ऊठ म-हाठ्या ऊठ: Page 31 of 31

आहोत. राजधानीत घुसण्याचा प्रश्नच येतो कुठे?’ वजिराने दिल्लीत उडालेल्या धावपळीचा `आंखो देखा हाल’ सांगितला. चौकशी करता, वस्तुस्थिती समजली. समशेरी, भाला, ढाला, बर्चीवाले ५-६ म-हाठे घोडेस्वार ते काय, पण राजधानीत नुसते ते दिसताच, त्यांच्या कणगीदार पगड्यांनी दिल्ली उपडी केली. तेव्हापासून दिल्लीकरांनी म-हाठ्यांची जी हैबत खाल्ली, ती आजद्दीन तागायत! सध्याच्या लोकशाही जमान्यातही दिल्लीच्या कारभारात म-हाठा मुत्सद्दी शिरला का हिंदुस्थान्यांच्या झोपा उडतात. डॉ. आंबेडकर, काका गाडगीळ, चिंतामणराव देशमुख यांच्या कारकीर्दीचा इतिहास तर तुमच्या आमच्या नजरेसमोरचा. न्यायनिष्ठूर कर्तव्यासाठी त्यांनी आपल्या थोर मंत्रिपदांनाही लाथाडले. याला म्हणतात महाराष्ट्र धर्माचा अभिमान आणि म-हाठ्यांचा मराठबाणा.

या थोर परंपरेची आपल्याला जिवाभावाने जपणूक करायचीआहे. पुनरुत्थानाचे मर्म येथेच आहे. जुन्या जमान्यात पाच सहा म-हाठे स्वार दिल्लीची पाचावर धारण बसवितात तर चालू जमान्यात महाराष्ट्रातला एकजात जातिवंत म-हाठा एकदिली एकवटला, महाराष्ट्र धर्माचा एकनिष्ठ पासक झाला, श्रीशिवछत्रपतींची मनोमन शपथ घेऊन परिस्थितीवर मात करायला सज्ज झाला, तर तो इकडची दुनिया तिकडे करील. तशी त्याची परंपराच आहे. नवी दुनिया, नवे प्रश्न, नव्या अडचणी, नवे शत्रू, नवी राजवट सर्व काही अगदी टिपटॉप, नवीन असेल, तरीसुद्धा आमचा महाराष्ट्रधर्म नित्य, अगदी सनातन नवीनच आहे. दुनिय बदलो, काळ बदलो, सामाजिक राजकीया नीतीच्या व्याख्या बदलोत, १७व्या शतकाला महाराष्ट्र धर्म चालू २०व्या शतकातही महाराष्ट्राच्या पुनरुत्थानाला उचलून धरल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र धर्म म्हणजे काय? तो कसा आचरावा? कसा पाळावा? समर्थांच्याच शब्दात वाचा, सावकाश वाचा, नीट मनन करून वाचा, आपुलकीने विचार करा.

समर्थ रामदास हात उभारून हाक देत आहेत –

मारितां मारितां मरावें । तेणे गतीस पावावे ।। फिरोन येता भोगावें । महद्भाग्य ।।

नजर करारी राखणे । कार्य पाहोन खतल करणे । तेणे रणशूरांची अंतःकरणे । चकित होती ।।

जैसा भांड्याचा गलोला । निर्भय भारामध्ये पडिला । तैसा क्षत्री रिचवला । परसैन्यामध्ये ।।

निःशंकपणे भार फुटती । परवीरांचे तबके तुटती । जैसा बळिया घालून घेती । भेरी उठता ।।

ऐसे अवघेचि उठता । परदळाची कोण चिंता । हरण लोळवी चित्ता । देखत जैसा ।।

मर्दे तकवा सोडू नये । म्हणजे प्राप्त होतो जय । कार्य प्रसंग समय । ओळखावा ।।

कार्य समजे ना अंतरे । ते काय झुंजेल बिचारे । युद्ध करावे खबरदारे । लोक राजी राखता ।।

दोन्ही दळें एकवटे । मिसळताती लखलखाटे । युद्ध करावे खणखणाटे । सीमा सांडुनी ।।

देश मात्र उच्छेदिला । जित्या परीस मृत्यू भला । आपुला स्वधर्म बुजविला । ऐसे समजावे ।।

मराठा तितुका मेळवावा । आपुला महाराष्ट्रधर्म वाढवावा। येविषयी न करिता तकवा। पूर्वज हासती।। मरणहाक तो चुके ना । देह वाचविता वाचे ना । विवेका होऊनि समजा ना । काय करावे ।।

भले कुळवंत म्हणावे । तेही वेगी हजर व्हावे । हजीर न होता कष्टावे । लागेल पुढे । देशद्रोही तितुके कुत्ते । मारुनि घालावे परते । देशदास पावती फत्ते । यदर्थी संशय नाही । देश मस्तकी धरावा । अवघा हलकल्लोळ करावा । मुलुखबुडवा का बुडवावा । धर्मसंस्थापनेसाठी ।।

विवेक विचारा सावधपणे । दीर्घ प्रयत्न केलाचि करणे । तुळजावराचेनि गुणे । रामे रावण मारिला ।।

अहो हे तुळजा भवानी । प्रसिद्ध रामवरदायिनी । रामदास ध्यातो मनी । यन्निमित्त ।।

जय महाराष्ट्र! जय भारत!!