ऊठ म-हाठ्या ऊठ: Page 2 of 31

असतो. स्वाभिमानाच्या अस्सल जिव्हाळ्याने येथवर मजल मारल्यानंतरच भारत राष्ट्राविषयीचा जिव्हाळा (परिस्थिती तितकीच देवाण घेवाणीची असेल तर) निर्माण होणे शक्य आहे. वेळी अभिमानाच्या कक्षेत जन्मग्राम टिकले तरी जन्मस्थळाचा पत्ता सांगणे आजकाल कठीण झालेले आहे. महाराष्ट्राच्या बहुतेक उदयोन्मुख पिढ्यांचे जन्म इस्पितळात होत असतात. `माझा जन्म अमुक तमक इस्पितळात झाला,’ असे अभिमानाने सांगणारा आसामी सहसा आढळत नाही. अभिमानाचा एक झरा येथे खुंटतो. जात्याभिमानाबद्दल मात्र विशेष खुलासा केला पाहिजे. भारतात तथाकथित लोकशाहीचा बाजार चालू झाल्यापासून, `जातीयता एक मोठे पाप’ ठरण्यात आले आहे. नवलाची गोष्ट इतकीच की जातीयतेच्या तिटका-याच्या तमाशांचे फड नाचविणारांनी जातीयता म्हणजे काय? तिची काटेकोर व्याख्या काय? याचा कदाही चिकित्सेला पटेल असा स्पष्ट खुलासा आजवर केलेला नाही. भाषणबाजीत टाळ्या मिळण्यासाठी जातीयतेवर तुटून पडणा-यांनाही स्वजातीचा जिव्हाळा सोडवत नाही. व्यक्तीच कशाला? आपल्या महाराष्ट्र राज्यात मंत्र्यांच्या निवडणुकासुद्धा जातीय तत्त्वावरच होत आल्या नि होत असतात. तेथे मंत्र्याच्या लायकी नालायकीचा विचार फारसा होत नाही. मंत्र्यांच्या निवडणुकीचा प्रश्न चर्चेच्या चुल्हाणावर चरचरत असताना, प्रत्येक जात जमात `आमचाही एक मंत्री घेतला पाहिजे’ अशा आग्रहाच्या आरोळ्या मारताना काय कोणी ऐकले वाचले नाही? प्रत्यक्ष राज्यकारभाराच्या क्षेत्रात जर जातीच्या महात्म्याची सत्यनारायणाची पूजा (निर्लज्जपणे) बांधली जाते, तर एखाद्या व्यक्तीने स्वाभिमानाच्या विकासासाठी स्वजातीविषयी जिव्हाळा व्यक्त केला, जात्युन्नतीच्या कार्यात भाग घेतला, तर मात्र भारताच्या जातिधर्मांतील सेक्युलरिझमचे डोळे का पांढरे होतात? बरे, उठल्यासुटल्या या जातिधर्मातील `झम्’ची चाललेली बडबड हे तरी काय गौडबंगाल आहे? भारताच्या घटनेत सेक्युलरिझम हा शब्द शोधूनही सापडायचा नाही, हे नागडे सत्य गोरेगावच्या मसुराश्रमाचे दिवंगत ब्रह्मचारी दत्तमूर्ती यांनी प्रथम चव्हाट्यावर उघडे केले. तोवर लोकसभेत मिरवणा-या काही हिंदू खासदाराच्या लक्षात ढोबळ कांग्रेजी माया चुकून एकदाही आली नाही. खुशाल सगळे घटनेचा उल्लेख `सेक्युलर कॉन्स्टिट्यूशन’ म्हणून करीत बसले आहेत. पण ता अलिकडेच मी. एम. आर. मसानी आणि प्रो. रत्नस्वामी (घटना रचनेत या महाशयांचाही हात होता.)

अखिल भारतीय ख्रिश्चन कॉन्फरन्समध्ये बोलताना ते म्हणाले की, `भारत हे जातीधर्मातीत सेक्युलर राष्ट्र नव्हे आणि भारताची घटना ही तर सेक्युलरीझमच्या अगदी विरुद्ध आहे.’ सारांश, हा जातीधर्मातीतपणाचा बागुलबुवा मतलबी काँग्रेसाग्रणींनी भोल्याभाबड्या जनतेला हकनाहक बनवण्यासाठी मुद्दाम हवेवर सोडलेला फसवा फुगोरा आहे. हिंदू मुसलमानातील दंग्यांना `जातीय दंगे’ संबोधण्याची एक फॅशन पडली आहे. जातीय शब्दाचा इंग्रजी प्रतिशब्द कम्युनल आणि जमात या शब्दालाही तोच प्रतिशब्द. येथे कास्ट आणि कम्युनिटी या दोन शब्दांचा अकरमाश्या संबंध जोडून, वरचेवर लोकांच्या मनात गोंधळ उडविण्याचा खटाटोप नेहमी चालू असतो. इतकेच नव्हे तर नवपरिमत (जुन्या थाटाघाटाची) वधू जसे आपल्या नव-याचे नाव घ्यायला लाजत असे, त्याच लाज-या बुज-या थाटात हिंदू मुसलमान दंग्यांच्या बातम्या देताना, अमुकतमुक ठिकाणी दोन जमातीत दंगा झाला असा मोघम उल्लेख करण्यात येत असतो. मुसलमानाचे नाव घ्यायला सरकार आणि त्यांच्य वृत्तसंस्था एवढ्या का बिचकतात नि घाबरतात हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. मागे वंगभंगाच्या धुमाळीत पूर्व बंगालचे लेफ्टनण्ट गव्हर्नर सर बम्फील्ड फुल्लर मुसलमान जमातीचा उल्लेख `प्यारी रण्डी’ म्हणून करीत असत. तोच मस्केबाज नखरा सध्याच्या काँग्रेजी सरकारनी, मुसलमान जमातीचे नाव न घेता, मागील अंकावरून पुढे चालू ठेवला आहे की काय कळत नाही. गांधी युगात `हिंदू-मुस्लिम भाई भाई’चा मीनाबाजार मुबलक बोकाळला होता. हिंदू दे. भ. नी मशिदीत जाऊन भाषणबाजी केली. आणि हिंदू देवळांच्या प्रांगणात मुसलमान दे. भ. नी फर्मास व्याख्यानबाजी झोडली. या भाई-भाई थोतांडाला अहिंसावादाचे सोनेरी गिलीट चढविण्यासाठी म. गांधींनी शौकतअल्ली महंमद अल्लीला गोप्रदान केले. अहाहा, काय हो तो सोहळा! लोकांचे काय? ते नेहमी बनानेवाल्यांच्या मागे मेंढरासारखे धावणारे. त्यांनी हिंदू-मुस्लिम भाईभाईच्या नरडेफाट गर्जना केल्या आणि मनगटांची हाडे ढिली होईतोवर टाळ्या पिटल्या. असे करताना आपल्या स्वाभिमानाची मुंडी कोणीतरी करकचून पिळीत