ऊठ म-हाठ्या ऊठ: Page 5 of 31

बौद्धिकांनी केलेला असतो. निरनिराळ्या राजकारणी मोक्षांची दुकाने थोटून बसलेले सारेच पक्ष जर भारताच्या उत्कर्षासाठी मरेस्तोवर जगण्याच्या प्रतिज्ञेने वावरताहेत, तर त्यांच्यात सदैव मतभेदांचे वणवे का पेटलेले असतात? कम्युनिस्टांच्या डाव्या उजव्यात आडवा विस्तव जात नाही. सोशालिस्टातही हीच त-हा. राष्ट्रीय स्वयंसवेक संघ आणि जनसंघ, खरे पाहता, एकाच नाण्याच्या दोन बाजू – पण त्यांच्यातही मतभेदाची `बर्लिन वॉल’ हे म्हणे. कदाचित हा देखावा राजकारणी डावपेचातही असण्याचा संभव फार. डावे कम्युनिस्ट चीनवादी, उजवे सोवियतवादी आणि हे दोघे पक्ष इतर पक्षांना अमेरिकावादी म्हणून खिजवतात. डाव्या कम्युनिस्टांनी चीनचे आक्रमण हे `आक्रमण नसून ते भारताच्या उद्धारासाठी आलेले मोक्षदायी अगमन’ होते, असा टाहो फोडला.

या ठिकाणी श्री. कण्टकार्जुनाच्या विद्वद्मान्य `कण्टकांजलि’मधील एक कथा सांगण्यासारखी आहे. तिचा मराठी अनुवाद असा – पारवे आणि ससाणे खुराडे उघडे होते. मालक कुठे तरी दूर होता. खुषीत येऊन पारवे घुमत होते. तेवढ्यात ससाण्याने झेप टाकून त्यांच्यातल्या काहींचा फराळादाखल फन्ना केला. वाचलेल्यांना तो आदबीने लवून म्हणाला - `जिवलगानो, येतो मी. सुखी असा. तुमच्या हद्दीत मी जे हे पाऊल टाकले, ते केवळ प्रेमाने, हे जाणून क्षमा करा.’ चीनी आक्रमणाबद्दल उजव्यांनी विरोध केला. त्यांचे म्हणणे, भारताचा मोक्ष सोविएतांच्या खिशात. कोण जाणे, कोण कुणाच्या खिशात बसला आहे, का घशात उतरला वा उतरत आहे. एवढं मात्र खरे की अचाट, अफाट नि अलोट कर्जबाजारीपणामुळे, आमच्या श्वेतांबरी नि सत्ताधारी काँग्रेजी भोप्यांनी कोणकोणत्या धनकनकसंपन्न परराष्ट्रांच्या घशात भारत कोंबण्याचा मनसुबा रचला आहे, याचा अंदाज घ्यायला मोठमोठ्या मगजबाज गणित्यांनी हात टेकले, तेथे आजच कशाला हा खिशा-घशाचा वाद? गेली १८-१९ वर्षे मध्यवर्ती काँग्रेजी सत्ताधा-यांच्या फंडातून राष्ट्रवादाचे फतव्यावर फतवे निघत आहेत.

कम्युनिस्ट कंपू तर थेट विश्वबंधुत्वाच्या चंद्रलोकावर केव्हाच ठाण मांडून बसलेला. राष्ट्रवादाने आणि विश्ववादाने अमर्याद बेफाम नि बेभान होऊन आम्ही हिंदू-मुस्लिम भाई भाई, हिंदी चिनी भाई भाई, अशा कंठशोषी आरोळ्यांची कसली रक्तबंबाळ फलश्रुती पदरात पडली, याची आठवण बुझून नष्ट व्हायला निदान चालू शतक तरी पुरे व्हायला पाहिजे. ज्यांचा आम्ही शुद्ध अजागळपणे `भाई भाई’ म्हणून उदो उदो केला, ते इस्लामी पाकिस्तान आणि चीन आज एकजिव्ह होऊन भारताची खांडोळी करायला रात्रंदिवस दिसेल सुचेल त्या संधीची अखंड वाट पाहात उभे आहेत. तरीही `ते आमचे शब्द आहेत’ हे उघडपणाने जाहीर करण्याची सत्ताधारी दिल्लीकर काँग्रेजियाला हिंमत होत नाही. राष्ट्रवादाच्या नि विश्वबंधुत्वाच्या कल्पना करणारे मतलबी शहाणे तरी कितीसे बोलल्याप्रमाणे चालतात? कोणीही नाही. ही सारी बोलघेवडी पुराणे श्रद्धावान भोळसट अडाण्यांसाठी असतात. जो तो आपापल्या स्वतःपुरताच पाहणारा आणि वागणारा स्वार्थी असतो. याला अजागळ अपवाद नि तो मराठ्यांच्या महाराष्ट्र राज्याचा! इतर सर्व राज्यांनी आपापले कान स्वाभिमानाच्या टापशीने स्वतःच्या मुंडक्यांवर जपून ठेवलेले आहेत. फक्त महाराष्ट्र राज्याने स्वतःचे कान दिल्लीच्या चिमटीत ठेवलेले आहेत.

कोणतीही स्वराज्यवादी पावले टाकताना म-हाठी राज्याचे म-हाठी कारभारी `दिल्ली काय म्हणेल?’ या चिंतेने व्यग्र असलेले दिसतात. मध्यंतरी `भारताची राष्ट्रभाषा हिंदी’ची दिल्लीकरांची फर्माने सर्वत्र जाहीर होताच, मद्रास राज्यातल्या मद्राश्यांनी हिंदीविरुद्ध आग्यावेताळी आंदोलन चालू केले. तात्काळ, केंद्रातल्या दोन मद्रासी मंत्र्यांनी तडाड आपले राजीनामे दिले आणि काँग्रेसचे अध्यक्ष महासय कामराज, (म्हणजे सत्ताधारी काँग्रेस गणंगावर अगदी थेट पंतप्रधानावर हुकमत चालवणारे झारथाट गिरमिटधारी) त्यांनी काय केले? ते तर राष्ट्रवादाचे अभिषिक्त नरपती. त्यांनी आपल्या मद्रदेशीय कारभा-यांना जाहीर हुकूम सोडला की केन्द्राकडून हिंदी भाषेत येणारे सारे हुकूम फर्मान बेधडक जाळून टाका. कोठे गेला त्यांचा नि मद्रास राज्यकर्त्यांचा राष्ट्रवाद? आणि दिल्लीवाल्या सत्ताधीशांनी कितीसे त्यांचे कान उपटले? अहो कसले कान उपटतात! नुसते हात चोळीत बसले नाहीत तर तंगड्यात शेपट्या घालून चूपचाप बसले. स्व-भाषिक राज्यात स्व-भाषिकांचाच हितवाद राज्यकर्त्यांनी तळहाताच्या फोडासारखा जपला पाहिजे. परप्रांतीय उप-यांची वर्दळ राज्यात चालू देता