या गलबत्यानी काँग्रेसच्या सताड उघड्या कर्मशाळेचा आसरा घेतला.

गावोगावचे संभावित गुंड नि