वैदिक विवाह विधी: Page 5 of 9

महत्त्व फार दिले आहे व तसाच प्रकार अंध गतानुगतिकतेने चालू ठेवण्यात आला आहे. विवाहविधीत गडबड, गोंगाट, वाजंत्री, पैशाचा अपव्यय हेच प्रकार फार. शांती नाही, गंभीरता नाही, विधीचा मान नाही, विवाहकर्माचा कोणताच भाग झाला नाही तोच मंगलाष्टके! ‘चवदा कुर्यात’ ‘हे कुर्यात्’ ‘इतकी कुर्यात्’ ‘हेदहा अवतार कुर्यात्’ असे सदोष प्रयोग त्या मंगलाष्टकात. तिस-या श्लोकात तर ‘कुर्यात्’ या क्रियापदाचे जे कर्ते आहेत त्यात ‘हाहा हुहू’ नामक गंधर्व आहेत. ज्या गंधर्वाच्या गांधर्वविवाहात व्यवस्थित विवाह नाही, ते आमच्या व्यवस्थित ब्राह्मविवाहात म्हणे आशीर्वद देणार! आमच्या वधूवरांना पांचजन्य, धनु, रंभा, कुंजर, सुरा (दारू), चारण, यक्ष, अश्वास्त्य, नद्या, नगरे, अजून न झालेला कलंकी (कल्कि) असे हे आशीर्वाद देणार! हा विवाहविधिविषयीचा प्रकार जर आजच्या सुविद्य मुलांना व मुलींना समजेल तर त्यात जे मानी जीव आहेत ते आपला विवाह अशा रीतीने कधीही करून घेणार नाहीत. हिंदू जनांनी याचा विचार करावा आणि आपल्या वेदप्रणित सुंदर विवाहविधिकर्माचे संशोधन करावे.’’ कै. वैद्य ‘संशोधन करावे’ असे जे म्हणतात ते त्यांच्या शालीन्याचे द्योतक आहे; वास्तविक हे दुष्कर कार्य त्यांनी अत्यंत मेहनतीने सुकर करून हिंदू जनतेपुढे ठेविलेलेच आहे. आधी केले आणि मग सांगितले. आज त्यांच्या संशोधित विवाहविधीप्रमाणे ठिकठिकाणी विवाह होत आहेत. ज्यांनी ज्यांनीही पद्धत राहिली त्यांनी तिची मुक्तकण्ठाने स्तुतीच केली आहे आणि दिवसेंदिवस तिचा प्रसार सुविद्य व समंजस तरुण तरुणीत होतच आहे. आजपर्यंत ब्राह्मण, कायस्थ प्रभू, मराठे क्षत्रिय, इ. अनेक जातीत या पद्धतीने बरेच विवाह लागले आहेत. या विधीची छापील पुस्तके आज दोन वर्षे छापू घातली आहेत. कै. वैद्यांच्या ध्वजधारकांनी या कार्याचे महत्त्व जाणून, हा विधी सक्य तितक्या लवकर छापून प्रसिद्ध करावा, अशी आमची त्यास आग्रहाची विनंती आहे. कै. ग. भा. वैद्य संशोधित वैदिक विवाहाचा कायदेशीरपणा श्री. चौबळ यांनी आपल्या ‘हिंदू वैदिक विवाह पद्धतीचे परीक्षण’ या पुस्तकात जे पुष्कळसे निरर्थक मुद्दे उभारू बरेच भारूड केले आहे, त्याची योग्य ती संभावना होतच आहे. शास्त्र म्हणजे काय, हिंदू कोणास म्हणावे, ब्राह्मण कोण वगैरे कित्येक गोष्टींचा त्यात उहापोह केलेला आहे.

जुन्या विधींपैकी काही गोष्टी कमी केल्या आहेत, सोसायटीच्या विवाहपद्धतीत ब्राह्मण असतोच असे नाही, असल्या शंका पाहिल्या म्हणजे खरोखरच हा रिकामा उपद्व्याप आहे असेच वाटते. ब्राह्मण नसला तर विवाह अशास्त्रीय किंवा बेकायदेशीर ठरतो, असे उघडपणे म्हणण्याची मात्र त्यांना हिंमत नाही. पण थोडीशी खुसपट काढून, ब्राह्मण द्विज यांच्या व्याख्यांची चर्पटपंजरी वळून, ‘थोडीशी शंकास्पद गोष्ट आहे, याचा नीट विचार व्हावा’ वैगेरे लांड्या कारभाराचे कोटीक्रम त्यांनी लढविले आहेत. शेवटी शूद्राला तर बाजूला टाकून स्वारी वेदोक्ताच्या बाबीवर घसरली आहे. वैदिक अधिकार असणाऱ्या जातींनी विवाह लावला तर चौबळांची फारशी हरकत नाही, असे दिसते. पण आज क्षत्रिय वैश्यपणाबद्दल इतके तंटे उपस्थित झाले आहेत की, याचा शेवटला निर्णय देणार को ? प्रभू मराठा वगैरे जातींना अद्याप क्षत्रीय मानण्यास अजूनही कित्येक नाखूष आहेत. तर काही कट्टर जीर्ण या कलियुगात क्षत्रिय व वैश्य मुळी नाहीतच हा महामंत्र उराशी धरू पुढे येतील आणि म्हणूनच मला वाटते श्री. चौबळांनी सध्या ब्राह्मणांकडूनच लग्ने लावावी असला बुरख्याचा उपदेश हळूच केला आहे. ही शुद्ध मुलामाची मनोवृत्ती आहे, या शिवाय दुसरे उत्तर नाही. पण या पुढे श्री. चौबळांनी आणखी एक शस्त्र काढले आहे. या कलियुगात तरुण लोक सगळे धर्मलंड बनत चाललेले, त्यांना शास्त्राची मातब्बरी काय होय ? शास्त्र धाब्यावर बसविणारे चवचाल लोक हे ! तेव्हा त्यांनी आपल्या पोतडीतून विसाव्या शतकाला योग्य असे शस्त्र काढले. आमचे शास्त्र राहिले, पण कायद्याकडे तरी नीट पहा, हे लोक काही जरूर सगळे विधी करीत नाहीत. विधि कर्माला ब्राह्मण असतोच असे नाही. तेव्हा