ऊठ म-हाठ्या ऊठ: Page 4 of 31

दिल्लीकरांच्या मेहरनजरेवर सदोदित लोंबकळतो. सारांश आज आम्ही म-हाठे, आमच्याच महाराष्ट्र राज्यात स्वतःच्या घरात उप-याच्या जिण्याने जगत आहोत. शिवपूर्वकाली ठिकठिकाणी किती तरी बहाद्दर पंचहाजारी नि दसहजारी मराठे सरदार होते.

आपली पराधीनता, हल्लाकी आणि डोळ्यांसमोर होणारी स्वधर्माची बेसुमार अवहेलना हे सरदार आज ना उद्या दूर करतील, अशा भाबड्या आशेवर म-हाठी जनता दिवसावर दिवस कंठीत होती. ज घडीला त्या सरदारांची भूमिका भारतात उफाळलेल्या राजकारणी पक्ष पार्ट्यांनी घेतली हे. भारताचा सर्वांगीण उद्धार करणारे महाभाग काय ते आम्ही नि आमचा पक्ष असल्या नगारे चौघड्यांचा त्याचा दणदणाट गेली कित्येक वर्षं अखंड चालत आला आहे. बुडत्याला काडीचा आधार न्यायाने हे पक्ष तरी आपला उद्धार करोत, या आशेने हजारो लोक या ना त्या पक्षाच्या पिंज-यात पोपटासारखे अडकून पडले आहेत. शिवपूर्वकालीन मराठे सरदारांप्रमाणे या पक्षाच्या निष्ठा तरी कुठे एकजनिशी आहेत? काही मराठे सरदार विजापुरच्या आदिलशाहीच्या कच्छपी, काही अहमदनगरच्या निजामशाहीच्या, काही गोवळकोंड्याच्या, काही इमादशाही, बरीदशाहीच्या अशा त्यांच्या निष्ठा `पट्टीस पावली’ देईल त्याच्या भजनी लागलेल्या. बरे, तेथे तरी काही एकनिष्ठता? छे, नाव कशाला? जिकडे घुग-या तिकडे उदो उदो करायला ते सारे एक सोडून दोन पायावर तयार. निजामशाहीचा सरदार उद्या पहावा तर आदिलशाहीला चिकटलेला. तेथे जुगले भागले नाही तर लगेच दक्षिणेवर चाल करून आलेल्या अथवा येणा-या मोंगल पातशहापुढे साष्टांग दंडवत घालायला तयार. सगळ्यांचीच निष्ठा वारांगनेसारखी. छिचोर नी आपमतलबी. बिचा-या सैनिकांचे काय? भरला दरा तो सरदार बरा ही त्याची अवस्था. आपण कशासाठी हातावर शिरे घेऊन लढत होत, कोणासाठी पोट बांधून रक्ताच्या रंगपंचम्या खेळत आहोत, याचा विचारही कोणाला चुटपुटता चाटून जात नसे. कारण त्याच्या स्वाभिमानाचेच तळपट उडालेले होते. स्वाभिमान चांगला रसरशीत टरारलेला असला तरच त्याची भिंगरी स्व-पासून स्व-देशापर्यंत बिनधोक रोंरावत जाते. अभिमान शिकावा अगर शिकवावा लागत नाही. प्रत्येकाच्या जन्माबरोबरच तो स्वयंभू जन्माला तयार असतो.

शिवपूर्वकालच्या सरदारांप्रमाणेच आजकालच्या एकूण एक राजकारणी पक्षांच्या निष्ठा वारांगनेसारख्या चंचल, अस्थिर नि व्यभिचारी असतात. एक कम्युनिस्ट पंथ घेतला, तरी त्यांच्यातही डावे आणि उजवे घरभेद आहेतच. डाव्यांची निष्ठा चीनला विकलेली, तर उजव्यांच्या अकला सोवियत पेढीवर गहाण पडलेल्या. सोशालिस्टांतही संयुक्त आणि प्रजा अशी दोन घराणी. शिवाय, या पक्षातील कोण पक्षी भुर्रकन उडून दुस-या पक्षांच्या पिंज-यात जाईल, याचा नेम नाही. रंगभूमीवरील नटनट्याच्या वेषांतराप्रमाणे असले पक्षांतर पुष्कळ वेळा टोळ्याटोळ्यांनी होत असते. मग शिलकी गाळ गदळाचे इनामदार, `कैलासवासी’ शब्दाप्रमाणे अमका तमका काँग्रेसवासी झाला अशा टिंगलबाज शापांनी आपल्या मनाचे नि संतापाचे समाधान करून घेत असतात. ज्यांच्या निष्ठा स्वार्थाच्या बाजारात लिलावाने विकायला मांडलेल्या, त्यांच्या स्वाभिमानाची किंमत किती टोले कवड्या दमड्या करायची? पक्षप्रवेशालाच त्यांना आपल्या स्वाभिमानाची मुंडी मुरगाळून, पक्षाभिमानाचे बाशिंग बांधावे लागते. 000 नंगेसे खुदाभी डरता है प्रत्येक पक्षात भगतगणांचा बाप्तिस्मा उरकण्यासाठी बौद्धिके म्हणजे पक्षमहात्म्यांचे गोमुत्र आकण्ठ पाजण्याचा विधी साजरा करण्यात येत असतो. सोवियत रशियासारख्या कम्युनिष्टी देशात या विधीला `ब्रेन वॉशिंग’ ऊर्फ `मगजशुद्धी’ असे साळसूद नाव दिलेले असते. या बौद्धिकांच्या अखंड डोस-पाजणीने मनुष्य स्वतःला नि स्वत्वाला विसरतो. स्वाभिमानाला पारखा होतो. गणगोताची पर्वा झुगारतो आणि पक्षनेते गुरुवर्य जसे जे नि जितके शिकवतील, पढवतील, तेवढीच नि तीच पोपटपंची चतुरकी जान बडबडत तो मोकाट सुटतो.

जगातल्या आधिव्याधींचा निपटनिचरा करण्याचे ब्रह्माण्डज्ञान फक्त बाप्तिस्मा घेतलेल्या माझ्याच पक्षाच्या खाकोटीला आहे, अशा उन्नत्त भावनेने व्यवहारात तो माजलेल्या पोळासारखा वावरू लागतो. पक्षाच्या पिंज-याबाहेर त्याला पडता येत नाही. पडलाच तर, पाळलेल्या पक्ष्याला बाहेरचे जातभाई पक्षी जसे टोचटोचून घायाळ करतात किंवा ठारही मारतात, तीच अवस्था पक्षनेते त्याची करतात नि करवितात. पढविलेल्या पाठापेक्षा अवांतर स्वतंत्र विचारांचा उद्गारही काढण्याची त्याला शहामत होत नाही, स्वप्नातसुद्धा स्वाभिमानाची कल्पना येता कामा नये, येवढा परिणाम त्या