वैदिक विवाह विधी: Page 4 of 9

नाडी वगैरे प्रकार डोंबा-याचा पातड्यातल्या हाडकांप्रमाणे काढण्यातच आपल्या पोक्तपणाच्या वडीलगिरीचे चीज पुरविणारांनी या मंगलाष्टकांच्या आगंतुकपणाचा अवश्य विचार केला पाहिजे. उपनयन विधीत ही अष्टके मुलाचे लग्न बापाशी लाऊन विवाहकर्मात विधीची शास्त्रशुद्ध, तर्कमान्य व विवेकमान्य सांगता होण्यापूर्वीच ‘विवाह लागला’ अशी अक्षरशः सत्य जबानी देत असतात. समजा, ‘शुभ मंगल सावधान’ची ‘जयघंटा’ ठणाणताच हातात पडलेले नारळ घेऊन ‘लग्न लागले’ अस जाहीर करणारे साक्षीजन घरोघर परतल्यावर, दान प्रतिग्रहादी मुख्य विधि उरकण्यापूर्वीच जर वराचे अकस्मात ‘हार्ट फेल्पर’ने प्राणोत्क्रमण झाले, तर हे साक्षीजन किंवा मंगलाष्टकांच्या अशास्त्रीय बैडबाजाने ‘लग्न लागले’ असे मानणारे वधुवराचे आईबाप त्या वधूला विधवा समजणार की कुमारिका समजणार? यावर शास्त्रीबुवा जेहत्ते निर्णय देणार की ‘सप्तपदीशिवाय विवाह सांग व संपूर्ण होत नाही’ जर होत नाही तर, ‘लग्न लागले’ असे आधीच जाहीर करून साक्षीजनांची बोळवण तुम्ही का केलीत? आता तुमचा निर्णय खरा मानावा की साक्षीजनांनी ‘लग्न लागले’ हा गावभर पुकारलेला डंका खरा मानावा? सारांश, विवाहासारख्या अत्यंत महत्त्वाच्या मःनसंस्कारकारक, उत्क्रान्तिकारक व गंभीर अशा विधीतसुद्धा आम्ही असत्याची भेसळ करण्यास मागे पुढे पाहात नाही!

दुसरी गोष्ट मुहूर्ताची. ज्योतिषीबुवा वधुवरांच्या कुंडल्यांची घासाघीस करून त्यातून निश्चितअसा मिनिट सेकंडवार मुहूर्त काढून देतात. मगलाष्टकांच्या वेळी अनेक स्नेहीजन खिशातली घड्याळे मुठीत धरून, किंवा रिस्टवॉचबद्ध मनगटे आडवी धरून मिनिट सेकंद काट्यावर अट्टल डिटेक्टिवाप्रमाणे ‘डोळा धरून’ उभे असतात. ठरावीक मुहूर्ताच्या आधीच मंगलाष्टकांचे आठ श्लोक संपले तर ‘भटजी अजून दोन मिनिटे आहेत, चालू द्या’ असा त्या मंगलाष्टक्याला इषारा होतो. भटजींना काय? ते लागलीच मंगलाष्टकांची द्वितीयावृत्ती सुरूकरतात किंवा वधुवराचा एखादा ‘विशेष शहाणा’ स्नेही ‘वेळ मारण्याकरिता’ (To kill the time) ज्याच्या मस्तकिंदीर्घ नूतन जटाफेटा दिसे टोप तो, हा किंवा असलाच एखादा मराठी श्लोक मोठ्या खड्या सुरात म्हणण्याची तसदी घेतो आणि घड्याळाचा काटा ठराविक मिनिट सेकंडवर येताच सर्वजण टाळ्यांचा कडकडाट करून, ताशे चौघड्याच्या धडाक्यात ‘लग्न लागले’ असे जाहीर करतात. परंतु, खरा विवाहविधी म्हणजे दानप्रतिग्रह सप्तपदी इ. भाग पुढे केव्हा तरी निवांतपणे उरकीत असताना, खुद्द ज्योतिषशास्त्राच्या दृ,टीने जरी व्यतिपात वैधृतीचा काळ सुरू असला तरी, त्याची दिक्कत खुद्द ज्योतिषीबुवा किंवा कोणीही बाळगीत नाही. म्हणजे मुहूर्ताचे अनावश्यक दास्य पत्करून सुद्धा विवाहविधी ठराविक मिनिट सेकंडावर पडून येत नाहीत ते नाहीतच! अशा परिस्थितीत जोशी पंचांग पहाती । मग कां बालविधवा होती ।। ही तुकोक्ती कोणत्या विचारवंताला आठवणार नाही? खरे पाहिले तर मूळच्या वेदोक्त विवाहविधीत अंतर्पाट किंवा मंगलाष्टके यांचा काहीच मागमूस लागत नाही. विधीच्या शुद्ध क्षेत्रांत सामाजिक चालीरीतींनी व प्रांतविशिष्ट रूढींनी दंगल माजविल्यानंतरच हा मंगलाष्टकाचा लटका बांडगुळ्या प्रघात विवाहविधीच्या बोकांडी बसला आहे. मंगलाष्टके म्हणून विवाहाची सिद्धी होत नाही किंवा कोठच्याही दृष्टीने त्यांची आवश्यकताही सिद्ध होत नाही. तो एक मूर्खपणाचा प्रकार आम्ही हिंदुजनांनी हकनाहक आपल्या डोक्यावर चढविलेला आहे. याबद्दल लिहिताना कै. वैद्य मोठी मार्मिक टीका करतात. ‘मूळच्या विधीत मंगलाष्टके नाहीत. सगळाच विधि मंगल व पुण्यप्रद आहे. शेवटी ‘स्वस्त्यत्यु’ येते. मूळचा विधि गंभीर, मनःसंस्कारकारक, असा असून तो शांतपणे व्हावयास पाहिजे. एके प्रकारची आमच्या पहाण्यात आलेली मराठी मंगलाष्टके म्हणतात त्यांची भाषाही शुद्ध नाही, व कसे तरी कुर्यातं सदा मंगलम् असे प्रत्येक श्लोकाच्या शेवटी ठेवून दिले आहे.

कुर्यात् या एकवचनी क्रियापदाचा कर्ता बहुवचनी आला आहे. तरी कोणाला विचार करण्याची व आपला परम मंगल विवाहविधि संशोधून पहाण्याची आवश्यकताच वाटत नाही. कसे तरी एकदा ‘लग्न लागले’ म्हणजे झाले. अशीच निष्काळजीपणाची प्रवृत्ती फार. पटेल स्मृतीसारखा विषय पुढे आला म्हणजे जो तो धर्माची मोठी काळजी दाखवितो, पण शंकराचार्यासारखे असामी देखील विधि संशोधून देत नाहीत. विधीच्या प्रकारात पुस्तके पाहिली व आचार पाहिला म्हणजे असे दिसते की गौण गोष्टींना