ऊठ म-हाठ्या ऊठ

दोन नोक-या सोडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे खरं तर इंग्रजी व्यंगचित्र साप्ताहिक काढायच्या तयारीत होते. पण प्रबोधनकारांनीच सांगितलं हे साप्ताहिक मराठीच हवं. मार्मिक हे नावही त्यांचंच. एक व्यंगचित्र साप्ताहिक शिवसेनेसारखी लढाऊ संघटना उभी करू शकलं, यामागचा प्रभाव प्रबोधनकारांचाच. ते मार्मिकचे नियमित लेखकही होतेच. त्यातल्याच निवडक लेखांचा संग्रह फार नंतर म्हणजे ७३ साली ‘महाराष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी ऊठ मरा-ठ्या ऊठ’ या नावाने प्रसिद्ध झाले. या शीर्षकातला म-हाठा म्हणजे कोणती जात नाही, तर याचा अर्थ मराठी माणूस. म्हणूनच प्रबोधनकारांनी आपल्या सगळ्या लेखनात मराठी माणसासाठी म-हाठा असा शब्द वापरला. आणि मराठा जातीविषयी लिहिताना मराठा. शिवसेनेला स्वतःची फिलॉसॉफी नाही, असं सर्रास म्हटलं जातं. पण ती फिलॉसॉफी नेमकी काय आहे, हे जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक वाचाच. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचे प्रस्तावनाकार नाना वांद्रेकर म्हणजे ज्येष्ठ पत्रकार नारायण आठवले.

महाराष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी ऊठ म-हाठ्या ऊठ

लेखक : प्रबोधनकार के. सी. ठाकरे

आराधना प्रकाशन, मुंबई – ५१

प्रकाशक : गजाजन गोविंद आठवले

आराधना प्रकाशन १, झपूर्झा, साहित्य सहवास,

वांद्रा पूर्व, मुंबई ४०००५१

प्रबोधनकार के. सी. ठाकरे

`मातोश्री’ बंगला, कलानगर,

वांद्रा पूर्व, मुंबई, ४०००५१

१९ सप्टेंबर १९७३

मुद्रक : चिंतामण वामन जोशी

माधव प्रिंटिमग प्रेस, अलिबाग, कुलाबा

मूल्य : २ रुपये ५० पैसे

---------------------------------------

प्रस्तावना

प्रबोधनकार ठाकरे याच्या पुस्तकाला मी चार शब्द लिहावेत ही कल्पनाच मोठा विलक्षण आहे. दादा हे आम्हा पत्रकारांचे आजोबाच म्हणायचे. त्यांनी त्यांच्या तिखट लेखणीने आणि कृतिशूरतेने महाराष्ट्र गाजवला आणि जागवला. अन्याय-अंधश्रद्धा आणि दुष्ट रूढी यांच्यावर फक्त लेखणीचे वार करून दादांनी समाधान मानले नाही. कंबर कसून ते या लढ्यात प्रत्यक्ष सहभागीही झाले. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातले त्यांचे कर्तृत्व प्रत्यक्षात बघायचे भाग्य मला लाभले. महाराष्ट्राचे नेते नामोहरम होऊन या लढ्यातून पळ काढू लागले तेव्हा शेलारमामांच्या आवेशाने दादा या लढ्यात उतरले. अस्सल म-हाठी बाणा असलेला हा चिवट-झुंजार म्हातारा बघून आम्हा तरुणांनादेखील आमच्या तारुण्याची लाज वाटली. आमचा उत्साह, संताप, त्वेष आणि तडफड दादांच्या पासंगालाही पुरणारी नव्हती आणि मग आम्ही अधिक चेवाने संयुक्त महाराष्ट लढ्यात उभे झालो. मुंबईत येणा-या परप्रांतियांच्या लोंढ्याविरुद्ध दादांनी आवाज उठवला. सारे पत्रकार याविषयी मूग गिळून बसलेले बघून दादांनी या प्रश्नावर लेखणी परजली. मराठी माणसाचा स्वाभिमान जागवत. त्याला ऐक्याची हाळी घालत त्यांनी मुंबईत शिवसेना उभी करण्यास योग्य असे वातावरण निर्माण केले. शिवसेनेला तत्त्वज्ञानाचा भरभक्कम पाया घालण्याचे कामच दादांनी केले. ह्या पुस्तकातले लेख शिवसैनिकांनीच नव्हे प्रत्येक मराठी माणसाने आत्मसात करावेत. मराठी माणसाला त्याच्या लढाऊ परंपरेची याद दून, त्याच्यावर जमलेली भोंगळ सहिष्णुतेची जळमटे झटकणारे हे लेख मलाही मार्गदर्शक ठरले आहेत, अधिक काय सांगणार?

- नाना वांद्रेकर

---------------------------------------

अनुक्रम स्वाभिमानी लागवड ... नंगेसे खुदाभी डरता है ... गोळीला जनता पोळीला पुढारी ... आम्हीच आमचे मित्र नि शत्रू महाराष्ट्र राज्याचे पाणी जोखले म-हाठे शैतानकी औलाद है महाराष्ट्राचा वाली कुणी नाही म-हाठा तितुका मेळवावा! गलबला बुद्धी नासतो ... प्रतापे सांडिली सीमा झुणका भाकरीच्या आड येऊ नका मारिता मारिता मरावे हे लेख साप्ताहिक `मार्मिक’मध्ये १४ ऑगस्ट १९६६ ते ३० ऑक्टोबर १९६६ या काळात क्रमशः प्रसिद्ध झाले आहेत.

---------------------------------------

स्वाभिमानाची लागवड स्वाभिमान! स्व + अभिमान – स्वतःविषयी अभिमान, मानवी जीवनातील सर्व आशा आकांक्षांच्या उत्कर्षाचा हा पाया. व्यक्तिंच्या काय किंवा देशाच्या काय, सर्वांगीण त्थानाचा पाया स्वाभिमानच. स्वाभिमानशून्य व्यक्तीला आणि समाजाला जगाच्या व्यवहारात मातीच्या मोलानेही कोणी विचारीत नाही. स्वाभिमानाचे क्षेत्र स्व-पुरतेच संकुचित नाही व नसते. त्याचा विस्तार स्वतःचे कुटुंब, घराणे, जन्मग्राम, जन्मस्थळ, स्वजाती, गावकरी, भगिनी, बांधव, गावातील पवित्र स्थाने, संस्था असा फोफावत जात जात स्व-राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र येथपर्यंत होत